Skip to content Skip to sidebar Skip to footer

Asha Movie Trailer:’बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’! आर्चीच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’(Asha Movie) चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) साकारत असलेली आशा सेविका, जी सायकलवर बसून गावागावांमध्ये लोकांपर्यंत पोहोचते, तिच्या प्रवासातील एक झलक या टीझरमध्ये दाखवली गेली. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या ताकदीच्या टॅगलाइनने चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केले आणि या कथेची गोडी लागली. याच उत्सुकतेला आणखी वाव देणारी गोष्ट म्हणजे नुकतीच प्रदर्शित झालेली ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्याची धून. आशाच्या संघर्षाला उर्जा देणारे हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. गाण्याच्या शब्दांनी आशाच्या जिद्दीला सलाम केला असून, प्रेक्षकांनी तिच्या धैर्याची आणि संघर्षाची खुलेपणाने स्तुती केली आहे. आता त्याच्या मागोमाग चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे, जो अजून अधिक उत्सुकता निर्माण करणारा ठरला आहे.(Asha Movie Trailer)

Asha Movie Trailer
Asha Marathi Movie Trailer

चित्रपटाचे ट्रेलर महिलांच्या संघर्षाचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास उलगडतं. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसतात. आशा केवळ एका आरोग्य सेविकेची भूमिका निभावत नाही, ती आपल्या गावाच्या आणि कुटुंबाच्या ताण-तणावांना सामोरे जात, आरोग्याच्या क्षेत्रात एक नवा बदल आणण्याचा प्रयत्न करते. आशाच्या संघर्षात, तिच्या जीवनातील वेदना, धग आणि तळमळ ठळकपणे जाणवतात.

Asha Movie Trailer
Asha Marathi Movie Trailer

चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या भूमिका या कथेला अधिक ताकद देतात. चित्रपटात समाजातील वास्तविकता, महिलांवरील असंख्य कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेच्या लढाईचा प्रभावी संगम दिसेल. दिग्दर्शक दीपक पाटील यांचे म्हणणे आहे, “‘आशा’ हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही. ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे, ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतीवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. या चित्रपटातून आम्ही त्या अनामिक योद्ध्यांना प्रकाशात आणू इच्छितो. तिचं सत्य, तिचा वेदनादायी तरीही प्रेरणादायी प्रवास आम्ही प्रामाणिकपणे मांडला आहे.” (Asha Movie Trailer)

=============================

हे देखील वाचा: तब्बल २० वर्षांनंतर Amruta Khanvilkar चे रंगभूमीवर पदार्पण; पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी 

=============================

‘आशा’ चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ एका सेविकेची कथा नाही, तर त्या प्रत्येक महिलांची कथा आहे, ज्या आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, आणि स्वतःसाठी दररोज संघर्ष करतात. आशा एक आदर्श पात्र ठरते, जी आपली जिद्द आणि धैर्याने इतरांना प्रेरणा देते. या चित्रपटाच्या ट्रेलर, गाणे आणि टीझरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ‘आशा’ हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, तो एक प्रभावी आणि भावस्पर्शी अनुभव ठरणार आहे.