
आर्थिक विवंचनेत असताना जॉय मुखर्जी यांना Mohammad Rafi यांनी मदत केली होती!
साठच्या दशकामध्ये जेव्हा हिंदी सिनेमा सप्तरंगात नाहून निघत होता. त्या काळात जॉय मुखर्जी, विश्वजीत या अभिनेत्यांची चलती होती. अभिनयाच्या नावाने हे दोघे कलाकार फार काही ग्रेट वगैरे नव्हते पण केवळ सुंदर लोकेशन्स, मेलडीस म्युझिक आणि देखण्या नायिका मिळाल्यामुळे यांचे चित्रपट सुपर डुपर हिट होत होते. अभिनेता जॉय मुखर्जी हा खरंतर फिल्मी परिवारातून पुढे आला होता. त्याचे वडील शशीधर मुखर्जी हे फिल्मालय स्टुडिओचे प्रमुख होते. त्याचे मामा अशोक कुमार किशोर कुमार हिंदी सिनेमातील जानेमाने चेहरे होते . त्यामुळे इतर कलावंतांच्या वाट्याला जो स्ट्रगल येतो तो जॉय मुखर्जी यांना आला नाही. ‘लव इन सिमला’ (१९६०) या चित्रपटातून त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले नायिका होती साधना. हा चित्रपट आर के नय्यर (ज्यांनी नंतर साधना सोबत लग्न केले!) यांनी दिग्दर्शित केला होता.

पहिलाच चित्रपट सुपर डुपर हिट झाल्यामुळे सर्वांचे लक्ष जॉय कडे गेले. उंची सहा फूट दोन इंच, हँडसम पर्सनॅलीटी, प्रसन्न चेहरा (तरुणींना आवडणाऱ्या डार्क टॉल हँडसम या डी टी एच व्याख्येत बसणारा होता!) त्यामुळे त्याचा भाव खूपच वाढला होता. राज खोसला यांच्या दिग्दर्शनातील ‘एक मुसाफिर एक हसीना’ हा म्युझिकल हिट सिनेमा १९६२ प्रदर्शित झाला. ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेला हा चित्रपट आज देखील संगीत प्रेमी रसिकांना आवर्जून आठवतो. पाठोपाठ नासिर हुसेन यांनी जॉय मुखर्जी आणि आशा पारेख यांना घेऊन १९६३ साली ‘फिर वही दिल लाया हु’ हा चित्रपट निर्माण केला. हा सुद्धा एक म्युझिकल हिट सिनेमा ठरला. अभिनयाच्या नावाने बोंबाबोंब असताना जॉय मुखर्जीचा या सिनेमातील ‘तेरी रातो के लिए दिल को जलाया हमने ..’ गातानाचा भावूक चेहरा रसिकांना आवडून गेला. त्या काळात शम्मी कपूरची चलती होती.
जॉय मुखर्जी डान्स करताना त्याची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा. ‘शागीर्द’ मधील ‘दुनिया पागल है या फिर मै दिवाना..’ या गाण्यात त्याचा प्रत्यय येतो. ‘इशारा’, ‘जिद्दी’, ‘आओ प्यार करे’ ,’लव्ह इन टोकियो’…. हे सिनेमे सुपर हिट झाले. एकापाठोपाठ एक सिनेमे हिट होत असताना १९६८ साली जॉय मुखर्जी यांनी चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात उतरायचे ठरवले. शर्मिला टागोर आणि माला सिन्हा या त्या काळातील लोकप्रिय नायिकांना घेऊन आणि स्वतः हिरोच्या भूमिकेत राहून त्यांनी ‘ हमसाया’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली. संगीत ओ पी नय्यर यांचे होते. दिल की आवाज भी सुन मेरे फसाने पे न जा (रफी) वो हसीन दर्द दे दो (आशा) सिनेमात जॉयचा डबल रोल होता. चांगली स्टारकास्ट असून देखील प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. त्यामुळे जॉय मुखर्जीला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावं लागलं. याच काळातील एक किस्सा जो महंमद रफी यांच्या दरिया दिलदारपणाची साक्ष देतो.
================================
हे देखील वाचा : ‘या’ सिनेमात पहिल्यांदा मोहम्मद रफी यांनी Rishi Kapoor यांच्यासाठी पार्श्वगायन केले!
================================
‘हमसाया’ हा चित्रपट फ्लॉप झाला आहे आणि जॉय मुखर्जीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हे जेंव्हा रफी यांना कळाले तेंव्हा एक दिवस ते जॉय मुखर्जी यांच्या ऑफिसमध्ये गेले. रफी यांना आपल्या ऑफिसमध्ये आलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले. रफीने आपल्या बॅगमधून एक पाकीट काढले त्यात काही पैसे होते ते पाकीट त्यांनी जॉय मुखर्जी कडे दिले. जॉय मुखर्जी ने विचारले,” हे काय?” तेंव्हा रफी यांनी सांगितले,” मला सर्व परिस्थिती माहित आहे. तू खूप मेहनत घेऊन चित्रपट बनवलास. पण दुर्दैवाने या सिनेमाला यश मिळाले नाही. सध्या तू कोणत्या संकटातून जात आहे मला माहित आहे. त्यामुळे फुल न फुलाची पाकळी म्हणून हे पाकीट ठेवून घे.” जॉय मुखर्जी म्हणाला,” अहो याची काही गरज नाही.” पण रफी यांनी खूप आग्रह केला. जॉय मुखर्जी तरी घेत नव्हता तेव्हा रफी म्हणाले, “दिल की आवाज भी सुन”.

‘हमसाया’ या चित्रपटातील रफी यांनी गायलेलं हे गाणं त्या काळात खूप लोकप्रिय झालं होतं. रफी यांनी आपल्या भावना त्या गाण्यातून व्यक्त केल्या होत्या आणि हेच गाणं या सिच्युएशनला देखील फिट बसत होते. रफी यांच्या खूप आग्रहानंतर जॉय मुखर्जी यांनी ते पाकीट ठेवून घेतलं. यानंतर जॉय मुखर्जी यांनी लव इन बॉम्बे(१९७३) आणि राजेश खन्नाला घेऊन ‘छैला बाबू’ (१९७७) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शक म्हणून जॉयची कारकीर्द फारशी यशस्वी झाली नाही. (पण राजेश खन्नाचा ‘छैला बाबू’ त्या काळात बऱ्यापैकी चालला होता) जॉय मुखर्जी यांनी दिग्दर्शन केलेला ‘लव इन बॉम्बे’ त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. या सिनेमाने जॉय मुखर्जी यांना मोठा आर्थिक फटका बसला. खरं तर हा चित्रपट 1972 साली यायला हवा होता पण तो चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला. आज जॉय मुखर्जी यांना कोणी ओळखणे शक्य नाही पण एक काळ त्याने नक्की गाजवला होता.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी