Skip to content Skip to sidebar Skip to footer

जेव्हा Talat Mahamood च्या स्वरात रेकॉर्ड झालेली गाणी पुन्हा दुसऱ्या गायकांकडून गाऊन घेतली!

मखमली स्वरांचा गायक तलत महमूद या गुणी गायकाला करिअरच्या उत्तरार्धात अतिशय वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. एकेकाळी दिलीप राज देव या सदाबहार त्रिकूटांचा स्वर असलेला तलत साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अक्षरशः सिनेमाच्या दुनियेतून बाहेर फेकला गेला होता.  दुःख फक्त एवढेच नव्हतं तर त्याने गायलेली गाणी नंतर दुसऱ्या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड केली जात होती.  तलत करिता ही खूप वेदनादायी अशी गोष्ट होता पण काळाचा महिमा अगाध असतो की तिथे कुणाचेच काही चालत नाही. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात तलत  मेहमूद यांनी गायलेला दोन गाण्यांना नंतर इतर पार्श्वगायकांच्या आवाजात रेकॉर्ड केले गेले.

काळ किती निष्ठूर आणि क्रूर असतो याचेच ही उदाहरण होते. ही दोन्ही गाणी संगीतकार नौशाद यांनी स्वरबध्द केली होती.  या कटू प्रसंगा नंतर  संगीतकार नौशाद आणि तलत मेहमूद यांच्यामध्ये अबोला निर्माण झाला. (अर्थात राजू भारतन यांच्या एका पुस्तकाच्या प्रसंगी तलत मेहमूद आणि नौशाद हे दोघेही खूप वर्षानंतर भेटले आणि त्यावेळी अनेक वर्षांपासून चालू असलेला हा अबोला मिटला.)  पण तलत करिता ही खूप वेदनादायी गोष्ट होती. कोणती होती ती दोन गाणी आणि काय होता तो नेमका किस्सा?  

तलत महमूद पन्नासच्या दशकामध्ये एक आघाडीचा पार्श्वगायक होता या काळात त्याने नायक म्हणून काही चित्रपटात काम देखील केले.  पण साठच्या दशकानंतर मात्र या गुणी गायकाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होऊ लागले. 1967 साली राजेंद्र कुमार अभिनीत ‘पालकी’ या चित्रपटाला संगीत नौशाद अली देत होते.  या सिनेमात एक गाणं होतं ‘कल रात जिंदगी से मुलाकात हो गई..’  नौशाद अली यांनी फार वर्षानंतर या गाण्यासाठी तलब मेहमूद यांचा स्वर घेतला होता.  1951 सालच्या ‘बाबुल’ या चित्रपटात तलत शेवटचा नौशाद त्यांच्याकडे गायला होता त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी तलत महमूद नौशाद यांच्याकडे गात होता. गाण्याचे रेकॉर्डिंग चांगले झाले. तलतला खूप आनंद झाला. गाण्याचे चित्रीकरण देखील झाले.  पण त्यानंतर डिस्ट्रीब्युटर्सनी या गाण्यातील तलतचा स्वर बदलून तिथे रफीच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड करा असे सांगितले.  

राजेंद्र कुमार हा देखील या हट्टाला बळी पडला. सर्वांच्या मते तलतच्या स्वराला आता मार्केट व्हॅल्यू राहीली नाही असे म्हणणे पडले.  आणि चित्रित झालेले गाणे पुन्हा एकदा रेकॉर्ड करायचे ठरवले नौशाद यांची पंचाईत  झाली.  त्यांचा या सगळ्या प्रकाराला विरोध होता परंतु निर्मात्याचा आणि डिस्ट्रीब्यूटर च्या दबावा पुढे कोणाचेच काही चालले नाही आणि तलत मेहमूद यांचे हे गाणे बाद झाले! तिथे हे गाणं रफी यांच्याकडून गाऊन घेतले गेले. खरं तर रफी देखील हे गाणं गायला तयार नव्हते परंतु के आसिफ यांनी खूप मिन्नतवारी  केल्यानंतर हे गाणे त्यांनी गायले.  या नंतर पुढच्याच वर्षे म्हणजे १९६८ साली ए भीमसिंह यांच्या ‘आदमी’ या चित्रपटाच्या वेळी पुन्हा असाच प्रकार झाला.  या चित्रपटात एक गाणे मोहम्मद रफी आणि तलत महमूद यांनी गायले  होते.  चित्रपटात हे गाणे दिलीप कुमार आणि मनोज कुमार यांच्यावर चित्रित होणार होते.  

दिलीप कुमारसाठी रफी आणि मनोज कुमारसाठी तलत असे कॉम्बिनेशन होते. गाण्याचे बोल होते ‘कैसी हसीन आज बहारो की रात है..’ पण पुन्हा तलतच्या नशिबाने म्हणा की हित शत्रूनी उचल खाल्ली आणि तलतच्या आवाजातील हे गाणे महेंद्र कपूर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.  नौशाद अली यांनी या ही वेळेला खूप विरोध केला परंतु पुन्हा काही चालले नाही.  तलत च्या जागी महेंद्र कपूर यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड झाले. एक बाब मात्र  चांगली म्हणायला पाहिजे की रेकॉर्डवर हे गाणे रफी आणि तलत मेहमू द यांच्या आवाजात असल्यामुळे पुढे अनेक वर्ष रेडिओवर हेच गाणे लागत होते.  चित्रपटात मात्र हे गाणे रफी आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात आपल्याला दिसते!  

================================

हे देखील वाचा : किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!

================================

प्रत्येक वेळी असंच होतं का तर नक्कीच नाही. 1964 साली ‘जहांआरा’ या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी मदन मोहन यांच्यावर देखील यातील गाणी तलत मेहमूद यांच्या ऐवजी रफीच्या आवाजात गाऊन घ्या असा दबाव आला परंतु “तुम्ही असे सांगत असाल तर मीच हा चित्रपट सोडतो!” असा निर्वाणीचा इशारा दिला आणि चित्रपटात तलत  मेहमूद ची गाणी राहिली! नौशाद अली यांनी आपल्या आत्मचरीत्रात यावर विस्ताराने लिहिले आहे!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!