Skip to content Skip to sidebar Skip to footer

Riteish Deshmukh : २०२६ मध्ये ‘हे’ दोन मराठी चित्रपट १०० कोटी पार करणार!

२०२६ हे वर्ष जितकं इतर भाषिक फिल्म इंडस्ट्रीसाठी महत्वाचं आहे, तितकच मराठीसाठीही आहे… कारण याच वर्षात मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील दोन सर्वात जास्त बजेट असलेले चित्रपट येणार आहेत आणि दोघांचं पोटेन्शिअल असं आहे की हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला हमखास जमवू शकतात. ते दोन चित्रपट म्हणजे ‘राजा शिवाजी’ आणि ‘खाशाबा’… ‘राजा शिवाजी’चा दिग्दर्शक आहे रितेश देशमुख जो स्वत: यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर ‘खाशाबा’चे दिग्दर्शक आहेत नागराज मंजुळे. विशेष म्हणजे यापूर्वी दोघांच्या ‘सैराट’ आणि ‘वेड’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस फाडून टाकलं आहे. नागराज यांच्या ‘सैराट’ने ११० कोटींची कमाई केली होती आणि सोबतच तो १०० कोटी क्लबमध्ये पोहोचणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. तर, रितेशच्या ‘वेड’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर ७५ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे दोघेही मराठीतले बॉक्स ऑफिस ब्रॅण्ड आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आता आधी आपण नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’बद्दल जाणून घेऊया. तर २०२३ साली नागराज यांनी ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल विजेते खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. तसे मराठीत अनेक स्पोर्ट्स बेस्ड चित्रपट आलेच आहेत. पण खाशाबा वेगळा का आहे? कारण आजपर्यंत मराठीत एकाच व्यक्तीच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स बेस्ड चित्रपट आलाच नाही, त्यातच हा फार महत्वाचा विषय आहे. कारण इतका मोठा पराक्रम गाजवूनही सरकारने कधीही खाशाबा जाधव यांचा योग्य सत्कार केला नाही, त्यांचे अखेरचे दिवस हलाखीत गेले. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून या महान व्यक्तिमत्वाचं योगदान सर्वांसमोर येणं गरजेचं होतं आणि हेच नागराज करत आहेत. अजून ‘खाशाबा’ यांची भूमिका कोण साकारतंय, हे गुलदस्त्यात आहे. पण चित्रपट २०२६ मध्येच प्रदर्शित होणार आहे.

================================

हे देखील वाचा : Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात पद्मश्री मिळवणारी ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका!

================================

आता ‘राजा शिवाजी’ बद्दल जाणून घेऊ… तसा हा मराठीच्या इतिहासातला बिग बजेट असलेला चित्रपट आहे. याचं बजेट जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला हा दुसराच चित्रपट. याची खास गोष्ट म्हणजे, यामध्ये अनेक बॉलीवूडचे दिग्गज झळकणार आहेत. सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री…या कलाकारांसोबत मराठी कलाकारांची मांदियाळीसुद्धा यात आहे. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी आणि स्वत: रितेशची पत्नी जिनिलीया देशमुखसुद्धा यात विशेष भूमिकेत दिसणार आहे. नुकतच याचं शुटींग पूर्ण झालं असल्याची सोशल मीडिया पोस्ट रितेशने केली होती. आणि यावर्षी १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी हा चित्रपट थिएटर्समध्ये धडकणार आहे. आता सध्यातरी हा १०० कोटी कमावणार असं म्हटलं जात असून पण ‘राजा शिवाजी’ मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच २०० कोटी आणि ३०० कोटींचे क्लबसुद्धा उघडू शकतो.

‘खाशाबा’ आणि ‘राजा शिवाजी’चं एक कनेक्शनसुद्धा आहे. ते म्हणजे सुरुवातीला ‘राजा शिवाजी’ स्वत: नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार होते. पण रितेश आणि नागराज यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून फिस्कटलं आणि नागराजने यातून काढता पाय घेतला. यानंतर हा पूर्ण प्रोजेक्ट रितेश देशमुख याच्याकडे आला आणि त्याने तो पूर्णसुद्धा केला. याशिवाय या दोन्ही बिग बजेट चित्रपटांना अजय-अतुल हेच संगीत देणार आहेत. त्यामुळे म्युझिकची डबल धमाल आपल्याला २०२६ मध्ये अनुभवायला मिळणार यात शंकाच नाही. आता या दोन्ही दिग्गज फिल्ममेकर्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार, हे येणारा काळच दाखवेल.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!