Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vivek : गुणी पण दुर्दैवी अभिनेता विवेक!

मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील अभिनेता विवेक (जन्म २३ फेब्रुवारी १९१६) आज कुणाला आठवण्याची सुतराम शक्यता नाही . पण पन्नास आणि साठ च्या दशकात या देखण्या अभिनेत्याने चांगलीच लोकप्रियता हासील केली होती. त्यांच्या  रूपेरी पडद्यावरील प्रवेशाचा किस्सा अगदी ऐकण्यासारखा आहे. खरं तर विवेकला सिनेमात यायचंच नव्हतं .त्याचं पहिलं प्रेम होतं क्रिकेट आणि दुसरं चित्रकला. घरची परिस्थिती बेतास बात.

घरच्या गरीबीमुळे महागड्या क्रिकेटचा नाद त्याला सोडावा लागला. त्याच्या हातातली दुसरी कला चित्रकला जोपासण्यासाठी त्याने सरळ जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत प्रवेश घेतला. पण इथे देखील घरची गरीबी त्याचं शिक्षण थांबवून गेली.त्याने स्वत: काढलेली चित्रे मुंबईच्या फूटपाथवर बसून त्याला विकावी लागली.कुणीतरी त्याला पुण्यातील प्रभात या चित्रसंस्थेत दाखल होण्याचा सल्ला दिला. विवेक आपली सारी चित्रे घेवून तडक प्रभात मध्ये जावून फत्तेलाल मामांना भेटला.जातिवंत चित्रकार असलेल्या फत्तेलाल यांनी त्याच्या कलेचे कौतुक केले तर विष्णूपंत दामले यांनी “तुमच्या चित्रांपेक्षा तुमचा चेहरा मला अधिक आवडला.आमच्या आगामी ’दहा वाजता’मध्ये हिरोचे काम करणार का?”, अशी सरळ ऑफर केली. अशा प्रकारे त्याचा रूपेरी प्रवेश झाला.

==============

हे देखील वाचा : Mukesh : जेंव्हा मुकेश यांनी शैलेंद्रसिंग गाताना हार्मोनियमची साथ दिली!

==============

गौर गुलाबी वर्णाचा कोकणस्थी चेहरा अतिशय रूवाबदार आणि राजबिंडा होता.त्याच्या अभिनयात एक नैसर्गिक सहजता होती. पण त्याचे दुर्दैव असे की तो ज्या काळात सिनेमातून अभिनय करीत होता तो सारा काळ हा तमाशा प्रधान आणि ग्रामीण सिनेमांनी व्यापून टाकला होता.विवेक हा शहरी चेहर्‍याचा त्या मुळे त्याच्या वाट्याला तशा कमीच भूमिका आल्या.

मराठीतील कृष्णधवल काळातील कौटुंबिक,सामाजिक चित्रपटातून तो हमखास दिसायचा. ’वहिनीच्या बांगड्या’,’सुवासिनी’,’अपराध’,’पोष्टातली मुलगी’,’पुत्र व्हावा ऐसा’, ’देवबाप्पा’, ’बोलकी बाहुली’’देवघर ’, ’ऒवाळणी’ या पन्नासच्या दशकातील चित्रपटातील त्याचा अभिनय अप्रतिम होता.त्यांनी अभिनय केलेल्या ’गृहदेवता’ (१९५७), आणि ‘धाकटी जाऊ’(१९५८) या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रपतीचे रौप्यपदक मिळाले. हिंदीतील प्रतिथयश गायक तलत महमूद यांनी पहिल्यांदा मराठीत पार्श्वगायन विवेक करीता ’पुत्र व्हावा ऐसा’ साठी केले. गीताचे बोल होते ‘यश हे अमृत झाले’ या गाण्यासाठी तलत महमूद ला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला होता. विवेकचे खरे नाव गणेश भास्कर अभ्यंकर ; त्याचे विवेक असे सुटसुटीत बारसे बाळ कुरतडकर यांनी केले.सत्तर एक सिनेमातून त्याने अभिनय केला.

चित्रपटात फारसा जम न बसल्याने त्याने रंगभूमीकडे आपला मोर्चा वळविला. अत्र्यांच्या ’लग्नाची बेडी ’ या नाटकात त्यांनी डॉ कांचन ची भूमिका तब्बल वीस वर्षे केली. त्याचे ५०० च्या वर प्रयोग झाले.या काळात त्याच्या सोबत रश्मीची भूमिका करणार्‍य़ा १६ अभिनेत्री बदलल्या पण डॉ कांचन विवेकचं राहिला! ’दिल्या घरी तू सुखी रहा’,’नाथ हा माझा’ या नाटकातून तो रसिकांपुढे येतच राहिला.आयुष्यभर सदाचार,सदवर्तन याची कास धरत इमाने इतबारे त्याने रंगभूमी व चित्रपट या माध्यमातून कलेची सेवा केली. पण आयुष्यभर गरीबीने त्याचा पिच्छा सोडला नाही. आयुष्यभर सायकलवर फिरणारा कदाचित तो एकमेव अभिनेता असावा. सिनेमा सारख्या मायावी दुनियेत राहून विवेक मद्य आणि मांसाहारापासून कोसो दूर राहिले. आयुष्याच्या उत्तरार्धात सरकारी पेन्शन मासिक ४८० रूपये वर  त्याला गुजराण करावी लागली.९ जून १९८८ साली त्यांच देहावसान झालं.

विवेक यांची कलाकार्कीर्द छोटी असली तरी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांच्या जन्म शताब्दी वर्षात सरकारी पातळीवर या अभिनेत्याची दखल घेणं अशक्य होतं. पण त्यांच्या काही रसिक चाहत्यांनी त्याची दाखल घेतली. डोंबिवली येथील सांगाती प्रकाशनातर्फे २०१७ साली विवेक यांच्यावर एक पुस्तक प्रकशित झाले. त्यांच्या  कलाप्रवासाची कहाणी ‘अभिनेता विवेक’ या पुस्तकात मांडली. या पुस्तकाचे संपादन रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, प्रभाकर भिडे आणि भारती मोरे यांनी केले आहे.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!