Skip to content Skip to sidebar Skip to footer

Parasmani : चित्रपटाचा काही भाग रंगीत असेल…..

आपल्या चित्रपटसृष्टीच्या अतिशय चौफेर आणि विविधरंगी प्रवासातील काही काही गोष्टी आज छोट्या अथवा किरकोळ वाटतील, पण पूर्वीच्या काळात त्या अतिशय रंजक आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. असाच एक फंडा, या चित्रपटातील काही भाग (वा एखादं गाणं) रंगीत असेल…. कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटांचा तो काळ होता, पन्नासच्या दशकात हळूहळू रंगीत चित्रपट पडद्यावर येऊ लागले, तरीही १९७१ सालापर्यत कृष्ण धवल चित्रपट पडद्यावर येत आणि प्रेक्षकांचीही तशी काही तक्रार नव्हती. गोष्ट चांगली हवी,  गीत संगीत ऐकण्यासारखे हवे आणि चित्रपटाने पैसा वसूल मनोरंजन करावं एवढीच माफक अपेक्षा असे.

खूप समजूतदार असा प्रेक्षकवर्ग तेव्हा होता.‌ तांत्रिकदृष्ट्या अनेक चित्रपट सपक वा सामान्य असत. पण तरीही त्या काळातील स्वप्नाळू,  आशावादी,  कष्टकरी वर्गाला त्यात फार काही आक्षेपार्ह वाटत नसे. अशाच रसिकांनी आपल्या देशात चित्रपट रुजवला,  वाढवला,  पसरवला आहे. अशातच एखाद्या चित्रपटाच्या जाहिरातीत ‘यातील एक गाणे’ रंगीत पाहा असं म्हटलं असेल तर? के. असिफ निर्मित आणि दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (१९६०) या चित्रपटातील ‘अनारकली’ मधुबालाच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वातील गोडवा असलेल्या आणि बेहतरीन नृत्याचे ‘प्यार किया तो डरना क्या….’ हे काचमहालातील गाणे रंगीत आहे असे या चित्रपटाच्या वृत्तपत्रातील जाहिरातीत म्हटले जात असे आणि त्याची त्या काळातील चित्रपट रसिकांना विशेष पर्वणी वाटत असे.

कृष्ण धवल चित्रपटात एकच गाणे रंगीत हा एक प्रकारचा बोनसच. पण चित्रपटाच्या आकर्षकतेत भर घालण्यासाठी ते रंगीत असे. आणि पडदाभरची रंगांची ही उधळण मधुबालाच्या अप्रतिम कसदार नृत्याने आणखीनच भारी दिसते. याच रंगात अकबर पृथ्वीराज कपूर आणि सलिम दिलीपकुमार यांच्या भावमुद्रा अधिकच बोलक्या ठरल्या. छायाचित्रणकार आर. डी. माथूर यांनी या विषयातील भव्यता पडदाभर छान खुलवली. हाच चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन २००४ साली संपूर्णपणे रंगीत करुन पुन्हा एकदा अतिशय थाटामाटात प्रदर्शित करण्यात आला तेव्हा उगाच सगळे रंग सारखे वाटले. तांत्रिकदृष्ट्या रंगीत म्हणजे खरंच रंग भरला का?

वहिदा रेहमान यांनी कपिल शर्मा शोमध्ये सांगितलेला एक भन्नाट किस्सा. (हा शो विनोदी म्हणून ओळखला जात असला तरी अनेक सेलिब्रिटीज फ्लॅशबॅकमध्ये जात एकादी छान आठवण सांगतात आणि आपली इच्छा असेल तर ज्ञानात भर पडते.) एम. सादिक दिग्दर्शित आणि गुरुदत्त फिल्म निर्मित ‘चौदहवी का चाँद’ (१९६०) हा चित्रपट पूर्णपणे कृष्ण धवल. आणि ते जाणूनच त्या काळातील सगळेच छायाचित्रणकार प्रकाश योजना करीत. या चित्रपटात गुरुदत्त, वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका. या चित्रपटातील शकील यांच्या गाण्याना रवि यांचे संगीत. चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. विशेषतः मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ‘चौदहवी का चाँद हो या आफताब हो’ हे गाणे तर वहिदा रेहमान यांच्या सहज सौंदर्याने जास्तच खुलले.

