
Aspirants Season 3: चा ट्रेलर प्रदर्शित; कथेला मिळणार नवं वळण!
‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित लोकप्रिय हिंदी ड्रामा मालिका ‘एस्पिरेंट्स’ (Aspirants) पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या गाजलेल्या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्राइम व्हिडिओने प्रदर्शित केला असून, यामध्ये कथानकाला अधिक व्यापक आणि गंभीर वळण देण्यात आले आहे. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा आता त्यांच्या स्वप्नांच्या पुढील टप्प्यांवर पोहोचली आहे. सिरिजची सुरुवात दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांच्या संघर्षातून झाली होती. मात्र नव्या सीझनमध्ये हे पात्रे आयुष्यातील मोठ्या पदांवर पोहोचल्यावर त्यांना भेडसावणाऱ्या जबाबदाऱ्या, तणाव आणि नात्यांतील गुंतागुंत यांवर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे. जुन्या मैत्री, स्वप्नं आणि तत्त्वांची परीक्षा घेत असताना वास्तव आयुष्यातील कठीण निर्णयांशी त्यांचा सामना कसा होतो, हे या सीझनमध्ये दाखवले जाणार आहे.(Aspirants Season 3 Trailer)

या सीझनचे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या सीजनमध्ये नवीन कस्तुरिया, शिवांकित सिंह परिहार, अभिलाष थपलियाल, सनी हिंदुजा, नमिता दुबे आणि तेंगम सेलीन हे कलाकार पुन्हा त्यांच्या परिचित भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय अभिनेता जतिन गोस्वामी नव्या पात्रासह या सीझनमध्ये सहभागी झाला आहे. ‘एस्पिरेंट्स’ सीझन 3 चा प्रीमियर 13 मार्च रोजी भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर होणार आहे.

मालिकेतील अभिलाषची भूमिका साकारणारे नवीन कस्तुरिया यांनी या नव्या सीझनबद्दल बोलताना सांगितले की, “‘एस्पिरेंट्स’ ही मालिका माझ्यासाठी नेहमीच खास राहिली आहे. प्रेक्षकांनी फक्त अभिलाषचे पात्र पाहिले नाही, तर त्याच्या प्रवासाशी स्वतःलाही जोडले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, तिसऱ्या सीझनमध्ये अभिलाष अशा टप्प्यावर दिसतो जिथे त्याचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात आयुष्य अधिक गुंतागुंतीचे बनलेले असते. लोकांच्या अपेक्षा, वैयक्तिक भावना आणि जवळच्या लोकांना गमावण्याची भीती या सगळ्यांमध्ये तो अडकलेला दिसतो.(Aspirants Season 3 Trailer)
=================================
=================================
या नव्या भागात अभिलाषच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा उलगडताना दिसणार आहे. कागदोपत्री यश मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष आयुष्यातील संघर्ष संपत नाही, उलट तो अधिक आव्हानात्मक बनतो. नात्यांमधील बदल, स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी आणि स्वप्नांनंतर येणारी वास्तवाची परीक्षा या सर्व गोष्टी कथेत प्रभावीपणे दाखवल्या जाणार आहेत. दुसरीकडे संदीप भैय्याचं पात्रही बदलत्या परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांशी आणि निर्णयांशी संघर्ष करताना दिसेल. त्यामुळे मैत्री, महत्त्वाकांक्षा आणि यशानंतरचे वास्तव या सगळ्यांचा संगम असलेला हा सीझन प्रेक्षकांसाठी अधिक रोचक ठरणार आहे.