Skip to content Skip to sidebar Skip to footer

Sumita Bhave : मराठी सिनेमाला नवा आयाम देणारी संवेदनशील दिग्दर्शिका!

मानवी नातेसंबधातील अनेक पदरांचा हळुवार वेध घेत ,सुमित्रा भावे यांच्या चित्रपटातील पात्रे प्रेक्षकांपुढे येत असायची. हि पात्रे सच्ची असायची. हाडामासाची असायची. त्यांच्या भूमिकांना प्रामाणिकतेचा ध्यास असायचा. त्या मुळे सुमित्रा भावे  यांचा सिनेमा मनाला आतून भिडायचा. गमंत म्हणजे नव्वदच्या दशकात मराठी सिनेमा दर्जाच्या बाबत घसरणीच्या पातळीवर पोचला होता. अचकट विचकट विनोद करून त्याचा पार चोथा होत होता. त्या वेळी सुमित्रा भावे यांनी या क्षेत्रात एक नवा बुद्धीजीवी सिनेमाचा अध्याय जोडला. त्यांचा सिनेमा प्रेक्षकांना विचार करायला लावायचा. एक सशक्त कथाबीज घेवून तो पडद्यावर यायचा. सुमित्रा भावे यांची दिग्दर्शना सोबतच लिखाण शैली अफाट होती. पात्राच्या एकूणच देह बोलीतून त्या भूमिकेचा अंदाज प्रेक्षकांना येत असे. चित्रपटाशी निगडीत इतर सर्व बाबींवर त्याचं बारीक लक्ष असायचे. त्या मुळेच सिनेमाचे संगीत, छायाचित्रण, संकलन , पात्र निवड, पटकथा, संवाद शैली, पार्श्वसंगीत या पूरक गोष्टींकडे त्या सजगतेने पहायच्या.

चित्रपटाचे वितरण किंवा आपला प्रोडक्ट् विकणं मात्र त्यांना कधी जमलं नाही. असं त्यांनी स्वत: कबूल ही केलं होतं. चांगली कलाकृती बनवणे , त्याची निर्मिती मूल्ये चांगली असणे इथवरच त्यांनी आपली कार्य मर्यादा घालून घेतली होती. अर्थात त्यानी सिनेमासाठी निवडलेले विषय सर्व सामान्यांच्या पचनी पडणे तसे अवघडच होते. आपल्या इथे सिनेमाकडे केवळ मनोरंजन याच हेतूने पाहण्याचा सार्वत्रिक पायंडा असल्याने चाकोरी बाहेरच्या सिनेमाच्या वाट्याला जाणे टाळले जाते. समांतर अथवा कलात्मक सिनेमाला आपल्याकडे कायमच मर्यादित व्यावसायिक यश मिळत आले आहे हा इतिहास आहे. अर्थात व्यावसायिक यश मिळाले नाही म्हणून सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांचे मूल्य अजिबात कमी होत आहे.

सिनेमा म्हणजे खरं तर गोष्ट सांगण्याची कला! सुमित्रा ताई यांनी ती गोष्ट सांगताना स्वत:ची शैली निर्माण केली. सामाजिक / कौटुंबिक समस्यांचा वेध घेताना त्यांनी आक्रस्ताळपणा टाळला. मानवी मनाच्या अंतरंगात शिरून आतून त्या प्रश्नाच्या उकलतेचा विचार केला. दांभिकपणाचे सामाजिक मुखवटे त्यांनी टराटरा फाडण्या ऐवजी त्यांनी संयमितपणे तो प्रश्न हाताळला. एकूणच सुमित्रा भावे यांच्या विचारी, समंजस, परिपक्व आणि बुद्धीमान  स्वभावाला साजेशी अशी त्यांची कलाकृती असायची. सुमित्रा भावे यांची माध्यमावरील समज जबरदस्त होती. चित्रपट हे माध्यम समाजावर मोठ्या प्रमाणावर परिणामकारक असू शकते यावर त्यांची श्रद्धा होती.

त्यानी पन्नास हून अधिक लघुपट बनवले. या लघुपटाना जगभरातून मोठी दाद मिळाली. त्यांचा ‘पाणी’ हा लघुपट तर पाकिस्तानातील ग्रामीण भागात मोठी ‘इनस्पयारिंग मूव्ही ’ ठरला होता. तळमळीची सामाजिक कार्यकर्ती त्यांच्यात सुरुवातीपासूनच दडली  होती. दिल्ली आकाशवाणीवर त्या काही काळ न्यूज रीडर होत्या. नंतर कर्व्यांच्या स्त्री शिक्षण केंद्रात काही काळ त्यांनी अध्ययन केले. महात्मा गांधी त्यांच्या साठी प्रेरणा स्त्रोत होत्या. त्यांच्यावर त्यांना पीएचडी करायची होती.त्यांनी प्रबंध देखील लिहिला होता.  पुढे दादा धर्माधिकारी यांच्या विचारांनी त्या थेट समाजात जावून काम करू लागल्या. ग्रामीण भागातील स्त्रिया, कष्टकरी स्त्रिया ,गुन्हेगार स्त्रिया त्यांचे प्रश्न याचा त्या खोलातून अभ्यास करू लागल्या.

================================

हे देखील वाचा : ‘या’ मराठी महिला दिग्दर्शकांनी गाजवलाय Indian Cinema!

================================

यावर पुस्तक लिहून त्या समस्या मांडू शकल्या असत्या पण त्यांना याहून मोठे ‘माध्यम’ सापडले ते म्हणजे ‘सिनेमा’. १९८४ साली त्यानी ‘बाई’ हा पहिला  लघुपट बनवला. आता त्यांना ‘मास कम्युनिकेशन’ चे समर्पक प्रभावी माध्यम सापडले होते. एवढं हे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे एकूणच त्यांचा स्वभाव हा ‘अभ्यासून प्रगटावे’ असा होता. त्या मुळे त्यांचा प्रत्येक चित्रपट हा विचार करायला लावणारा आशयघन ठरला. आपल्या मराठी प्रेक्षकांचे भाग्य थोर कारण  एन एफ डी सी, दूरदर्शन आणि कार्पोरेट क्षेत्रातील निर्माते त्यांना लाभले आणि सुमित्रा ताई त्यांच्या मनासारख्या कलाकृती साकारू शकल्या.  

एरवी कुणीही हाताळणार नाही असे विषय त्यांनी अतिशय संवेदनशील पणे पडद्यावर आणले. मानवी मनाचा आणि त्या अनुषंगाने समाजमनाचा ठाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने  मराठी भाषेत नितांतसुंदर चित्रपट येऊ शकले. डॉ.मोहन आगाशे यांनी त्यांच्या ‘अस्तु’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात स्मृती भ्रंश (Alzheimer) झालेल्या संस्कृत पंडीताची भूमिका केली होती. माणसाला आपला भूतकाळ सोयीस्कर रीत्या विसरायचाच असतो पण संपूर्ण भूतकाळच हरवून गेला तर? मनाच्या स्मृतीची पाटी एकदम कोरी झाली तर? अशा रुग्णांशी इतरांनी कसा संवाद साधायचा? जवळची रक्ताची नाती दुरावल्यानंतर एक अनोळखी अशिक्षित स्त्री त्यांचा सांभाळ करते. मानवी स्वभावातील नात्यांचे अनेक गुंतागुंतीचे कंगोरे प्रेक्षकांपुढे येतात.

या चित्रपटात आणि एकूणच सुमित्रा ताईंच्या चित्रपटात ‘रूपक’ खूप चांगल्या पद्धतीने येतात. यात हत्ती दाखवला आहे. मुलीची वडलांच्या आजाराबाबतची भूमिका, आपल्या वडलांनाच हा आजार कां याचा विचार आणि analysis त्यातून येणारा अपराधीपणा तर दुसरीकडे तिच्याच वयाच्या स्त्री ने त्यांना आहे तसं accept करणं त्यांचा सांभाळ करणं सारचं कसं मनाला भावविभोर  करणार होतं. इथे कुणीही खल प्रवृतीचे नाही.कुणाचेही काहीही चुकतही नाही. मानवी भावभावनांचा अनोखा खेळ सुमित्रा ताई आणि सुनील सुकथनकर यांनी फार सुरेख रीतीने चितारला होता. मराठीत असे सिनेमे अभावानेच बनतात. पण आपले करंटेपण पुन्हा इथे अधोरेखित होते कारण कमी प्रेक्षक संख्या असल्याने मल्टीप्लेक्स मध्ये याचे शो होवू शकले नाहीत कटू असली तरी वस्तूस्थिती होती! 

  सामाजिक चित्रपटातील ‘भावे प्रयोग’   सुमित्रा भावे या बेसिकली समाज शास्त्रज्ञ होत्या. समाजातील प्रश्नांची त्यांना जाण होती आणि त्यावर आपल्या पद्धतीने उकल काढण्यासाठी त्यांनी सिनेमा हे प्रभावी मध्यम निवडलं. भले त्यांच्या चित्रपटांनी व्यावसायिक यश बघितले नसले तरी त्यांच्या सिनेमाचा impact खूप मोठा असायचा. त्यांचा सिनेमा विचार करायला प्रवृत्त करणारा होता. मानसिक स्वास्थ्य आणि त्यावरील सिनेमे हा त्यांचा अभ्यासाचा विषय असला तरी ‘एक कप च्या’ सारखा माहितीच्या अधिकारावरील सिनेमा असो, ‘वास्तुपुरुष’ सारखा घराची आस दाखविणारा विलक्षण वेगळा असा भन्नाट सिनेमा असो (यात महेश एलकुंचवार यांनी भूमिका केली होती!)  , एडस वरील ‘जिंदगी जिंदाबाद’ सारखा सिनेमा असो , दहावी फ सारखा मुलांच्या सर्जनशीलतेचा अनोखा शोध घेणारा चित्रपट असो सुमित्रा ताईंची भूमिका हि कायम ‘स्टोरी टेलर’ सारखी होती. सुमित्रा भावे या स्वत: एक विद्यापीठ होते. त्यातून अनेक कलावंत घडत गेले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून त्यांनी मानवी शाश्वत मूल्यांचा शोध घेतला. दि बा मोकाशी यांच्या साहित्यकृतीवर आधारीत त्यांचा ‘दिठी’ हा सिनेमा तयार होऊन दोन वर्ष झाली आहेत पण अजूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येवू शकलेला नाही.  

त्वचा विकार ‘कोड’( leucoderma ) हा सुमित्रा भावे यांचा चित्रपट सौंदर्य बाबतचे फसवे निकष आणि व्याख्या यावर भाष्य करणारा होता. यातील डॉक्टर नायिका या व्याधी ने ग्रस्त असते. आपल्या बेगड्या विचार संस्कृतीला आणि सुंदरते बाबतच्या आपल्या पारंपारिक वैचारिक खुज्या मनोवृत्तीला इथे ऐरणीवर आणले होते. खरे सौंदर्य कोणते? ” सुरुवातीला चेहऱ्यावर पांढऱ्या डागांचा मेकअप केल्यावर माझा उत्साह मावळला होता; परंतु ती भूमिका समजून घेताना सौंदर्याकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली.” असा अभिप्राय हि भूमिका साकारणाऱ्या देविका दफ्तरदार ने दिला होता. या चित्रपटात लेखक विजय तेंडुलकर यांनी देखील एक भूमिका केली होती.

‘देवराई ‘ या चित्रपटातून सुमित्रा ताई यांनी मनाच्या दुभंगलेल्या आजाराला (Schizophrenia) केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाचे कथानक लिहिले गेले. अतुल कुलकर्णी ने हि भूमिका अतिशय समर्थपणे पेलली आहे. त्याच्या मनातील द्वंद्व, मनाच्या आतला स्वतःशीच असलेला संघर्ष फार परिणामकारक रीत्या दाखवला गेला होता. इथे रूपक म्हणून देवराई दाखवले आहे. सुमित्रा भावे चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखेला तिच्या भूमिकेला एक ‘लॉजिकल मिनिंग’ देतात. या चित्रपटात अमृता सुभाष देविका दफ्तरदार, सोनाली कुलकर्णी, डॉ मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा देखील अनेक पुरस्कारांनी अलंकृत झालां. 

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने अलीकडे ‘कासव’ नावाचा सिनेमा प्रेक्षकांपुढे आणला. सध्याच्या आभासी जगात वावरणाऱ्या समाज मनाला एकटेपणा खूप त्रास देत असतो. हा एकटेपणा त्याला नैराश्य कडे घेऊन जातो आणि काहींचे संपूर्ण  आयुष्य वैफल्यग्रस्त बनवतो. ‘दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही.’ अशी अवस्था होवून जाते. याच विषयाला अधोरेखित  करणारा हा चित्रपट होता. ‘कासव’ या चित्रपटात सुमित्रा भावे यांनी आजच्या तरुण वर्गाची वैफल्यग्रस्त अवस्था फार संवेदनशील तेने रीतीने मांडली आहे. आहे. देवगडच्या समुद्रकिनाऱ्यावर चितारलेली हे चित्रकथा मनाची मशागत करणारे होती. इथे पुन्हा कासव हे रूपक फार सुंदर रीतीने वापरले गेले.

================================

हे देखील वाचा : Female Centric Movies :  मराठी चित्रपटसृष्टीत ‘स्त्री’शक्तीचा जागर!

================================

कासवाची मादी अंडी घालते आणि समुद्रात निघून जाते . या अंड्यातून मग पिले बाहेर पडतात आणि पुन्हा समुद्राकडे जातात. हा त्यांचा छोटासा प्रवास खूप महत्वाचा असतो. इथेच खरं जपायचं असतं. या सिनेमातील नायकाचा प्रवास हा असाच महत्वाच्या वळणावर आला आहे. तो  असाच कोषात हरवला आहे त्याला समाजात पुन्हा जायचे आहे पण पुरता नैराश्याने वेढला गेला आहे. त्यामुळे त्याची जीवन यात्रा अवघड होवून बसली आहे. कासवाच्या रूपकाची हि कथा खूप छान पध्दतीने को रीलेट केली आहे. त्यांनी या शिवाय पन्नास हून अधिक लघुपट, पंधरा चित्रपट, दूरदर्शन मालिका बनवल्या आहेत. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने मराठी सिनेमाला एक कलात्मक मूल्य दिले. पन्नास हून अधिक पुरस्कारांनी त्यांचे सिनेमे सन्मानित झाले. मराठी मध्ये इतक्या मोठ्या संख्येने पुरस्कार मिळविणाऱ्या सुमित्रा भावे कदाचित एकमेव असाव्यात.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!