
Anil Kapoor राजा, Madhuri Dixit राणी; तरीही ‘राजकुमार’ कोणी नाही पाहिला?
पोशाखी चित्रपट निर्मितीचा खर्च त्यातील लहान मोठ्या व्यक्तीरेखाच्या नक्षीकाम, अंगावरची भारी भारी सौंदर्य प्रसाधने, मेकअपचा थर, कधी महालाचे तर कधी काल्पनिक जगाचे सेट लावणे, कधी ट्रीक फोटोग्राफी (व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञान हे आजच्या डिजिटल युगाचे देणे आहे, तत्पूर्वी स्पेशल इफेक्ट्सवर फार फार मेहनत करावी लागे) या सगळ्यामुळे वाढतो आणि तरी म्हणे, असे बरेचसे पोशाखी चित्रपट हे पालकांनी आपल्या मुलांसह पहावेत, एन्जॉय करावेत.
अशा पोशाखी चित्रपटाचीही आपली एक वेगळी ओळख आहे, परंपरा आहे. त्यात काल्पनिक गोष्टीची (अर्थात फॅण्टसी) भर जास्त असल्याने काहीही दाखवायचे स्वातंत्र्य पटकथा लेखक आणि दिग्दर्शक घेतो. असाच एक चित्रपट पंकज पराशर दिग्दर्शित ‘राजकुमार’ ( मुंबईत प्रदर्शित २२ मार्च १९९६. तीस वर्षे झाली हो या जादुई चित्रपटाला). एक काल्पनिक जगाचे दर्शन घडवणारा हा चित्रपट रसिकांना आवडला नाही.

चित्रपटात अनिल कपूर तलवारबाजी दांडपट्टा घोडेस्वारी करणारा पराक्रमी राजा होता आणि माधुरी दीक्षित याच राजकुमारच्या साहसी व्यक्तीमत्वावर भाळलेली, सौंदर्यवती, नृत्य तरबेज रानी होती. मामला एकदम फिट्ट होता. बरं, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित गल्ला पेटीवरील लोकप्रिय जोडी. प्रयाग राज दिग्दर्शित ‘हिफाजत’ (१९८८) मधील बटाटा वडा खाण्यापासून जमलेली आणि एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’ (१९८८) च्या यशाने एस्टॅब्लिश झालेली. चित्रपटाच्या जगात यशासारखे वजनदार आणि हवेहवेसे असं काहीही नाही. ही जोडी मग सुभाष घई दिग्दर्शित ‘राम लखन’ (१९८९), विदु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिंदा’ (१९८९), इंद्रकुमार दिग्दर्शित ‘बेटा’ (१९९२) वगैरे सुपरहिट चित्रपटात होतीच, याच जोडीचे राहुल रवैल दिग्दर्शित ‘जीवन एक संघर्ष’ (१९९३) सारखे काही चित्रपट रसिकांनी नाकारले आणि पडद्यावर जोडी शोभते, खुलते, रंगते, आवडते म्हणून आपण कोणताही चित्रपट पाहू असं अजिबात नाही, हा ‘पब्लिक कौल’
================================
हे देखील वाचा : Devgan CineX : सेलिब्रिटीज चित्रपट वितरण आणि प्रदर्शनात
================================.
माधुरी दीक्षितकडे तारखांची वानवा नसती तर विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी'(१९९४) या चित्रपटातही अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित हीच जोडी दिसली असती. ‘राजकुमार’ चे एक वैशिष्ट्य मात्र आहे, नसिरुद्दीन शाहची या मसालेदार मनोरंजक चित्रपटात चक्क दुहेरी भूमिका आहे. सत्तप्रवृत्ती असलेला सुरज सिंग आणि दुष्ट प्रवृत्तीचा दुर्जन सिंग. समांतर प्रवाहातील अथवा कलात्मक चित्रपटात कसदार भूमिका साकारल्याने समिक्षकाकडून भारी भारी कौतुक होते, मोठ मोठे पुरस्कार प्राप्त होतात, पण पैसे मिळत नाहीत म्हणून व्यावसायिक चित्रपटात भूमिका स्वीकारायला सुरुवात केली, असे खुद्द नसिरुद्दीन शाहने आपल्या पुस्तकात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, दुपारच्या जेवणाची सोय होतेय यासाठीही त्याने अशाच एका नवप्रवाहातील चित्रपटातून भूमिका साकारली असेही एक सत्य या पुस्तकात म्हटले आहे. हे वाचल्यावर एक गोष्ट अधोरेखित होते, मनोरंजन क्षेत्र अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी खचाखच भरलेय.

‘ राजकुमार ‘ चित्रपटात डॅनी डेन्झोपा, रिना रॉय, फरिदा जलाल इत्यादींच्याही भूमिका आहेत. अंधेरी पश्चिमेकडील आंबोली येथील फिल्मालय स्टुडिओत या चित्रपटासाठी भला मोठा सेट लागला असता निर्माता टूटू शर्माने आम्हा काही निवडक सिनेपत्रकाराना शूटींग रिपोर्टीगसाठी सेटवर आमंत्रित केले असता भरजरी वजनदार पोशाखातील माधुरी दीक्षितला नृत्य दिग्दर्शक सरोज खान एकेक नृत्य स्टेप देत होती आणि नृत्यात पारंगत असलेली माधुरी दीक्षित त्या स्टेप्स नीट समजून घेत घेत परफॉर्म करीत होती. माधुरी दीक्षितच्या यशात तिचं कायमस्वरुपी हास्य, तिचा एकूणच फिटनेस फंडा, तिचा आत्मविश्वास आणि तिचं नृत्य चापल्य या गोष्टींचे जमून आलेले समिकरण आहे आणि सेटवरची लाईव्ह माधुरी दीक्षित हा माझ्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आहे.
================================
हे देखील वाचा : नवीन रुपडे, मराठी चित्रपटाच्या हक्काचे Bharatmata Theatre
================================
अगदी राजश्रीच्या ‘अबोध’ (१९८४) च्या मरीन ड्राईव्हच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘अबोध’च्या टी पार्टीपासून ती यशोगाथा सुरु झाली. साठच्या दशकातही ‘राजकुमार’ (१९६४) नावाचा मनोरंजक चित्रपट पडद्यावर आला होता. के. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन रामानंद सागर यांचे आहे आणि या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, शम्मी कपूर, साधना, ओम प्रकाश आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा ‘ राजकुमार’ रौप्य महोत्सवी यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरला. त्या ‘राजकुमार’ शी अनिल कपूरच्या ‘राजकुमार’शी केवळ आणि केवळ नामसाम्य.

यशाची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. या ‘राजकुमार’ च्या प्रदर्शनास तीस वर्षे पूर्ण झाली इतकेच. पहिला गल्ला पेटीवर यशस्वी ठरल्याने ‘राजकुमार’ नाव सार्थ ठरले, दुसरा ‘ नावापुरता ‘राजकुमार’ ठरला. संपूर्ण पिक्चरभर/ पडदाभर माधुरी दीक्षितला नटण्या थटण्याची अतिशय कम्माल संधी मिळाली आणि तिने त्यात शंभर टक्के रस घेतला. ती ‘राजकुमारी’ ठरली. बाकीचा चित्रपट विसरला गेला. आठवणींत रहावे असे त्यात काहीही नव्हतेच.