
Gaurav More: “झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण…” फिल्टरपाड्याचा बच्चनसाठी अभिनेत्री Chhaya Kadam यांची खास पोस्ट!
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःच्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा गौरव मोरे (Gaurav More) सध्या आनंदाच्या दुहेरी कारणामुळे चर्चेत आला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव आता आपल्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी झेप घेताना दिसत आहे. मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर त्याने केवळ करिअरमध्येच नव्हे, तर आयुष्यातील मोठं स्वप्नही पूर्ण केलं आहे. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या गौरवने मुंबईत स्वतःचं आलिशान घर घेतलं आहे. विशेष म्हणजे, त्याच्या घराबाहेर लावलेली नेमप्लेटही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असं नाव अभिमानाने मिरवत त्याने आपल्या संघर्षमय प्रवासाची आठवण जपली आहे. झोपडपट्टीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आज एका सुंदर घरापर्यंत पोहोचला, ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.(Gaurav More)

गौरवचा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत साध्या परिस्थितीतून तो पुढे आला. छोट्या छोट्या भूमिकांपासून सुरुवात करत, त्याने आपल्या विनोदी शैलीने आणि भन्नाट टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मंचाने त्याला खरी ओळख दिली, जिथे त्याच्या प्रत्येक परफॉर्मन्सने प्रेक्षकांची दाद मिळवली. आज तो मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा बनला आहे. या आनंदात आणखी एक मोठी बातमी म्हणजे गौरवने गुपचूप लग्नही उरकलं आहे. त्याच्या या खास क्षणात अनेक कलाकारांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला. याच दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांनी गौरवच्या नव्या घरी भेट देत त्याचं अभिनंदन केलं. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत गौरवच्या प्रवासाचं सुंदर वर्णन केलं आहे.
===================================
===================================
छाया कदम यांनी लिहिलं की,“स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला शिकवतात. स्वप्न जगायला शिकवतात, आणि तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या लहानापासून प्रेमात वेडा असलेला गौरव पुढे त्याच्या अशाच स्वप्नांचं एक घर उभं करतो. फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा गौरव, स्वतःच्या कष्टाने आणि कामावर असलेल्या अपार निष्ठेने एक दिवस स्वतः तारा होऊन जातो. जिद्द,चिकाटी आणि भारावलेपण घेऊन,अमिताभजींच्या प्रेमात ‘भूतनाथ’ झालेला गौरव, पुढे परिस्थितेच्या सगळ्या ‘दिवार’ तोडत, सोबत ‘शहेनशाह’ चा आत्मविश्वास घेऊन, आपल्या कामातून दरवेळी ‘शोले’ भडकवून, एक दिवस स्वतःच्या पायावर ‘डॉन’ सारखा उभा राहून, असल्या नसलेल्या सगळ्या शक्यतांना ‘वजीर’ होऊन चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपला वाटतो. आणि हेच त्याचे आपलेपण गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ करतात.”

पुढे त्यांनी अस ही लिहिलं आहे की,“कारण या सगळ्या प्रवासात त्याच्यातला निखळ माणूस जराही हलत नाही. उलट तो अजून रोज नव्याने उजळत जातो.आणि काय कमाल आहे, ज्या झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण गेले त्याचं झोपडपट्टीच्या जागेवर आज उंच बिल्डिंग बांधली गेली आहे, आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका सुंदर घरात गौरवच गृहप्रवेश झाला.” “गौरव ! तुझ्या एका जिद्दीने खूप जणांना स्वप्न पाहायची तू हिंमत दिलीस. अजून खूप मोठा हो. इतका मोठा हो की एक दिवस तुझ्या यशाचा ‘जलसा’ करायचा आनंद आम्हा सगळ्यांना मिळू दे. तुझ्या पुढील सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि घरासोबतच आयुष्यात आलेल्या जोडीदाराच्या ही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप गोड आहे प्रियांका. बाकी, तुझ्यातला ‘नटवरलाल’ असा अभिनय क्षेत्रातले तुझे ‘सरकार राज’ अबाधित ठेवो. खूप खूप प्रेम. शुभेच्छा. आणि शेवटचे…. परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन…मैं हूँ फिल्टरपाड्याचा बच्चन.”(Gaurav More)
==============================
हे देखील वाचा: Khatron Ke Khiladi 15 मध्ये Orry ची होणार एंट्री? सोशल मिडीयावर चर्चांना उधाण…
==============================
एकंदरीत, गौरव मोरेचा हा प्रवास केवळ यशाचा नाही, तर संघर्ष, मेहनत आणि स्वप्नांच्या पूर्ततेचा आहे. छोट्या सुरुवातीपासून मोठ्या उंचीपर्यंत पोहोचण्याची त्याची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. आता नव्या घरासह आणि आयुष्यातील नव्या टप्प्यासह गौरवच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.