Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vin Doghantali Hi Tutena: तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या नव्या मालिकेचा प्रोमो चर्चेत !

Vin Doghantali Hi Tutena Serial: मराठी छोट्या पडद्यावरील दोन आवडते कलाकार तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यांची नवीन मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. 1.35 मिनिटांच्या या प्रोमोनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. (Vin Doghantali Hi Tutena Serial)

Vin Doghantali Hi Tutena Serial

या प्रोमोमध्ये सुबोध भावे एका श्रीमंत, सुसंस्कृत व्यक्तीमत्वाच्या भूमिकेत दिसतो आहे, तर तेजश्री प्रधान मध्यमवर्गीय आणि आत्मभान असलेल्या तरुणीच्या भूमिकेत दिसत आहे. दोघंही त्यांच्या ठरलेल्या लग्नाबद्दल चर्चा करण्यासाठी भेटले आहेत, आणि त्यांच्यात घडणारं संभाषणच या मालिकेची सुरुवात ठरते. दोघांचे भिन्न स्वभाव, भिन्न पार्श्वभूमी असूनही नातं जोडण्याचा हा प्रयत्न म्हणजेच मालिकेचा गाभा असणार आहे. या प्रोमोत एक खास आकर्षण म्हणजे श्रेया घोषालचा आवाज. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ हे गाणं ऐकू येतं आणि ते गाणं श्रेया घोषालने गायलेलं आहे. हेच गाणं पूर्वी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘खुलता कळी खुलेना’च्या टायटल ट्रॅकमधील ओळ होती. त्यामुळे या मालिकेच्या प्रोमोनं जुन्या आठवणींना नवं वळण दिलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा झी मराठीचा जुना सुवर्णकाळ आठवला आहे.

Vin Doghantali Hi Tutena Serial

तेजश्री प्रधान ही प्रेक्षकांना ‘होणार सून मी ह्या घरची’ या झी मराठीवरील मालिकेमुळे चांगलीच परिचित आहे. त्या मालिकेनं तिला जबरदस्त लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून तिने प्रेक्षकांशी नातं टिकवून ठेवलं. पण आता जवळपास नऊ वर्षांनंतर ती झी मराठीवर पुन्हा कमबॅक करत आहे. दुसरीकडे, सुबोध भावे याने ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेलाही भरभरून प्रतिसाद मिळाला होता. काही महिन्यांपूर्वी ‘तदेव लग्नम्’ या सिनेमात दोघंही झळकले होते, आणि आता पुन्हा एकत्र छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.(Vin Doghantali Hi Tutena Serial)

==========================

हे देखील वाचा: Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष !

==========================

“नियतीने जोडी जुळवली की ठरवून लग्न होतं… आणि न ठरवता प्रेम” – अशा हळव्या, विचारप्रवृत्त करणाऱ्या संवादासोबत या मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मालिकेची गोष्ट लग्नाचं वय उलटून गेलेल्या दोन व्यक्तींभोवती फिरते, जे नियतीने जोडले जातात. त्यांची प्रेमकहाणी, त्यांचे संघर्ष आणि सामंजस्य यांची ही अनोखी कथा असेल. प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींना हा प्रोमो जुन्या झी मराठीच्या वाइबची आठवण करून देतो, तर काहींना ही कथा हिंदी मालिकेची प्रेरणा वाटते. तरीही, तेजश्री आणि सुबोधच्या कमबॅकचं सर्वत्र स्वागत होत आहे. सध्या या मालिकेच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण प्रोमोनं निर्माण केलेली उत्सुकता पाहता ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता आहे.