
आईच्या निखळ प्रेमाची भावना व्यक्त करणारे Uttar चित्रपटातील गाणं रिलीज
रेणूका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांची प्रमुख भूमिका असणारा उत्तर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… जगातील सर्वात सुरक्षित,निखळ, नि:स्वार्थ आणि कधीही न तुटणारे नाते म्हणजे ‘आई’. तिच्या उपस्थितीत मुलाला मिळणारा आधार, तिच्या डोळ्यात दिसणारी काळजी आणि तिच्या मिठीत सामावलेली शक्ती यांची तुलनाच होऊ शकत नाही. ‘उत्तर’ या चित्रपटात हे असेच नाते अतिशय संवेदनशीलपणे, वास्तववादी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आले आहे. या नात्याच्या भावविश्वाला अधिक गहिरे करणारे नवीन गाणे ‘असेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, आईच्या नि:स्वार्थ प्रेमाची सुंदर व्याख्या या गाण्यातून अनुभवायला मिळते.

‘असेन मी’ या गाण्याला रोंकिणी गुप्ता यांचा सुरेल आणि भावपूर्ण आवाज लाभला आहे. तेजस आदित्य जोशी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून क्षितिज पटवर्धन यांनी या गीतातील प्रत्येक ओळीत आईच्या प्रेमाचा सार, तिची ममता आणि मुलासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी प्रभावी शब्दात मांडली आहे. याआधी प्रदर्शित झालेले ‘हो आई’ हे गाणे मुलांचे आईवरील प्रेम दाखवत होते, तर ‘असेन मी’ हे गाणे आईच्या प्रेमाचा निखळ प्रवास दाखवते. चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत सोशल मीडियावर पाच मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून आता या गाण्यालाही प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे.
=============================
=============================
तसेच, ‘उत्तर’ चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यानंतर रसिकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या प्रमोशन गाण्यात राधिकाने गायलेलं “हो आई!” हे गाणं त्यातल्या नात्यांच्या गोडाईला आणि त्या प्रेमळ संवेदनांना छान डोकावतं. या गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत, ज्यांनी आधीही अमितराज सोबत “मन धागा धागा जोडते नवा”, “माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं” आणि “तुला जपणार आहे” यांसारख्या सुपरहिट गाण्यांद्वारे रसिकांच्या हृदयात घर केलं आहे. गाण्याची संगीतकार जोडी अमितराज आणि क्षितिज पटवर्धन ही देखील रसिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.(Singer Radhika Bhide)
झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा दिसणार आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकणार आहे.येत्या १२ डिसेंबरला ‘उत्तर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi