
Gulshan Rai यांची यशोगाथा : ‘जॉनी मेरा नाम’ ते ‘गुप्त’!
हा प्रसंग आहे साठच्या दशकाच्या उत्तरार्धातील. ‘नया दौर’, ‘गुमराह’, ‘हमराज’, ‘वक्त’ या सुपरहिट सिनेमाचे निर्माता दिग्दर्शक बी आर चोपडा यांच्यासमोर एक डिस्ट्रीब्यूटर बसले होते. बी आर चोप्रा यांच्या नवीन सिनेमाच्या वितरणा बाबत त्यांच्याशी चर्चा चालू होती. चोप्रा यांनी विचारले “बोल गुलशन, कितना दाम मिलेगा इस फिल्म के डिस्ट्रीब्यूशन का?” त्यावर तो डिस्ट्रीब्यूटर शांत बसला आणि तो म्हणाला,” चोप्रा साहेब, मी आता वितरणा सोबतच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याचा विचार करत आहे!” त्यावर बी आर चोपडा म्हणाले,” तुला वेड लागले आहे का? चित्रपट निर्माण करणे हे तुला खायची गोष्ट वाटते का? डोक्यातून हा विचार काढून टाक आणि डिस्ट्रीब्यूशनच काम चालू ठेव. “ खरं तर हा डिस्ट्रीब्यूटर 1951 सालापासून बॉलिवूडमध्ये होता. अनेक सुपरहिट चित्रपटांचे डिस्ट्रीब्यूशन त्याने संपूर्ण भारतभर केले होते.
संपूर्ण देशात त्याचे चांगले नेटवर्क होते. असे असताना त्यांनी निर्मितीच्या क्षेत्रात उतरून स्वत:चे हात पोळून घ्यावे असे बी आर चोप्रांना वाटले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला हा सल्ला दिला. “डिस्ट्रीब्यूशन सारखे चांगले काम हातात असताना निर्मितीच्या क्षेत्रात पडून का विनाकारण रिस्क घेत आहेस?” असा त्यांचा सवाल होता. पण त्या डिस्ट्रीब्यूटरने ठरवले होते की आता आपण निर्माता व्हायचे आणि त्याने निर्मितीच्या क्षेत्रात उडी घेतली आणि सत्तरच्या दशकातील तो एक सुपरहिट निर्माता बनला. त्याच्या चित्रपटाने अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांचे करिअर घडले. शिवाय देव आनंद आणि दिलीप कुमार या उतार वयातील कलावंतांना देखील नवसंजीवनी दिली. सुभाष घई यांच्या करिअरला देखील आकार दिला. कोण होता तो निर्माता आणि काय होते त्याचे करिअर?

1968 साली बी आर चोपडा त्यांच्या ‘आदमी और इन्सान’ या चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन साठी त्यांनी वितरक गुलशन राय यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवल होते. त्यावेळी जेव्हा गुलशन राय यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आपण उतरत आहोत असे सांगितले तेव्हा बी आर चोपडा यांनी त्याची त्याचा मजाक उडवला! “निर्माता आणि वितरक या दोन्ही डगरीवर पाय ठेवणे मूर्खपणा चे आहे असे सांगितले. पण गुलशन राय यांनी ठरवले होते की आपण निर्माता बनायचे. नवकेतन फिल्म्सच्या ‘गाईड’(1965) या चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन गुलशन राय यांनीच केले होते त्यानंतर आलेल्या ‘ज्वेल थीफ’(1967) च डिस्ट्रीब्यूशन त्यानीच केले होते. त्यामुळे या दोन्ही चित्रपटाचा दिग्दर्शक गोल्डी याच्यासोबत त्याचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध झाले होते. आपल्या पहिल्या चित्रपटातील दिग्दर्शन गोल्डी यांनी करावे अशी त्यांची इच्छा होती.
================================
हे देखील वाचा :नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?
================================
गुलशन राय यांनी ‘त्रिमूर्ती फिल्म्स’ या चित्रपट संस्थेची स्थापना केली. के आर नारायणयांची एक कथा त्यांनी घेतली. ही एक अॅक्शन पॅक्ड गुन्हेगारी सूड कथा होती. चित्रपटाला जबरदस्त वेग होता. चित्रपट होता ‘जॉनी मेरा नाम’. या सिनेमाचे दिग्दर्शन गोल्डीने करावी अशी विनंती त्यांनी केली. त्यावेळी गोल्डी प्रचंड बिझी होता. त्याने या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे “पाच लाख रुपये घेईल”, असे सांगितले. गुलशन राय म्हणाले “एवढी रक्कम तर माझ्याकडे नाही पण माझ्या प्रॉफिट मधील तिसरा हिस्सा मी तुला देईल!” हिरो देव आनंदला घेतले.
नायिकेच्या भूमिकेसाठी भूमिकेसाठी हेमामालिनीची निवड झाली. गोल्डी विजय आनंद ने खल नायकाच्या भूमिकेसाठी प्रेमनाथ ची निवड केली. प्राण एका जबरदस्त रोलमध्ये होते. आय एस जोहर यांचा ट्रिपल रोल या सिनेमात होता. पद्मा खन्ना चा हॉट कॅबरे होता. सिनेमा फुल्ल एन्टरटेनमेंट च पॅकेज होता. सिनेमाची गाणी कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केली होती. विजय आनंद यांची पटकथा सॉलिड बंदिस्त होती. 20 नोव्हेंबर 1970 या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला आणि त्यावर्षीचा तो सुपर डुपर हिट सिनेमा ठरला. बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये नंबर एक वर होता. इतका की त्याने राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ , दिलीप कुमार यांचा ‘गोपी’ तसेच राजेश खन्नाचा सच्चा झूठा या सिनेमाला मागे टाकले. केवळ साठ लाख रुपयांत बनलेल्या जॉनी मेरा नाम ने तब्बल नऊ कोटी रुपयांचा बिजनेस केला होता!
यानंतर त्यांनी ‘जोशीला’ या चित्रपटाची निर्मिती केली या सिनेमाच्या दिग्दर्शन मात्र त्यांनी यश चोप्रा यांच्याकडे दिले. या चित्रपटाचा नायक देखील देव आनंद होता. (पहिल्या दोन सिनेमाची नावे इंग्रजी जे या लेटर ने सुरू होणारी असावीत असा सल्ला एका ज्योतिषाने गुलशन राय यांना दिला होता!) दोन सुपरहिट चित्रपटानंतर त्यांनी ‘दिवार’ (1975) हा चित्रपट निर्माण केला. हा चित्रपट अमिताभ बच्चनला सुपरस्टार पदावर नेणारा सिनेमा ठरला. सलीम जावेद यांची कथा पटकथा टेरिफिक होती. या सिनेमाने सुवर्ण महोत्सवी यश मिळवले. या गोल्डन जुबली पार्टीमध्ये गुलशन राय यांची भेट बी आर चोपडा यांच्या सोबत झाली तेव्हा चोपडा यांनी मुक्तकंठाने कौतुक करत गुलशन राय यांना सांगितले,” तुम्ही माझ्या सर्व गोष्टींना खोटे ठरवले आहे. अभिनंदन!” त्यावर्षी बी आर चोप्रा यांचा अमिताभ बच्चन आणि सायराबानू यांना घेऊन बनलेला ‘जमीर’ हा चित्रपट ‘दिवार’ च्या समोर साफ फ्लॉप झाला. 1978 साली ‘त्रिशूल’ हा मल्टीस्टार सिनेमा गुलशन राय यांनी निर्माण केला.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड मोठे यश मिळवले. गुलशन राय हे नाव आता बॉलीवूडमध्ये यशाचे दुसरे नाव झाले होते. दरम्यान च्या काळात त्यानी धर्मेंद्र आणि हेमा ला घेवून ‘ड्रीम गर्ल’ (1976)बनवला. प्रमोद चक्रवर्ती यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा देखील सुपर डुपर हिट झाला. यानंतर सुभाष घई यांच्याकडे दिग्दर्शनाची धुरा सोबत त्यांनी ‘विधाता’ (1982) या चित्रपटातील निर्मिती केली या चित्रपटात दिलीप कुमार प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमाला देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. यानंतर मात्र गुलशन राय यांच्या सर्व चित्रपट त्यांचा मुलगा राजीव रॉय यांनी दिग्दर्शित केले. मोहरा, त्रिदेव, विश्वात्मा, गुप्त.. हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. 11 ऑक्टोबर 2004 रोजी गुलशन राय यांचे निधन झाले.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी