
Roshan Nagrath: रहे न रहे हम महका करेंगे…..
भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील प्रत्येक संगीतकाराचे कर्तृत्व झळाळून निघत होते.यातील पहिल्या फळीतील संगीतकारांची बातच काही और होती पण त्याच वेळी दुसऱ्या आणि त्या पुढच्या फळीतील संगीतकार हे आजच्या कुठल्याही संगीताकारापेक्षा काकणभर सरसच होते हि बाब सूर्य प्रकाशाइतकी सत्य आहे.हाताशी मोठमोठी बॅनर नाहीत,चोटीचे दिग्दर्शक नाहीत आणि लोकप्रिय कलावंत चित्रपटात नसतानाही या संगीतकारांनी त्याचं संगीत लोकप्रिय केले.यातच एक संगीतकार होते रोशनलाल नागरथ. उणीपुरी पन्नास वर्षाची उमर लाभलेल्या या गुणी संगीतकाराचे हे जन्म शताब्दी वर्ष होते याची तरी कुणाला खबर आहे का?
एक बाब मात्र खरी आहे त्यांनी संगीत दिलेल्या मोजक्याच चित्रपटांना व्यावसायिक यश लाभले असले तरी त्यांच्या एकूण संगीत रचना पहाता ते प्रतिभावान संगीतकारच होते हे मनोमन पटते. विशेषतः शास्त्रीय संगीतावर आधारीत रचना असेल आणि जेंव्हा ‘कव्वाली’ हा संगीतप्रकार येतो त्या वेळी रोशनला हमखास आठवले जाते. ‘न तो कारवां की तलाश है न तो हमसफर की तलाश है‘ हि ‘बरसात की रात‘ मधील तेरा मिनिटांची कव्वाली आजही सिनेमाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय कव्वाली आहे.

संगीतकार रोशन यांचा जन्म आज पाकिस्तानात असलेल्या गुजरानवाला येथे १४ जुलै १९१७ रोजी झाला. पाचव्या इयत्तेत असताना त्यांचे सारे कुटुंब उत्तर प्रदेश येथील शहाजहानपूर येथे स्तलांतरीत झाले. याच खरा फायदा रोशन यांना झाला कारण इथे त्यांना संगीताकारीता पोषक वातावरण मिळाले. मास्टर बर्वे, पंडीत रतन शंकर, अल्ला उद्दीन खान हे त्यांचे संगीतातील गुरू. त्यांचे संगीत शिक्षण लखनौच्या मॉरीस कॉलेज (आताचे भातखंडे संगीत विद्यालय) येथे झाले. सारंगी, दिलरुबा हि वाद्ये वाजविण्याचे त्यांचे कसब होते. वयाच्या २० व्या वर्षी आकाशवाणीवर ७० रुपये पगाराची नोकरी मिळाली. इथेच त्यांची भेट भावी पत्नी इरा सोबत झाली. अनिल विश्वास यांच्या सल्ल्यानुसार ते संगीतातील नशीब आजमावण्या साठी मायानगरी मुंबईत दाखल झाले. १९४८ साली केदार शर्मा यांच्या ‘नेकी और बदी’या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळाली.

मधुबाला, गीताबाली असूनही सिनेमाला यश नाही मिळाले. रोशन खूप संवेदनशील मनाचे होते. रेडिओची नोकरी सोडून चूक केली का असा प्रश्न त्यांना छळू लागला.महानगरीच्या या रेट्यात पहिल्याच अपयशाने जीव गुदमरू लागला. विमनस्क अवस्थेत ते सागर किनारी बसून राहिले. संगीतात त्यांना अनेक प्रयोग करावयाचे होते . पत्नी इराने त्यांना धीर दिला. केदार शर्मा यांना रोशनच्या प्रतिभेचा अंदाज होता. १९५० साली आलेल्या ‘बावरे नैन’ चित्रपटाने यशाचे चार चांद लावले. रोशन यांचे संगीत अफाट गाजले. राजकपूर आणि गीताबाली अभिनित चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. सागर किनारी उदास मनस्थितीत फिरत असताना एक धून त्यांच्या मनात तयार झाली होती. योगायोगाने त्याच धून वर बनविलेल्या ‘तेरी दुनिया में दिल लगता नही वापस बुलाले तेरे सजदे में गिरा हू मुझको ऐ मलिक उठाले’ या मुकेशच्या गाण्याने अफाट लोकप्रियता हासील केली.
यातील ‘खयालो में किसीके इस तरह आया नही करते’ आणि ‘सून बैरी बलम सच बोल रे इब क्या होगा ‘ हि युगल गीते खूप गाजली. झिया सरहदी यांचा ‘हमलोग’ १९५१ साली झळकला.अभिनेत्री नूतन चा हा पहिला चित्रपट होता. याचे संगीत देताना रोशन यांनी एकॉर्डीयन, व्हायोलीन,गिटार या वाद्यांचा देखील वापर केला. लताचे ‘छुन छुन बाजे पायल मोरी बाजे पायल मोरी आजा चोरी चोरी’ मस्त जमून आले होते.जी एम दुराणी सोबतचे लताचे ‘गाये चला जा गाये चला एक दिन तेरा भी आयेगा ‘ या गाण्यासाठी तर कित्येक रसिकांनी रेडीओ सिलोन ची पारायण केली. याच वर्षी त्यांचा दुसरा सुपर हिट चित्रपट होता ‘मल्हार’! या सिनेमाचे निर्माते गायक मुकेश होते. याचे मेलडीयस संगीत आजही स्मृतीगंधाचा आनंद देते.
‘बडे अरमानोसे रखा है बलम तेरी कसम प्यार कि दुनिया में है पहला कदम‘,’कहां हो तुम जरा आवाज दो हमे याद करते है’,’इक बार अगर तू कह दे’ या लता-मुकेशच्या युगल गीतांसोबतच ‘तारा टूटे दुनिया देखे’,‘दिल तुझे दिया था रखनेको’ ही मुकेशची गाणी आणि ‘गरजत बरसात भिगी आई’ हे लताचे गीत खूप छान होते.(याच लताच्या गीताची चाल रोशन यांनी ‘बरसात की रात‘ मध्ये ‘गरजत बरसात सावन आयो रे’ मध्ये वापरली होती!) ‘मल्हार’ ची गाणी इंदीवर, कैफ इराणी यांनी लिहिली होती.एवढं चांगल संगीत असूनही चित्रपट नाही चालला.
================================
हे देखील वाचा : Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर काढले!
================================
के ए अब्बास यांनी ‘अनहोनी’ (१९५२) या चित्रपटाला संगीत द्यायची जवाबदारी रोशन कडे दिली. राज –नर्गीस हिट पेयर असलेल्या या चित्रपटात त्यांनी प्रथमच राज करीता तलतचा स्वर वापरला.’मै दिल हूं एक अरमान भरा ‘ हे तलतच्या स्वरातील पियानो सॉंग अप्रतिम बनले होते.(वस्तुत: हे गीत तलतच्याच एका बंगाली गीतावर ‘गोथा नोय आजी राते’ वर रचले होते).यात तलत लताचे ‘मेरे दिल कि धाडकन क्या बोले ‘ हे युगल गीत होते. रोशनच्या नशिबी मात्र त्याने संगीत दिलेल्या चित्रपटांना कायम अपयशाचे तोंड पाहावे लागत होते .पन्नासच्या दशकात त्याचा वारंवार प्रत्यय येत होता.खरं तर या काळात त्यांनी शास्त्रीय रागाधारीवर आधारीत अप्रतिम रचना दिल्या होत्या. एरी मै तो प्रेम दिवानी’(भीमपलासी राग), ए री आली पिया बिन (यमन) हि अनुक्रमे नौ बहार ,रागरंग मधली लताची गाणी त्याचीच साक्ष होती.याच काळात रोशनची गाणी गाजत होती पण सिनेमांना व्यावसायिक यश मिळत नव्हते.
संगीतकार म्हणून त्यांचे कर्तृत्व श्रेष्ठच होते. बासरी आणि सारंगी याचा उपयोग करीत अतिशय सुंदर गाणी त्यांनी दिली. या दशकातील त्यांची गाणी पहा.अजी हमको है तुमसे प्यार तो होगा मै क्या जानू(महबूबा),सारी सारी रात तेरी याद सताये (आजी बस शुक्रिया),तेरे प्यार को इस तरह से भुलाना (मैने जीना सिख लिया)तुम एक बार मुहोब्बत का इम्तहान तो लो (बाबर)याच ‘बाबर’ चित्रपटात सुधा मल्होत्राचे नितांत सुंदर गीत होते ‘सलामे हसरत कबूल करलो मेरी मुहोब्बत कबूल करलो’ यात ही सारंगीचे फार सुरेल पीसेस होते. शब्द साहीर लुधियानवी यांचे होते.

१९४८ साली रोशन यांनी संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली पण त्यांच्या चित्रपटाला खरे निर्भेळ व्यावसायिक यश मिळाले १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘बरसात की रात’ चित्रपटाला! या चित्रपटाचे दिग्दर्शन पी एल संतोषी यांनी केले होते तर मधुबाला,भारतभूषण , श्यामा अशी स्टार कास्ट होते.गाणी साहीर ची होती.यातील कव्वाली चे ध्वनिमुद्रण तब्बल २९ तास चालले होते.मन्नाडे, आशा भोसले,एस डी बातीश, सुधा मल्होत्रा आणि म रफी यांनी गायलेल्या या कव्वाली मागच्या पुढच्या सर्व कव्वाल्यांचे रेकॉर्ड मोडून काढले.यात आणखी दोन कव्वाल्या होत्या. त्याच बरोबर मल्हार रागावर आधारीत ज्यात रोशन यांनी संतूत आणि जलतरंग यांचा अतिशय समर्पक उपयोग केला होता ते ‘गरजत बरसत सावन आयो रे ‘ होते. तसेच यमन रागावरील ‘जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात’ (हे गीत १९६० सालच्या बिनाका गीतामालेत सर्वोच्य स्थानी होते) पिलू रागावर आधारीत ‘मैने शायद तुम्हे पहले भी कही देखा है’ हि दोन रफीची गाणी आजही लोकप्रियता टिकवून आहेत.’मुझे मिल गया बहाना तेरा दीद का कैसे खुशी लेके आया चांद ईदका’ या गीतातील लताचा गोडवा काय वर्णावा?
================================
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
================================
रोशनच्या कर्तृत्वाला या सिनेमाने नवी उंची प्राप्त करून दिली.१९६२ साली राजश्री प्रोडक्शन चा ‘आरती’ प्रदर्शित झाला. मीना कुमारी,अशोककुमार आणि प्रदीपकुमार अभिनित हा चित्रपट आजही आठवला जातो त्याच्या लज्जतदार संगीताने! ‘खमाज’ रागावरील अब क्या मिसाल दू मैं तुम्हारे शबाब की (रफी),आपने याद दिलाया तो मुझे याद आया (रफी-लता),’पहाडी’ रागावरील कभी तो मिलेगी कही तो मिलेगी बहारोंकी मंजिल राही (लता),बार बार तोहे क्या दिखालाये पायल की झंकार (लता-रफी) या गाण्यांनी रसिक निहायत खूष झाले.१९६३ साली रोशन चे दोन अप्रतिम चित्रपट झळकले.प्रदीपकुमार ,बीना रॉय यांचा ‘ताजमहल’आणि राजकपूर –नूतन चा ‘दिल हि तो है’ दोन्ही चित्रपटाची गाणी साहीर ने लिहिली होती. ताजमहल चे ‘जो वाद किया वो निभाना पडेगा’ या गीताने पुन्हा बिनाका गीतामालेत सर्वोत्कृष्ट ठरले.
या सिनेमातील संगीतात रोशन ने कोंगो रिदम,पियानो व्हायोलीन,बासरी ,मेडोलीन गिटार यांचा वापर केला.यातली कव्वाली ‘चांदी का बदन सोने की नजर उसपर ये नजाकत क्या कहिये’ पुन्हा एकदा जमून आली. या शिवाय ‘ पांव छू लेने दो फुलोंको इनायत होगी’,’जुर्मे उल्फत पे हमे लोग सजा देते है’,’जो बात तुझमे है तेरी तसवीर में नही …. या सिनेमाकरिता त्यांना पहिले फिल्मफेयर पारितोषिक मिळाले.’दिल हि तो है’ हा संगीतप्रधान चित्रपट राज च्या चाहत्यांना खूष करून गेला. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही,चुरा लेना तुमको ये जालीम जमाना , तुम्हारी मस्त नजर,युंही दिल ने चाहा था रोना रूलाना तेरी याद तो बन गया एक बहाना या लोकप्रिय गीतांसोबतच हा सिनेमा आठवला जातो ‘यमन’ रागावर आधारीत आशाच्या स्वरातील जबरदस्त कव्वाली ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ आणि भैरवी रागावर आधारीत मन्नाडे च्या स्वरातील ‘ लागा चुनरी में डाग छुपाऊ कैसे…’ या गीतांमुळे! रोशन यांचे संगीत आता सर्वार्थाने फुलले होते.साहीर आणि रोशन हे कॉम्बिनेशन जबरदस्त यशस्वी होत होते. याच जोडीचा १९६४ साली ‘चित्रलेखा’ हा केदार शर्मा यांचा चित्रपट आला.

साहीरने यात कमाल केली. शुध्द हिंदी भाषेचा वापर करीत त्यांनी यातील गाणी रचली. शास्त्रीय संगीताचा सुरेल अविष्कार इथे घडला होता. ‘संसार से भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे’,’मन रे तू काहे न धीर धरे’,’सखी री मेरा मन उलझे तन डोले’,’छा गये बादल नील गगन पर’,’ काहे तरसाये जियरा ‘हि सर्वच गाणी नितांत सुंदर बनली होती. यातील सतार जरीन दारूवाला यांनी वाजवली होती.१९६६ साली ‘ममता’ प्रदर्शित झाला. रोशन च्या संगीतात न्हालेला आणखी चित्रपट. यातील ‘रहे न रहे हम महका करेंगे बनके कली बनके सबा’,’ रहते थे कभी जिनके घर में’,’इन बहारो में अकेले न फिरो’,’ छुपा लो यूं दिल में प्यार मेरा ‘ हि सगळीच गाणी आजही अजर आहेत.
================================
================================
पुढच्या दोन वर्षात रोशन यांच्याकडे चित्रपटांची गर्दी वाढत गेली. अनेक मुस्लीम सोशल सिनेमे त्यांच्याकडे आले. एकूणच त्यांच्या गीतांनी एक कलात्मक उंची त्या काळात गाठली होती. दिल जो न कह सका (भीगीरात),दुनिया में ऐसा कहां सबका नसीब है, आया है मुझे फिर याद वो जालीम , बहारो ने मेरा चमन लूट कर,(देवर),दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दे,हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक (बहु बेगम) कारवां गुजर गया गुबार देखते रहे (नी उमर कि नई फासल) सर्व काही सुरळीत चालू असताना १९६७ साली ‘अनोखी रात‘ चित्रपटाचे संगीत देत असताना त्यांचा हृदय रोग बळावला. यातील मिले न फुल तो कांटो दोस्ती करली, ओह रे ताल मिले नदी के जल में हि गाणी तयार झाली होती.
एकच गाण्याचे ध्वनीमुद्रण राहिले होते आणि वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी रोशन दुनियेतून निघून गेले. त्यांनी बनविलेल्या धून वर नंतर त्यांची पत्नी इरा यांनी गाणे बनविले ‘महलो का राजा मिला की रानी बेटी राज करेगी’. त्यांचा एक मुलगा राजेश रोशन संगीतकार बनला तर दुसरा मुलगा राकेश रोशन अभिनेता ! या दोघांचे यश पहायला मात्र रोषण राहिला नाही. त्यांच्या नातवाने ऋत्विक रोशन ने सुपरस्टार पद पटकावले.गीतकार आनद बक्षी आणि इंदीवर याना त्यानीच पहिली संधी दिली. एक अत्यंत संवेदनशील, प्रतिभावान आणि अजात शत्रू असलेल्या रोशन चे नाव आजही संगीताच्या दुनियेत आदराने घेतले जाते.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी