
Mi Savitribai Jotirao Phule मालिकेत सुरू होणार सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक-राजसी झळकणार मुख्य भूमिकेत!
स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ (Mi Savitribai Jotirao Phule) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळापासून सुरू झालेली ही कथा प्रेक्षकांना भावनिक आणि प्रेरणादायी प्रवासाचा अनुभव देत आहे. बालपणीची निरागसता, त्यानंतर झालेला विवाह, फुलेवाड्यातील प्रसंग आणि सासरच्या घरात जुळवून घेण्याचा सावित्रीबाईंचा प्रयत्न या सगळ्या गोष्टींनी मालिकेला एक वेगळंच स्थान मिळवून दिलं आहे.(Mi Savitribai Jotirao Phule Serial)

याचबरोबर जोतीरावांच्या शिक्षणासाठीच्या धडपडीचा आणि समाजातील अडथळ्यांना न जुमानता पुढे जाण्याच्या त्यांच्या जिद्दीचा भागही प्रेक्षकांना तितकाच भावला. त्यामुळे ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता सामाजिक संदेश देणारी ठरत आहे. आता या मालिकेत लवकरच एक महत्त्वपूर्ण वळण येणार आहे. सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या आयुष्यातील तारुण्याचा टप्पा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समाजातील रूढी-परंपरांच्या चौकटीत अडकलेल्या काळात सावित्रीबाईंना शिक्षण मिळावं, त्या स्वावलंबी बनाव्यात यासाठी जोतीरावांनी केलेले प्रयत्न या नव्या पर्वात उलगडले जाणार आहेत. स्त्रीशिक्षणाचा पाया रचताना त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करण्याचं धैर्य या कथेला अधिक प्रभावी बनवणार आहे.

या नव्या अध्यायात अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अभिनेत्री राजसी भावे (Rajasi Bhave) सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्या अभिनयातून या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथेला नवी उंची मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या भूमिकेबद्दल बोलताना राजसी भावे म्हणाल्या की, त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील ही पहिलीच मालिका असून तीही स्टार प्रवाहसारख्या लोकप्रिय वाहिनीवर मिळणं हा मोठा सन्मान आहे. सावित्रीबाईंसारख्या महान व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळणं ही अत्यंत खास बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. बालपणीची सावित्रीबाई साकारणाऱ्या तक्षा शेट्टीने ही व्यक्तिरेखा उत्तम उभी केली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
=================================
=================================
दरम्यान, अभिषेक देशमुख यांनीही या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला. इतक्या महान समाजसुधारकाची भूमिका साकारणं ही अभिमानाची गोष्ट असल्याचं ते म्हणाले. ते या मालिकेचे सुरुवातीपासून प्रेक्षक असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच ‘आई कुठे काय करते’नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या परिवारात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांची ही कथा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्यापुरती मर्यादित नाही, तर ती समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी आहे. शिक्षण आणि समानतेचा संदेश देणारा हा नवा अध्याय प्रेक्षकांना लवकरच स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.