Skip to content Skip to sidebar Skip to footer

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

अनेक बाबतीत आपण असंवेदनशील (अथवा शॉकप्रुफ) झालो असल्याच्या आजच्या अतिशय वेगवान,  स्पर्धात्मक आणि व्यावहारिक युगात विजय देवरकोऺडा आणि रश्मिका मंदाना यांच्या २६ फेब्रुवारी रोजीच्या शाही लग्नाच्याएक्सलुझिव्ह कव्हरेजचे हक्क फक्त आणि फक्त साठ कोटी रुपयांत हवेत अशा नेटफ्लिक्सच्या ऑफरचे कसलेही आश्चर्य वाटले नाही. सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीला किंमत मिळण्याच्या आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला या लग्नाचा थाटमाट पाह्यचाय आणि तो आपणच दाखवावा असे एखाद्या यू ट्यूब चॅनेलला वाटणे अगदी स्वाभाविक आहे.

खरं तर एकाच का? इतरही यू ट्यूब चॅनेल्सनी याच हाय प्रोफाईल लग्नाची तयारी, महाखर्चिक मंडप, संगीत नृत्याची धमाल,वधु वराची वस्त्रे, बाराती, नाचकाम, सेलिब्रिटी पाहुणे, त्यांचा छान छान महाग अति महाग स्टायलिश लूक, लग्नातील अनेक प्रकारचे स्टार्टर्स आणि जेवणावळ, वधुचे नवीन शैलीतील मंगळसूत्र, साऊथच्या भाषेतील उखाणा, त्याचे मग हिदीकरण, या लग्नाच्या थाटमाटातील भले मोठे मोठे हार (ही दक्षिण भारतातील संस्कृती) अशा अनेक गोष्टींबाबत जनसामान्यांना असलेले कौतुक आणि कुतूहल हे विक्रमी लाईक्स देणारे आहे. मग त्याचे हक्क आपल्याच कार्पोरेट कंपनीला मिळावेत यासाठी मोठीच स्पर्धा असणे यात अजिबात आश्चर्य नाही.

आज सेलिब्रिटींच्या लग्न सोहळ्यासाठी अर्धी अधिक चित्रपटसृष्टी हजर असते. पॅन इंडिया चित्रपट निर्मिती युगात तर साऊथचे फिल्मवाले आणि मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टी असे दोन्ही असणार. मेगा इव्हेंटस आहे हा. आणि एकदा का तो ग्लॅमरस इव्हेंटस आहे असे मानलेत की त्यातील अगदी छोट्या छोट्या गोष्टीनाही कव्हरेज मूल्य आले. रक्ष्मिका मन्दानाचे अनेक तोळ्याचे भारी आकर्षक ,‌ देखणं मंगळसूत्र हा जणू एका एपिसोडचा विषय आहे. ते कोणाकडून करुन घेतले, ते डिझाईन कोणी ठरवले, त्याचे बजेट किती अशी प्रत्येक गोष्ट मोलाची. एवीतेवी हल्ली कलाकारांच्या अभिनयाचे फारसे कोणाला कौतुक राहिलेले नाही. त्यांच्या इतर गोष्टीचीच चर्चा फार.

================================

हे देखील वाचा : Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

================================

दिग्दर्शक सांगेल तसा आणि तेवढाच अभिनय करावा अशी कदाचित मानसिकता असू शकते. आणि मेकअप उतरल्यावर भूमिकेतून बाहेर पडणे हे सूत्र असावे. हे बदललेले मनोरंजन क्षेत्र आहे. विजय देवरकोडा आणि रश्मिका मन्दानाने ही साठ कोटीची ऑफर नाकारली असली तरी काय सांगावे, यापेक्षाही मोठी ऑफर अपेक्षित असेल आणि त्यात गैर ते काय? लग्नात एवढा मोठा आहेर मिळतोय ते काही कमी नाही हो.  

चित्रपट कलाकाराचा विवाह हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि दीर्घकालीन गोष्ट. खरं तर त्यांची ती खाजगी गोष्ट. पण ते स्टार असल्याने त्यांच्या लग्नाचा बॅण्ड बाजा वरात एकदम लख्ख फोकसमध्ये असते आणि दिसते. मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमे, वृत्त वाहिनी, मनोरंजन उपग्रह वाहिनी, ब्लाॅगर्स, यू ट्यूबर, पाप्पाराझी ( हे प्रत्येक सेलिब्रिटीजचा जणू ससेमिरा लावतात.), इन्फ्युएन्सर ( सोशल मीडियात रिल पोस्ट करतात) अशा सगळ्यानाच सेलिब्रिटीजचे लग्न कव्हरेजचे महत्त्व असते. अगदी केळवणापासून त्याची सुरुवात होते. अगदी मराठी मनोरंजन सृष्टीतीलही कलाकाराचे केळवण एक्सलुझिव्ह कव्हरेज ठरु लागलेय. त्यात केळवणाचा स्पॉट आणि शॉट महत्वाचा.  

एकूणच ही सेलिब्रिटीजच्या लग्नाची गोष्ट खूपच महत्वाची झाली आहे. मला आठवतंय ते राजेश खन्नाचे लग्न. तो आपली खास मैत्रीण अन्जू महेंद्र हिच्याशी लग्नगाठ बांधणार हे एकदम स्पष्ट असतानाच कहानी मे ट्विस्ट आला. गॉसिप्स मॅगझिनचा अंदाज चुकला. त्याने राज कपूरने डिंपल कपाडियाशी अचानक लग्न केले आणि चाळीचाळीतील पाण्याची रांग, नाक्यावरील कट्टा, कॉलेजचे कॅन्टीन, इराणी हॉटेलमधील राऊंड टेबल अशा सगळीकडेच गप्पांना जणू उत आला. त्यात राजेश खन्नावरचे भरभरून प्रेम होते. त्या काळाचे ते सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य होते. ते खरं कव्हरेज.

================================

हे देखील वाचा : NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….

================================

मला आठवतंय, शक्ती सामंता निर्मित आणि दिग्दर्शित ‘अनुराग’ (१९७३) या चित्रपटासोबत राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील लग्न सोहळ्याचे अतिशय उत्साहाजनक असे दहा मिनिटांचे खास रिळ दाखवले जाई. वृत्तपत्रातील अनुरागच्या जाहिरातीत तशी तळटीप दिली जाई. ते लग्न आणि आता विजय देवरकोडा आणि रश्मिका मन्दानाचे लग्न असा एक बदलता असा खूपच मोठा आणि विविधतेने नटलेला, बदलत असलेला प्रवास आहे, एक डिजिटल शो होऊन जावू देत. फोटो फिचर ते यू ट्यूब चॅनेल असा, माध्यम बदलत बदलत होत चाललेला.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!