चित्रपट लोकप्रिय ठरला, हाऊसफुल्ल गर्दीत चालू लागला आणि गुरुदत्तला वाटले, हे गाणे आपण आपण रंगीत स्वरुपात चित्रीत करुयात, चित्रपट रसिकांना ती एक विशेष पर्वणी ठरेल. पण या चित्रपटाचे छायाचित्रणकार नरीमन इराणी यांनी गुरुदत्त यांना तसं करणं कसं चूक आहे आणि त्यात गाण्याचा मूड बिघडेल असे समजावून सांगितले आणि गुरुदत्तनी आपली इच्छा रद्द केली. खुद्द वहिदा रेहमान यांनीच ही गोष्ट सांगितली असल्याने उत्सुकता वाढली. ( सोशल मीडियात एवढाही महत्वाचा भाग पाह्यला मिळतोय.)

================================

हे देखील वाचा : पणजोबांची ९२ वर्षांची परंपरा Ranbir Kapoor पुढे चालवणार!

================================

त्या काळातील अशा चित्रपटातील गाणे आणि काही भाग रंगीत अशा गोष्टी अधूनमधून घडत. बाबुभाई मिस्त्री आणि पंडित मधुर निर्मिती आणि बाबुभाई मिस्त्री दिग्दर्शित ‘पारसमणी’ ( मुंबईत प्रदर्शित ५ एप्रिल १९६३) या कृष्ण धवल चित्रपटाबाबतही अगदी असेच. चित्रपटातील ‘हसता हुआ नुरानी चेहरा’ अशी काही गाणी आणि काही दृश्ये रंगीत होती.‌ आणि त्या काळातील चित्रपट रसिकांना यांचंही अप्रूप वाटले. बरं असा काही भाग रंगीत म्हणून तिकीट दरात वाढ असं काहीही व्यावसायिक धोरण नव्हते.‌ प्रेक्षकांना भरघोस आनंद द्या अशी निर्माता आणि दिग्दर्शकाची भावना असे. या चित्रपटात महिपाल, गीतांजली, नलिनी चोणकर, जुगल किशोर, अरुणा इराणी, जीवनकला यांच्या प्रमुख भूमिका. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीचा हा पहिलाच चित्रपट. कालांतराने गिरगावातील गल्ली चित्रपटातील हा फेवरेट.

================================

हे देखील वाचा : Anil Kapoor राजा, Madhuri Dixit राणी; तरीही ‘राजकुमार’ कोणी नाही पाहिला?

================================

मराठी चित्रपटातही अशा गोष्टी अनेक. चित्रपती व्ही. शांताराम निर्मित आणि दिग्दर्शित ‘पिंजरा’ (१९७२) च्या खणखणीत यशानंतर मराठीत रंगाचे महत्त्व उमजलं. तरीही जवळपास दशकभर तरी कमी अधिक प्रमाणात कृष्ण धवल चित्रपट पडद्यावर येत. त्यातही काही कृष्ण धवल मराठी चित्रपट हे असेच एखादं गाणं रंगीत या स्वरुपात पडद्यावर येत. काही नावं सांगायची तर, फिल्म कला निर्मित आणि जयवंत पाठारे दिग्दर्शित ‘आलय तुफान दर्याला’ (१९७३), या चित्रपटाची कथा आणि छायाचित्रणही जयवंत पाठारे यांचे आहे. आमच्या गिरगावातील रहिवाशी असलेले जयवंत पाठारे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित छायाचित्रणकार.‌ दत्ता माने दिग्दर्शित ‘हात लाविन तेथे सोनं’ ( १९७३) या चित्रपटातीलही काही भाग रंगीत होता.‌ या चित्रपटात निळू फुले, सुषमा, राजशेखर, वसंत शिंदे इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा इतिहास अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून घडला आहे. आज त्या किरकोळ वाटतात पण त्या काळात वैशिष्ट्यपूर्ण होत्या.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!