
Yed Lagal Premach मालिकेत मोठा बदल; जीजीची होणार एक्झिट आणि ‘या’ प्रसिद्द अभिनेत्रीची होणार एंट्री !
Star Pravah वाहिनीवरील मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यापैकी ‘येड लागलं प्रेमाचं’ (Yed Lagal Premach) ही मालिका गेल्या काही काळापासून कथानकातील अनपेक्षित वळणांमुळे चर्चेत आहे. मालिकेतील दमदार व्यक्तिमत्त्व असलेली जीजी ही भूमिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली होती. मात्र अलीकडेच अभिनेत्री नीना कुलकर्णी (Actress Neena Kulkarni) यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निना कुलकर्णी यांनी नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर करत मालिकेतील आपला प्रवास संपल्याचे संकेत दिले. जवळपास दोन वर्षे या मालिकेसाठी सातत्याने चित्रीकरण केल्यानंतर आता त्यांनी या भूमिकेला निरोप दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर मालिकेतील जीजी या प्रभावी पात्राने कायमची एक्झिट घेतली का, असा प्रश्न चाहत्यांना पडू लागला आहे.(Yed Lagal Premach Serial)

निना कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जीजी गेली… मनाला चटका लावून. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेमधील माझं काम आता पूर्ण झालं आहे. गेली दोन वर्षे या मालिकेसोबत खूप छान प्रवास केला. जीजीचे व्यक्तिमत्त्व दमदार असल्यामुळे तिचे अनेक सीनही मोठे आणि प्रभावी होते. काम करताना दमछाक होत असे, पण संपूर्ण टीमने नेहमीच साथ दिली.” त्यांनी सेटवरील सहकलाकार, दिग्दर्शक, क्रिएटिव्ह टीम, कॅमेरा विभाग, मेकअप-हेअर टीम तसेच स्पॉटबॉयपर्यंत सर्वांचे विशेष आभार मानले.

निना कुलकर्णी यांनी पुढे लिहिले की, या मालिकेच्या सेटवर कधीही वाद किंवा मतभेद झाले नाहीत. सर्वांनी एकमेकांना समजून घेत अतिशय आनंदी वातावरणात काम केले. त्यामुळे या मालिकेशी जोडलेल्या असंख्य सुंदर आठवणी सोबत घेऊन त्या पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या भावनिक पोस्टने चाहत्यांनाही भावुक केले आहे. दरम्यान, निना कुलकर्णी यांच्या निरोपानिमित्त मालिकेच्या टीमने सेटवर छोटेखानी सेलिब्रेशनही केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये संपूर्ण टीम एकत्र येऊन त्यांना निरोप देताना दिसत आहे.(Yed Lagal Premach Serial)
==================================
==================================
विशेष म्हणजे मालिकेत लवकरच किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांची एंट्री होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे कथानकात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जीजीचे पात्र पूर्णपणे संपले आहे की कथेत काही वेगळे वळण येणार आहे, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता आलेली नाही. एकूणच, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत निना कुलकर्णी यांच्या निरोपामुळे कथानकात नवा टप्पा सुरू होणार असल्याचे दिसत आहे. पुढील भागांमध्ये नेमके काय घडणार, आणि जीजीच्या पात्राचे भवितव्य काय असेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.