
Kismat Movie : कजरा मोहब्बत वाला आंखियो में ऐसा डाला…
सत्तरच्या दशकातील सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश साठच्या दशकात च झाला होता. राज कपूर, नूतन यांचा ‘छलिया’ हा त्यानी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. यानंतर साठच्या दशकात त्यांनी ब्लफ मास्टर (1964), बदतमीज (1966) या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. साठ च्या दशकातील 1968 सालचा ‘किस्मत’ हा एक उल्लेखनीय चित्रपट होता. या चित्रपटात विश्वजीत आणि बबीता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आज हा चित्रपट सर्वांच्या विस्मृतीत गेला असला तरी यातील गाणी मात्र आज देखील लोकप्रिय आहेत. विशेषत: यातील ‘कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला’ हे आयकॉनिक सॉंग तर आज देखील गाण्यांच्या मैफिलीत आपली वेगळी ओळख टिकवून आहे.
या चित्रपटाला संगीत ओपी नय्यर यांचे होते तर गाणी एस एकह बिहारी यांनी लिहिली होती. ‘कजरा मोहब्बत वाला..’ हे गाणे शमशाद बेगम आणि आशा भोसले यांनी गायलं होतं. शमशाद आणि ओ. पी. नय्यर यांचं हे शेवटचं गाणं ठरलं. पन्नास च्या दशकात या जोडीने खूप लोकप्रियता मिळवली होती. ‘किस्मत’ हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट होता. चित्रपटाला एव्हरेज यश मिळाले म्हणून देसाई यांनी कधीही आपल्या आवडत्या चित्रपटात या सिनेमाचे नाव घेतले नाही किंबहुना हा चित्रपट मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केला आहे हेच अनेकांना माहिती नाही. या चित्रपटातील ‘कजरा मोहब्बत वाला..’ हे गाणं विश्वजीत आणि बबीता यांच्यावर चित्रित झाले होते.

या गाण्याची गंमत म्हणजे यात विश्वजीत मुलीच्या पेहरावत तर बबीता मुलाच्या पेहरावत आहे! हे क्रॉस ड्रेसिंग कदाचित पहिल्यांदाच भारतीय सिनेमात ‘किस्मत’ या चित्रपटात दाखवले गेले असेल. या गाण्याची चाल ओ पी यांनी उत्तर प्रदेशातील एका लोकगीतावरून घेतली होती. या गाण्यातील हार्मोनियमचे पिसेस अतिशय जबरदस्त होते आणि आजही लोकप्रिय आहेत. या गाण्यात हार्मोनियम सोनिक वर्मा यांनी वाजवला होता हे सोनिक म्हणजे संगीतकार सोनिक ओमी पैकी एक. हे अंध होते पण हार्मोनियम वर त्यांचा हात फार सफाईदारपणे चालत होता. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक पी एल राज हे होते. तब्बल आठ दिवस या गाण्याचे चित्रीकरण चालले होते. या गाण्याला त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

उत्तर प्रदेश बिहारमध्ये चित्रपटगृहात जेव्हा हे गाणे सुरू व्हायचे तेव्हा प्रेक्षक शिट्या वाजवायचे , पडद्यावर दौलत जादा करायचे! या गाण्यातील विश्वजीत ची मुलीच्या पेहरावतील अदा प्रेक्षकांना खूपच आवडली हप्ती. विश्वजीत हा तसा देखणा आणि नाजूक. त्या मुळे कधीच पुरुषी हिरो वाटला नाही. त्याच्या भूमिका ह्या कायम सॉफ्ट रोमँटिक अशाच असायच्या. त्यामुळे एका लोकल मॅक्झिनमध्ये विश्वजीत ने यापुढे मुलीच्या पेहरावतीलच भूमिका कराव्यात ते त्याला शोभून दिसते असा रीमार्क मारला गेला. विश्वजीत यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही .त्यांनी या मासिकावर आबरू नुकसानीचा दावा ठोकला होता!
================================
हे देखील वाचा : नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?
================================
या किस्मत चित्रपटातील अन्य गाणी देखील बेफाम लोकप्रिय ठरली होती. महेंद्र कपूर यांच्या स्वरातील ‘लाखो हे यहा दिलवाले पर प्यार नही मिलता..’ हे गिटारचा अतिशय सुंदर वापर असलेले गाणं विश्वजीत वर चित्रीत होतं. या गाण्यातील गिटार दिलीप नाईक यांनी वाजवली होती. ‘आंखो मे कयामत के काजल होठो पे गाजब की लाली है .. ‘हे महेंद्र कपूर यांचे गाणे देखील त्या काळातील तरुणाई मध्ये लोकप्रिय झाले होते. अओ हुजूर तुमको सितारों में ले चलू दिल झूम जाये ऐसे बहारो मे ले चलू….‘ हे आशा भोसले च मादक स्वरातील गाणं आजच्या जमान्यातील रिमिक्स वाल्यांसाठी खूप आवडीचं गाणं आहे. हा चित्रपट अनेक अर्थाने युनिक होता. ओ पी नय्यर आणि मनमोहन देसाई फक्त याच चित्रपटात एकत्र आले होते मनमोहन देसाई आणि विश्वजीत तसेच मनमोहन देसाई आणि बबीता यांचा देखील हा एकमेव चित्रपट आहे.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी