
Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट गोष्ट!
काही काही गाण्यांचं भाग्य खूप थोर असतं! तसं नसतं तर हे गाणं रसिकांच्या समोर कधीच आलंच नसतं कारण ज्या चित्रपटासाठी हे गाणं लिहिलं होतं तो चित्रपटच अर्धवट अवस्थेत डब्यात गेला. त्या सोबत हे गाणे देखील डब्यात गेले . हे गाणं असंच कुठेतरी अंधार गर्तेत पडून राहिलं असतं. पण या गाण्याचे भाग्य थोर योग्य संधी मिळताच हे गाणं रसिकांच्या पुढे आलं आणि आज पन्नास साठ वर्षानंतर देखील एक हळुवार प्रेम गीत म्हणून लोकप्रिय आहे. कोणतं होतं ते गाणं? आणि काय होतं तो नेमका किस्सा?
साठ च्या दशकाच्या प्रारंभी निर्माता दिग्दर्शक जगत शर्मा एक चित्रपट बनवत होते ‘भुल न जाना’ या चित्रपटाची गाणी इंदीवर लिहित होते तर संगीत दान सिंग देत होते. या चित्रपटासाठी इंदीवर यांनी एक गाणं लिहिलं होतं शब्द अतिशय साधे, सोपे, सरळ आणि प्रासादिक शुद्ध हिंदी भाषेतील होते. त्या काळात खरंतर उर्दू मिश्रित हिंदी गाण्यांचा बोलवाला होता. असं असताना इंदीवर यांनी शुद्ध हिंदीत हे गाणं लिहिलं होतं. परंतु दुर्दैवाने आर्थिक अडचणी मुळे हा चित्रपटात मध्येच बंद पडला आणि सर्वच गोष्टी डब्यात गेल्या! त्यानंतर 1968 साली ज्येष्ठ साहित्यिक गोवर्धन त्रिपाठी यांच्या ‘सरस्वतीचंद्र’ या गाजलेल्या गुजराती कादंबरीवर एक चित्रपट बनत होता.

चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद सरय्या होते. चित्रपटात मनीष आणि नूतन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते या चित्रपटातील एका सिच्युएशन साठी एक गाणे हवे होते तेव्हा इंदीवर यांना आपल्या सात-आठ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ गाण्याच्या आठवण झाली. त्यांनी दिग्दर्शक जगन शर्मा यांना त्या गाण्याची मागणी केली. ते म्हणाले “नाही तरी चित्रपट डब्यातच गेला आहे तर हे गाणे सरस्वतीचंद्र साठी वापरता येईल !” जगन शर्मा यांनी देखील ते गाणे इंदीवर यांना दिले. गाण्याचा आधीचा मुखडा होता ‘मतवाले नैन जैसे नील गगन पंछी की तरह खो जाऊ मै चंदन सा बदन चंचल चितवन ..’ गीतकार इंदीवर यांनी या गाण्यात थोडा फार बदल करून हे गाणे मुकेश यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. यमन रागावर आधारित हे गाणं आज देखील एक सॉफ्ट रोमँटिक सॉंग म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे ‘चंदन सा बदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना मुझे दोष न देना जगवालो हो जाऊ अगर मै दिवाना..’ अशाप्रकारे एका डब्यात गेलेल्या गाण्याला पुनर्जीवन मिळाले.

‘सरस्वती चंद्र’ हा चित्रपट 1968 साली जरी प्रदर्शित झाला असला तरी ब्लॅक अँड व्हाईट होता. यातील आशय रसिकांच्या काळजात घर करणारा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी नितांत सुंदर बनली होती. लता मंगेशकर यांनी गायलेल्या चारुकेशी रंगावरील ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिये ये मुनासिब नही आदमी के लिये ..’या गाण्याने तर कित्येक पराभूतांच्या आयुष्यात पुन्हा उभारी देणारे गाणे ठरले. या चित्रपटातील लता -मुकेश यांच्या स्वरातील ‘फूल तुम्हे भेजा है खत मे फूल नही मेरा दिल है ..’ या गाण्याचा देखील एक किस्सा लोकप्रिय आहे. एकदा संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या लेटर बॉक्स मध्ये एक पत्र आले त्या पत्रावर लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव नव्हते फक्त लिपस्टिकच्या ओठांचा ठसा आणि काही गुलाबाच्या पाकळ्या त्यामधून आल्या होत्या.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
हे पत्र कुणी कुणासाठी लिहिले काहीच कळत नव्हते. तेवढ्यात तिथे इंदीवर आले त्यांनी ते पत्र इंदीवर यांना दाखवले. इंदिवर म्हणाले,” हे पत्र नक्कीच एका मुलीने लिहिले आहे. ती प्रेम तर करते आहे पण त्याचा स्वीकार करायला घाबरत आहे. या सिच्युएशनवर तर एक चांगलं गाणं निर्माण होऊ शकतं!” आणि लगेच त्यांनी पेन काढला आणि गाणे लिहून टाकलं. फूल तुम्हे भेजा है खत मे फूल नही मेरा दिल है.. या चित्रपटासाठी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांना त्या वर्षाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.1972 दिग्दर्शक गोविंद सरय्या यांनी हाच चित्रपट गुजराती मध्ये बनवला. ‘गुण सुंदरी नो घरसंसार’ या नावाने. या सिनेमाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी