Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नवा ट्विस्ट? यशला कळणार त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूचं सत्य?

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत सध्या यश-नेहाची प्रेमकहाणी रंगतेय. यश-नेहा मनानं एकमेकांच्या जवळ येत आहेत. गोष्टी सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना आता मालिकेत वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. यशचे विश्वजीत काका त्याला त्याच्या आई-वडीलांच्या मृत्यूमागचं सत्य सांगणार आहेत. 

आपले आई-बाबा एका कार अपघातात गेले, असा यशचा समज आहे. पण त्यामागचं सत्य काही औरच आहे. यशचे आई बाबा कार अपघातात गेले असले तरी तो अपघात विश्वजीत काकामुळे झालाय, हे अजून यशला माहित नाही. आणि हेच सत्य विश्वजीत काका यशला सांगणार आहेत.

यश आजोबांच्या तब्येतीबद्दल चिंतेत असताना मद्यधुंद अवस्थेतील विश्वजीत काका तिथे येतात आणि आणि यशला चिंतेत बघून नकळतपणे त्याच्यासमोर आई-वडीलांच्या अपघातास आपणच कारणीभूत आहोत आणि ही गोष्ट मनाला सतावतेय, त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय याबद्दल काका बोलून जाणार आहेत.

आता यश-नेहाच्या नात्यात किती प्रॉब्लेम्स आले आहेत, हे आपण मालिकेच्या पहिल्या दिवसापासून पाहतोय. आता कुठे यश नेहानं आजोबांसमोर नात्याची कबुली देत लग्नाच्या निर्णयाबद्दल सांगितलंय. आजोबांना परीबद्दल कसं सांगायचं, आजोबांच्या तब्येतीची सतावणारी काळजी या सगळ्याची चिंता असताना त्यात यशच्या भूतकाळातील आई-बाबांच्या मृत्यूचं एवढं मोठं सत्य यशच्या समोर आलं, तर काय होणार? यश नेहाच्या नात्यात, त्यांच्या लग्नावर या सगळ्याचा मोठा परिणाम होणार का? हे मोठे प्रश्न आहेत. 

माझी तुझी रेशीमगाठ

सध्यातरी मालिकेच्या चाहत्यांना या प्रश्नांची चिंता करण्याची गरज नाही. कारण विश्वजीत काका यशसमोर त्याच्या आई बाबांच्या मृत्यूचं सत्य तर बोलून दाखवणार आहेत, पण ते मनातल्या मनात! वाटलं ना हाशश्श्श्श्….!

त्यामुळे सध्या काळजीस कारण नाही. हा पण आता परीचं घर सोडून जाणं असेल, सिम्मीच्या कुरघोड्या असतील, नेहाच्या वहिनीची लुडबूड असेल हे सगळं मात्र मालिकेत पाहायला मिळणारच आहे हं…! त्यापासून काही यश-नेहा आणि त्यांच्यासोबत आपलीही सुटका नाही.

मालिकेतील रंजक आणि जलद घडामोडींमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. श्रेयस-प्रार्थनाची जोडी, त्यांची खुलणारी लव्हस्टोरी आणि त्यांच्यामधली केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.

====

हे देखील वाचा: बॉलिवूडचं ग्लॅमर अनुभवूनसुद्धा मराठी इंडस्ट्रीशी नातं कधीच न तोडणाऱ्या श्रेयसची यशोगाथा!

====

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेसोबतच श्रेयस लवकरच ‘कौन प्रविण तांबे’ या डिझ्नी प्लस हॉटस्टारच्या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात श्रेयस प्रविण तांबे यांची मुख्य भूमिका साकरतो आहे.

====

हे देखील वाचाBollywood  Upcoming Releases: एप्रिल महिन्यात मनोरंजनाची मेजवानी 

====

प्रविण तांबे हे भारतीय क्रिकेटपटू आहेत. प्रविण तांबे स्पिनर असून, वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू करणारा क्रिकेटर अशी त्यांची ओळख आहे.

– वेदश्री ताम्हाणे