Skip to content Skip to sidebar Skip to footer

आले रे आले ‘पोश्टर बॉईज 2’ आले…धूमधडाक्यात झाले सिनेमाचे पोस्टर लाँच

काही सिनेमे असे असतात ते कितीही जूने असेल तरीही प्रेक्षक त्या सिनेमाला विसरत नाहीत उलट त्याच्या सीक्वेलची वाट पाहतात. मराठी सिनेसृष्टीतील असाच एक सिनेमा आहे तो म्हणजे ‘ पोश्टर बॉईज ‘. २०१४ साली आलेल्या पोश्टर बॉईज या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय मयेकर दिग्दर्शित ‘आले रे पोश्टर बॉईज २’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या २५ फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. (Poshter Boyz 2)

Poshter Boyz 2
Poshter Boyz 2

‘आले रे पोश्टर बॉईज २’ चे पोस्टर पाहता यात तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकुळ घालणार आहेत, हे नक्की. तसेच त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये ‘फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली’ असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’, या उक्तीनुसार कोणाची फसवणूक होणार आहे का?, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तळपदे, एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे निर्माते असून अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. 

Poshter Boyz 2
Poshter Boyz 2

” पोश्टर बॉईज च्या गाजलेल्या पहिल्या भागानंतर पुढचा भाग कधी येणार याबद्दल अनेकांनी मला विचारणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा या पोश्टर बॉईजना घेऊन त्यात कॉमेडीचा तडका मारण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. आता या पोश्टर बॉईजनी परदेशात भरारी घेतली आहे, त्यामुळे याची धमालही दुप्पट झाली आहे. हळूहळू प्रेक्षकांसमोर येणाऱ्या गोष्टी सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणार आहेत, अशी भावना श्रेयस तळपदेने व्यक्त केली. (Poshter Boyz 2)

================================

हे देखील वाचा: ‘रावरंभा’ सिनेमात संतोष जुवेकर पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत… 

================================

पोश्टर बॉईज या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला. वेगळे विषय प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे ‘पोश्टर बॅाईज २’ ही सिनेप्रेमींना आवडेल असा विश्वास सिनेमाच्या संपूर्ण टीमला आहे.