Skip to content Skip to sidebar Skip to footer

विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ लवकरच झळकणार थिएटर्समध्ये!

बहुप्रतिक्षित ‘लायगर – साला क्रॉसब्रीड‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची बातमी अभिनेता विजय देवरकोंडाने (Vijay Deverakonda) त्याच्या ट्विटरवरून जाहीर केलेली आहे. काही आठवड्यांपूर्वीच या चित्रपटाचं एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं आणि हा चित्रपट थिएटर्समध्ये येईल की एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर याबाबत बरीच खलबतं चालू होती. पण विजयच्या या लेटेस्ट ट्विटने हा संभ्रम दूर केलेला आहे.

जानेवारी २०२१ मध्ये आलेला जोसेफ विजय आणि विजय सेतुपती अभिनित आणि लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘मास्टर’ (Master) हा चित्रपट यावर्षीचा पहिला ब्लॉकबस्टर ठरला असून, कोरोनाच्या सावटात झाकोळल्या गेलेल्या चित्रपट उद्योगासाठी हे चित्र आशादायक ठरत आहे. त्याचबरोबरीने रिलीज झालेल्या ‘क्रॅक’ आणि ‘रेड’ या दोन्ही तेलुगू चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर भरभक्कम कमाई करून चित्रपटनिर्मात्यांना आणि सिनेरसिकांनाही दिलासा दिलेला आहे. पूर्ण क्षमतेने थिएटर्स खुली करण्याची परवानगी नसतानाही थिएटर्समध्ये होत असलेली गर्दी पाहून अनेक चित्रपट आता ओटीटीऐवजी थिएटर्समध्ये रिलीज करण्याचा निर्धार आता निर्मात्यांनी केलेला असून, त्यात आता पुरी जगन्नाथ दिग्दर्शित ‘लायगर’ची भर पडलेली आहे.

Image result for liger poster
लायगर (Liger) चित्रपटाचे पोस्टर

‘लायगर’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विजयने आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले असून त्यात तो जोशपूर्ण आवेशात हातात काठी घेऊन ओरडताना दिसत आहे. त्याची ही गर्जना ऐकण्यासाठी प्रेक्षकांना थिएटर्समध्ये जावं लागणार असून, पोस्टरवर नमूद केलेली रिलीज डेट अर्थातच, ‘९ सप्टेंबर २०२१’ पर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे. नागार्जुनपासून राम पोतीनेनीपर्यंत, तेलुगू चित्रपटसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्यांना बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवून देणारे सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते पुरी जगन्नाथ यांनी ‘लायगर’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनीच या चित्रपटासाठी कथा व पटकथालेखन केलेलं आहे.

हे वाचलंत का: विजय ची विजयी गाथा…

Image result for vijay devarakonda liger post
‘लायगर’ (Liger) हा अनन्या पांडे (Ananya Panday) हिचा पहिलावहिला तेलुगू चित्रपट आहे

‘लायगर’ची टॅगलाईन- ‘साला क्रॉसब्रीड’ ही चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय ठरली असून, विजयच्या भूमिकेबाबत रंगतदार चर्चांच्या फैरी झडू लागल्या आहेत. बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक करण जोहर आणि टॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री चार्मी कौर यांनी पुरी जगन्नाथसोबत निर्माते म्हणून हातमिळवणी केलेली आहे. करण जोहरच्या लेटेस्ट ट्विटनुसार ‘लायगर’ (Liger) हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब होणार असून पॅन इंडिया रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाच्या रूपाने विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, अनन्या पांडेही तिच्या या पहिल्यावहिल्या तेलुगू चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं तिच्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओमधून दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये अनन्याने निर्माती चार्मी कौरसोबत चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल माहिती दिलेली आहे तसेच अस्खलित तेलुगू भाषेत संवाद साधून तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हे देखील वाचा: विजय थलापतीचा “मास्टर” ओटीटीवर…..

‘लायगर’मध्ये विजय आणि अनन्यासोबतच रम्या कृष्णन, रोनीत रॉय, मकरंद देशपांडे आणि विनोदी अभिनेता अली इत्यादी कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तेलुगू चित्रपटसृष्टीचा सिल्व्हेस्टर स्टॅलोन म्हणून नावारूपाला आलेला विशू रेड्डी हा नवोदित अभिनेताही एका विशेष भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. इस्मार्ट शंकरच्या घवघवीत यशानंतर ‘लायगर’च्या रुपाने आणखी एक यश मिळवण्यासाठी दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सज्ज झाला असून, चाहत्यांना आता ९ सप्टेंबर २०२१ तारीख खुणावू लागली आहे.