Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vyjayanthimala : नृत्य आणि अभिनय यांचा सुरेख मिलाफ!

पन्नास आणि साठच्या दशकामध्ये आपल्या नृत्य आणि अभिनयाने रसिकांवर अमिट छाप टाकणाऱ्या अभिनेत्री वैजयंतीमाला या अभिनेत्रीचा चित्रपटातील प्रवेश कसा झाला हा मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. आज वैजयंतीमाला ९२ वर्षाच्या आहेत. चित्रपट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राज्यसभेवर त्या खासदार म्हणून कार्यरत होत्या. एक परिपूर्ण आयुष्य त्यांना जगत आहेत. १३ ऑगस्ट १९३३ रोजी जन्मलेल्या वैजयंतीमालाला खरंतर सिनेमात यायचंच नव्हतं. एका सनातनी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्यांना नृत्यची आवड होती. त्यामुळे भरतनाट्यम मध्ये वैजयतीमाला पारंगत झाल्या. त्यांचे भरतनाट्यमचे कार्यक्रम दक्षिणेतील अनेक शहरात होऊ लागले.

अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी व्हॅटिकन सिटी येथे पोप यांच्यासमोर देखील डान्स परफॉर्मन्स दिला होता. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे नृत्य एम व्ही रमण यांनी मद्रास च्या गोखले हॉल मध्ये बघितले. रमण केव्हा एव्हीएम स्टुडिओसाठी एक चित्रपट बनवत होते. त्यांना वैजयंतीमालाचा डान्स खूप आवडला आणि आपल्या चित्रपटात नायिका म्हणून त्यांना साइन करावे असे वाटले. म्हणून ते दुसऱ्या दिवशी वैजयंतीमालाच्या घरी गेले. पारंपारिक विचारसरणी असलेल्या वैजयंतीमालाच्या पालकांनी सिनेमात काम करायला स्पष्ट शब्दात नकार दिला. तिच्या आजीने तर रागाच्या भरात रमण यांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली. परंतु रमण यांनी आपल्या मुद्द्याचा पाठपुरावा करत कुटुंबीयांना राजी केले.

वैजयंतीमाला देखील सिनेमात काम करायला तयार झाल्या परंतु त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना ही गोष्ट सांगितली नाही कारण त्या काळात सिनेमात काम करणं ही गोष्ट खूप कमीपणाची समजली जायची.  वझ काई (१९४९) हा वैजयंतीमालाचा पहिला तमिळ चित्रपट. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सुपर हिट झाला. पहिल्याच सिनेमात वैजयंतीमाला  प्रचंड लोकप्रिय झाल्या.  त्या नंतर याच सिनेमाचा रिमेक तेलगू भाषेत देखील बनला. खरंतर वैजयंतीमाला ला  तेलगू भाषा येत नव्हती परंतु तिच्या वडिलांनी तिला ही भाषा शिकवली.तेलगु सिनेमाचे नाव होते जीविथम. तमिळ, तेलगू दोन्ही भाषेमध्ये सुपरहिट झालेला सिनेमाची कथा ए व्ही एम ने हिंदी मध्ये आणायचे ठरवले. आता वैजयंतीमालाचा नायक होता करण दिवाण आणि चित्रपटाचं नाव होतं ‘बहार’.

सचिन देव बर्मन यांचे या चित्रपटाला संगीत होतं. सैय्या दिल मे आना रे आके फिर ना जाना रे… हे सुपरहिट गाणे या चित्रपटात होते. तमिळ तेलगू पाठोपाठ हिंदीत देखील हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला. १९५१ सालच्या टॉप टेन चित्रपटात बहार हा सिनेमा होता. वैजयंतीमालाने तीन विविध भाषांमध्ये काम करून चित्रपटात आपले एन्ट्री गाजवून टाकली. ‘बहार’ सिनेमा फक्त दक्षिणेतच नाही तर उत्तर भारतात, मध्य भारतात देखील प्रचंड लोकप्रिय ठरला. या सिनेमाने वैजयंतीमालाची ओळख पूर्ण देशाला झाली. यानंतर 1953 साली आलेला ‘लडकी’ हा चित्रपट देखील आधी तमिळमध्ये नंतर तेलुगू मध्ये आणि त्यानंतर हिंदीत बनला. तमिळ मध्ये तिचे  नायक जेमिनी गणेशन, तेलगु मध्ये एन ती रामाराव होते. हिंदी ‘लाडकी’ मध्ये तिचा नायक किशोर कुमार होता. हा सिनेमा देखील सुपर डुपर हिट झाला. १९५४ साली तिचा ‘नागीन’ झळकला. या संगीतमय सिनेमाने वैजयंतीमाला टॉपची अभिनेत्री बनली. या संगीतमय सिनेमातील तिचा नृत्याभिनय जबरदस्त होता. यात तब्बल १२ गाणी होती.

================================

हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

================================

१९५५ साली बिमला रॉय यांच्या ‘देवदास’ सिनेमात तिने चंद्रमुखी ची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.  परंतु वैजयंतीमालाने तो पुरस्कार नाकारला. तिच्या मते  ही भूमिका सहाय्यक अभिनेत्रीची नाही तर मुख्य अभिनेत्रीची आहे. यानंतर बिमल रॉय , बी आर  चोप्रा,  राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद या दिग्गजांचे लक्ष वैजयंतीमाला कडे गेले आणि सर्वांनी तिच्या नृत्याभिनयाचा आपल्या चित्रपटातून वापर करून घेतला. राज कपूर सोबतचा ‘संगम’ दिलीप कुमार सोबत चे ‘मधुमती’, ‘गंगा जमुना’ आणि देव आनंद सोबतचा ‘ज्वेल थीफ’ हे तिचे सिनेमे भारतीय चित्रपट इतिहासातील माइलस्टोन सिनेमा ठरले. ‘साधना’(१९५८) , गंगा जमुना (१९६१) आणि ‘संगम(१९६४) मधील भूमिकांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. १९६६ साली चमनलाल बाली यांच्या सोबत तिने लग्न केले. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच वैजयंतीमालाने चित्रपटसष्टीतून निवृत्ती घेतली यानंतर अनेक निर्मात्यांनी त्यांना भरघोस मानधनाची ऑफर देऊन चित्रपटात पुनरागमनची ऑफर दिली पण वैजयंतीमाला चित्रपटात आल्या नाहीत.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!