
Lata Mangeshkar आणि दिलीपकुमार यांच्यातील १३ वर्षांचा अबोला कुणी मिटवला?
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनय सम्राट दिलीप कुमार हे दोघे परस्परांशी एक नाही दोन नाही तर तब्बल तेरा वर्ष एकही शब्द बोलत नव्हते! त्यांच्यातील हा अबोला बॉलीवूड मधील कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय झाला होता. या काळात लता मंगेशकर दिलीप कुमारच्या चित्रपटांसाठी गाणी गात होत्या पण त्यांच्याशी संवाद मात्र अजिबात साधत नव्हत्या. त्यांच्यात हा अबोला का निर्माण झाला होता? आणि त्यांच्यातील हे दुरावलेले संबंध पुन्हा कसे आणि कोणी प्रस्थापित करून दिले? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
लता मंगेशकर सिनेसृष्टी मध्ये गायिका म्हणून आल्या नंतर इथे त्यावेळी नूरजहां , शमशाद बेगम, सुरैया , जोहराबाई अंबालीवाला, अमीर भाई कर्नाटकी यांच्या स्वरांचा मोठा बोलबाला होता. या सर्व पार्श्व गायिका अमराठी होत्या. अमीर भाई कर्नाटकी चा अपवाद वगळला तर उरलेल्या सर्व उत्तरेतून आले होत्या. त्यामुळे त्यांची आपसूकच हिंदी आणि उर्दू या भाषेवर कमांड होती. त्या काळात हिंदी सिनेमांमध्ये उर्दू भाषा आणि उर्दू गीतकारांचं मोठं वर्चस्व होतं त्यामुळे साहजिकच गाण्यांमध्ये उर्दू शब्दांचा भरपूर वापर असायचा. लता मंगेशकर यांचे बालपण महाराष्ट्रात गेल्यामुळे त्यांना हिंदू उर्दूची सवय असण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे त्यांची उच्चार हे मराठी टाईप असायचे.

१९४८ साली एकदा अनिल विश्वास यांच्या सोबत लता मंगेशकर लोकलने मालाडला चालल्या होत्या. त्यांच्या सोबत दिलीप कुमार देखील होते. लता आणि दिलीप कुमार यांची ओळख नव्हती. अनिल विश्वास यांनीच ओळख करून दिली आणि सांगितले, ”ही एक नवीन मुलगी आहे आणि पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आलेली आहे.” जेव्हा दिलीप कुमारने लताकडे बघितले आणि विचारले, “हिचे नाव काय आहे?” तेव्हा त्यांनी सांगितले,” लता मंगेशकर!” त्यावर दिलीप कुमार म्हणाला,”मंगेशकर.. याने ये घाटी लडकी है. ये हिंदी सिनेमा के गाने कैसे गा सकेगी? इन के आवाज मिळतो दाल चावल की बू आती है..!” दिलीप कुमार यांच्या प्रत्येक शब्दागणिक लताच्या रंगाचा पारा वाढत होता. लता मंगेशकरला दिलीपचे हे अपमानास्पद उद्गार अतिशय खटकले! तळपायाची आग मस्तकात गेली इतके अपमानित बोल तिने पहिल्यांदाच ऐकले होते. पण तिने राग गिळला आणि शांत राहिली. संध्याकाळी घरी जाताना ती हाच विचार करत होती जर मला हिंदी सिनेमांमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून यायचं असेल तर मला माझे उच्चार सुधारणे गरजेचे आहे.
संध्याकाळी लताने संगीतकार मोहम्मद शफी यांना बोलावले शफी त्यावेळी नौशाद यांचे सहाय्यक होते. त्यांना लताने आपली अडचण सांगितली. शफी यांनी ताबडतोब एका मौलानांना लताच्या घरी बोलावले आणि तिथून लताची रीतसर उर्दू शब्दोच्चाराची शिकवणी सुरू झाली. त्या उर्दू शिक्षकाने लताला सफाईदार उर्दू कशी बोलायची, उच्चार कसे करायचे, कोणत्या शब्दावर किती स्ट्रेस द्यायचा याचं व्यवस्थित ट्रेनिंग दिलं. लता उपजतच हुशार असल्याने तिने उर्दू शब्दोच्चार तंत्र लवकर अवगत केले. याच काळात लताला बॉम्बे टॉकीजच्या ‘महल’ या चित्रपटासाठी गाणं गायचं होतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला नर्गिस यांची आई जद्दनबाई यादेखील उपस्थित होत्या. त्या स्वतः चांगल्या गायिका, संगीतकार आणि अभिनेत्री होत्या.

लताच्या ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याचे रेकॉर्डिंग होते. संगीतकार खेमचंद प्रकाश होते. जद्दनबाई लताचे गाणे ऐकून खूश झाल्या. लताची आणि त्यांची ओळख यांनी लताला विचारले ,”तुझे नाव काय आहे?” लताने नाव सांगितल्यानंतर जद्दनबाई म्हणाल्या “क्या तुम मराठन हो ?” त्यावर लताने हो म्हणून सांगितले. जद्दनबाई यांनी लताच्या स्वराचे कौतुक करत,” तू कुठल्याच अँगलने मराठी वाटत नाहीस. या गाण्यातील उर्दू उच्चार तू अतिशय अप्रतिम केलेले आहेत. विशेषत: ‘दिपक बगैर कैसे परवाने जल रहे है’ या वाक्यातील बगैर हा शब्द ज्या नजाकतीने तू उच्चारला आहेस त्याला तोड नाही. तू भारतातील सर्वोत्कृष्ट गायिका नक्की बनशील!” जद्दनबाई यांनी केलेलं कौतुक आणि आशीर्वाद लता मंगेशकर यांच्यासाठी खूप मोलाचा ठरला. लता पुढे सफाईदार पणे हिंदी उर्दू गाणी गाऊ लागली.
================================
================================

तरी पण लताच्या डोक्यातील दिलीपकुमारच्या त्या वाक्याचा राग जात नव्हता. १९५७ साली ऋषिकेश मुखर्जी ‘मुसाफिर’ हा चित्रपट बनवत होते’ या चित्रपटात दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात एक युगलगीत रेकॉर्ड होणार होते.’लागी नाही छूटे राम चाहे जिया जाये..’ सलील चौधरी यांचं चित्रपटाला संगीत होतं. लता मंगेशकर यांनी या गाण्यात दिलीप कुमारला चपखल उत्तर द्यायचे ठरवले. लता पूर्ण तयारीनिशी गाणे गायला सज्ज झाली. दिलीप कुमारने सांगितले ‘मी मात्र पुरता घाबरलो होतो. लता मंगेशकर सोबत गायचे म्हणजे काय खाण्याची गोष्ट नव्हती. मी इतका घाबरलो होतो की रेकॉर्डिंग पूर्वी दोन स्कॉचचे पेग घेऊन गेलो होतो.’ गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. लताने त्या गाण्यात दिलीप कुमारला अक्षरशः खाऊन टाकले आठ दहा वर्षांपूर्वी दिलीप कुमार नकळतपणे केलेल्या अन्यायाची परतफेड लताने अशा पद्धतीने केली होती.
================================
================================
लताने आपल्या कृतीतूनच उत्तर दिले होते. पण दिलीप कुमारला वाटले लताने मुद्दाम आपल्याला कमी लेखण्यांसाठी/ हरवण्यासाठी मोठ्या ताकदीने हे गाणे गायले. लताने मुद्दाम आपल्याला पराभूत करण्यासाठी हे गाणे गायले असा समज दिलीपने करून घेतला आणि त्यामुळे पुढची तेरा वर्ष दोघे एकमेकांसोबत एक शब्द देखील बोलत नव्हते! त्यांच्यात एक अघोषित शीतयुद्ध चालू होते. अबोला चालू होता. हा अबोला ख्यातनाम पत्रकार खुशवंत सिंग यांनी मिटवला. ऑगस्ट १९७० च्या इलस्ट्रेटेड विकली या मॅक्झिनमध्ये त्याने लता आणि दिलीप कुमार यांचा एक फोटो छापण्याचे ठरवले आणि इथेच तो सुप्रसिद्ध लता मंगेशकर दिलीप कुमारला राखी बांधत आहे हा फोटो काढला गेला. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून हा फोटो त्या काळात खूप चर्चिला गेला तिथूनच पुढे लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांच्या बहीण भावाच्या संबंध प्रस्थापित झाले. पुढे लता मंगेशकर यांच्या परदेशातील सर्व कार्यक्रमात दिलीप कुमार उपस्थित राहू लागले आणि लताची ओळख ‘मेरी छोटी बहना’ म्हणून करून देऊ लागले.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी