
राज खोसला यांच्या ‘या’ सिनेमातून Moushumi Chatterjee ला डच्चू का मिळाला होता?
राजेश खन्ना सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धातील सुपरस्टार होता. या काळात त्याने तब्बल १७ सलग सुपरहिट सिनेमे दिले होते. हा रेकॉर्ड त्याच्या नावावर अद्यापही कायम आहे. या काळात राजेश खन्नाचा शब्द म्हणजे अखेरचा शब्द समजला जायचा! त्याच्या इशारावर बॉलीवूड चालत असेल असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ‘उपर आका और नीचे काका’ असं त्या काळात म्हटले जायचे. राजेश खन्नाच्या त्या काळातील ऑरा मुळे एका सिनेमातून चक्क त्या काळातील एका सुपरहिट नायिकेला काढून टाकलं होतं. मुहूर्ताच्या शॉटला ही नायिका उपस्थित होती पण नंतर तिला या सिनेमातून डच्चू देण्यात आला आणि तिच्या जागी राजेश खन्नाच्या पसंतीच्या नायिकेचा सिनेमात प्रवेश झाला. कोणती होती ती नायिका? कोणता होता तो चित्रपट आणि काय होता तो नेमका किस्सा?
हा किस्सा होता राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी ’ या चित्रपटाचा! ७ मार्च १९७५ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘प्रेम कहाणी ’ हा चित्रपट १९७३ साली सेटवर गेला होता. या चित्रपटाची ओरिजनल स्टार कास्ट राजेश खन्ना, मौसमी चटर्जी आणि शशी कपूर अशी होती. या सिनेमाचा मुहूर्त १९७३ साली झाला होता. या मुहूर्ताच्या शॉटला मौसमी चटर्जी उपस्थित होती पण नंतर राजेश खन्नाच्या सुचनेने तिला या सिनेमातून डच्चू मिळाला आणि तिथे त्याच्या लाडक्या मुमताज ची वर्णी लागली. हे असं का घडलं? खरंतर राज खोसला यांनी मौसमी सोबत कच्चे धागे हा चित्रपट 1973 साली केला होता. या चित्रपटात मौसमी सोबत विनोद खन्ना आणि कबीर बेदी होते. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यावेळी राज खोसला यांनी तिला आपल्या आगामी चित्रपटात घेण्याचे वचन दिले होते.

मौसमी चटर्जीचा बॉलिवूडचा पहिला चित्रपट होता शक्ती सामंत यांचा ‘अनुराग’. यात तिचा नायक विनोद मेहरा होता. यात राजेश खन्नाचा स्पेशल एपीरेंस होता. पहिल्याच चित्रपटात मौसमी चटर्जी गाजली. तिला या सिनेमासाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. खरंतर ती बॉलीवूड सिनेमात आली होती तेव्हा विवाहित होती. (संगीतकार हेमंतकुमार यांच्या मुलांशी तिचा विवाह झाला.)पण तरीही तिला चांगली लोकप्रियता मिळाली. ‘अनुराग’ च्या यशानंतर अनेक निर्मात्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. त्यात एक होते राज खोसला. ‘कच्चे धागे’ हिट झाल्यानंतर राज खोसला यांनी ‘प्रेम कहानी ’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. राजेश खन्नाची नायिका म्हणून त्यांनी मौसमीला साईन केले. पण त्या काळात राजेशची खरी जोडी जमली होती मुमताज सोबत!
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
या दोघांचे ‘दो रास्ते’,’अपना देश’, ‘आप की कसम’, ‘रोटी, दुश्मन’ .. असे अनेक सिनेमे सुपरहिट झाले होते. राजेश मुमताजचा ‘दो रास्ते’ हा चित्रपट राज खोसला यांनीच दिग्दर्शित केला होता. राजेश खन्नाच्या हट्टा पुढे दिग्दर्शकाचा नाईलाज झाला आणि मौसमी चटर्जी हिच्या जागी मुमताज ची वर्णी लागली. राजेश खन्ना आणि मुमताज यांचा हा शेवटचा यशस्वी चित्रपट ठरला. यानंतर ती मयूर वाधवानी आणि सोबत लग्न करून लंडनला शिफ्ट झाली. ‘प्रेम कहाणी’ हा चित्रपट नावाप्रमाणेच एक त्रिकोणी प्रणय कथानक असलेला सिनेमा होता. या चित्रपटात विनोद खन्नाची देखील एक छोटी भूमिका होती. खरं तर ही भूमिका आधी फिरोज खानला ऑफर झाली होती पण नंतर ती विनोद खन्नाकडे आली.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
या चित्रपटातील गाणी त्या काळात प्रचंड गाजली होती. किशोर कुमार, लता मंगेशकर, मुकेश आणि रफी या टॉपच्या गायकांनी या चित्रपटातील गाणी गायली होती. दोनो किसी के नजर नही आये चल दरिया में डूब जाये, फूल आहीस्ता फेको फूल बडे नाजूक होते है , दोस्तो में कोई बात चल जाती है .. स्वातंत्र्य पूर्व काळातील कथानक या सिनेमाला होते. ‘शोले’ प्रदर्शित व्हायच्या पांच महिने आधी हा चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. मौसमीला सिनेमातून काढून टाकावे लागले याचे शल्य राज खोसला टोचत होते. त्याची भरपाई त्यानी मौंसमी ला ऋषि कपूर सोबत कास्ट करून ‘दो प्रेमी ‘ हा चित्रपट बनवून केली! राजेश खन्ना आणि मौसमी यांनी हमशकल,भोला भाला,प्रेम बंधन या सिनेमात एकत्र भूमिका केल्या.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी