
बेताब : Sunny Deol चा पहिला सिनेमा!
सनी देओल यांचा ‘बॉर्डर – २’ मागच्या महिन्यात प्रदर्शित झाला. वयाच्या ६८ व्या वर्षी देखील त्याचा जोश उत्साह टिकून आहे. हा खऱ्या अर्थाने लंबी रेस का घोडा आहे . आज त्याच्या पहिल्या ‘बेताब’ या चित्रपटाची मेकिंग ची स्टोरी बघूयात. राहुल रवैल दिग्दर्शित कुमार गौरवचा पहिला चित्रपट ‘लव्ह स्टोरी’ हा ब्लॉकबस्टर ठरला पण याचा फायदा त्याला अजिबात झाला नाही याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे राहुल रवैलचे नाव दिग्दर्शक सिनेमाच्या ओपनिंग क्रेडीटस मध्ये कुठेही नव्हते! या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून कुणाचेच नाव नव्हते. A film by Rajendrakumar असे फक्त क्रेडीटस मध्ये येते. हे सर्व राजेंद्र कुमार आणि राहुल रवैल यांच्यातील वादामुळे घडले.
‘लव्ह स्टोरी’ नंतर राहुल रवैलला कोणतेही नवीन काम मिळत नव्हते. त्यामुळे राहुल रवैल अस्वस्थ होऊ लागला. राज कपूर यांच्यावर राहुल रवैल लिहिलेल्या पुस्तकात त्यानी सांगितले, ”त्यावेळी मी प्रचंड नैराश्यात जाऊ लागलो होतो! ” राज कपूर: द मास्टर अॅट वर्क” या पुस्तकात त्याने यावर विस्तृत लिहिले आहे. याच काळात एके दिवशी धर्मेंद्रचा भाऊ अजित देओल राहुल रवैलला भेटायला आला. अजितजींनी राहुल रवैलला सांगितले की, ”धरमजी त्यांचा मोठा मुलगा सनी लाँच करण्याचा विचार करत आहेत. म्हणून तुम्ही उद्या त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी या “दुसऱ्या दिवशी राहुल रवैल त्यांना भेटण्यासाठी धरमजींच्या घरी पोहोचला. सुरुवातीच्या प्राथमिक गप्पा नंतर धरमजींनी राहुल रवैलला सांगितले की तो सनी लाँच करू इच्छितो. आणि त्याने लव्ह स्टोरी हा चित्रपट देखील पाहिला आहे. त्याला लव्ह स्टोरी खूप आवडली. धरमजींनी राहुल रवैलला विचारले की,” सनीचा हा पहिला चित्रपट दिग्दर्शित करू शकतो का?”. त्यावेळी राहुल रवैलला यांना कामाची आवश्यकता असल्याने त्याने लगेच धरमजींना होकार दिला.

अशाप्रकारे, धरमजी आणि राहुल रवैल यांच्यात सनीचा पहिला चित्रपट ‘बेताब’ दिग्दर्शित करण्यासाठी करार झाला. पण यांचे written document नव्हते. राहुल रवैलला भीती होती की धरमजी आपला विचार बदलतील. तो लगेच धरमजींचे घर सोडून राज कपूरकडे गेला. राहुल रवैल ने राज कपूरकडे सहायक म्हणून काम केले होते. तो राज कपूर यांना आपला गुरु मानायचा. राहुल रवैलने जेंव्हा ही बातमी प्रथम राज कपूरला सांगितली. ते म्हणाले, “मी तुला आधीच सांगितले होते की प्रतिभा कधीच वाया जात नाही. ‘लव्ह स्टोरी’ सिनेमात तुझे नाव दिले गेले नव्हते. तू खूप नाराज होतास . पण आता पहा. तुला केवढी मोठी संधी मिळाली आहे. गो अहेड . ऑल द बेस्ट “
राहुल रवैल यांनी या पुस्तकात लिहिले आहे . ‘राजकपूर यांचा हा आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचा होता. धर्मेंद्रसारख्या चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कलावंता ने त्यांच्या मुलाच्या डेब्यू मुव्हीज करिता मला निवडले ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती.” राहुल रवैल यांनी त्या पुस्तकात म्हटले आहे की,” जेव्हा मी ‘बॉबी’च्या सेटवर राज कपूरचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो तेव्हा राज कपूर म्हणाले होते की जर प्रेमकथेचा चित्रपट बनवायचा असेल तर त्यासाठी नवीन कलाकार सर्वात योग्य असत्तात. कारण प्रेक्षकांमध्ये त्यांची कोणतीही पूर्व प्रतिमा नसते. हे नवे कोरेपण सिनेमाच्या यशाचे प्रमुख कारण बनते.“

राहुल रवैल यांना ‘बेताब’ च्या प्रेम कथे साठी सनी आणि अमृता हे फ्रेश चेहरे मध्ये मिळत होते. फक्त नवीन कलाकार मिळत होते. त्यामुळे त्यांना चांगलाचा हुरूप आला. आता राहुल यांच्यापुढे आव्हान होते ते एक नवीन आणि चांगली प्रेमकथा शोधण्याचे. त्यानं लहानपणी शाळेत असताना वाचलेली विल्यम शेक्सपियरची साहित्यातली एक कथा आठवली “द टेमिंग ऑफ द श्रू”. राहुलला वाटलं जर हीच कथा आजच्या काळानुसार मांडली तर एक चांगला चित्रपट बनवता येईल. दुसऱ्या दिवशी राहुल रवैल धरमजींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला. धरमजींनी राहुलला कथेबद्दल विचारलं. राहुल रवैलने त्यांना तीच कथा सांगितली.
मात्र, राहुल रवैलने धर्मेंद्रजींना ही कथा कुठून मिळाली हे सांगितले नाही. धरमजींना ही कथा आवडली. त्यांना वाटलं की राहुल मेहबूब खान यांच्या ‘आन’ (दिलीप कुमार अभिनीत) या चित्रपटाचा रिमेक नवीन शैलीत बनावट आहे . शेक्सपियरच्या या कथेवर आतापर्यंत अनेक भाषांमध्ये चित्रपट बनवण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांनी या कथेत फक्त किरकोळ बदल केले आहेत. धरमजींनी लेखक जावेद अख्तर यांना या कथेवर चित्रपट लिहिण्यासाठी बोलावले. तोपर्यंत सलीम-जावेद जोडीचे ब्रेकअप झाले होते. धरमजींच्या आग्रहास्तव जावेद अख्तर यांनी चित्रपट लिहिण्यास होकार दिला. अशाप्रकारे, सलीम-जावेद जोडी ब्रेकअप झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी लिहिलेला हा पहिलाच चित्रपट होता. जावेद साहेबांनीही त्यांचे काम खूप चांगले केले. त्यांनी त्या जुन्या कथेला एक नवीन रूप दिले.

राहुल जेव्हा काश्मीरमध्ये ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होते तेव्हा त्यांना तिथे एक अतिशय सुंदर लोकेशन दिसले होते . धरमजींचा मुलगा सनीच्या डेब्यू चित्रपटासाठी राहुल रवैल यांना ते लोकेशन योग्य वाटले. सिनेमॅटोग्राफर मनमोहन सिंग आणि इतर काही लोकांसह काश्मीरमधील त्याच ठिकाणी पोहोचला. सर्वांना ते लोकेशन खूप चांगले वाटले. पहलगाम पासून 15 किमी अंतरावर असलेली हे ठिकाण नंतर ‘बेताब व्हॅली ‘ म्हणून पर्यटकांचे आवडते स्थळ ठरले. बेताबचे बहुतेक शूटिंग काश्मीरमध्ये झाले होते. (तथापि, चित्रपटात दाखवलेली शम्मी कपूर यांची इस्टेट बंगळुरूमधील लोकेशनची होती.) राहुल रवैल यांनी जेंव्हा ‘बेताब’ हा चित्रपट पूर्ण केला, तेव्हा त्यांनी प्रथम राज कपूरजींना चित्रपट दाखवला. राज कपूर यांनी त्यांना काही बदल करण्याचा सल्ला दिला होता, जो राहुल रवैल यांनीही केला.
५ ऑगस्ट १९८३ रोजी जेव्हा ‘बेताब’ प्रदर्शित झाला, तेव्हा त्याच्या एक दिवस आधी राहुल रवैल राज कपूरला भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेला होता. राहुल रवैल घाबरला होता. सिनेमाचे वितरक वकील सिंग देखील राज कपूरच्या ऑफिसमध्ये बसले होते वकील सिंगने ‘बेताब’ चित्रपटाचे बॉम्बे आणि पंजाब प्रदेशांसाठी हक्क विकत घेतले होते. वकील सिंग राजकपूरच्या सिनेमाचे मुख्य वितरक होते. राजकपूर आणि वकील सिंग दोघानी ‘बेताब’ची खूप प्रशंसा केली आणि सिनेमा हिट होणार यांची खात्री दिली. पण तरीही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक रात्री आधी राहुल रवैल खूप अस्वस्थ होता. त्याला झोपही येत नव्हती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दुपारी २ वाजेपर्यंत राहुल रवैलला चांगली बातमी मिळाली. त्याला सर्वत्र बातम्या येत होत्या की बेताब हिट झाला आहे. लोकांना बेताब खूप आवडला आहे.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
================================
‘बेताब’ सिनेमाचा मुहूर्त १९८१ साली मोठ्या थाटात झाला होता. दिलीपकुमार, राजकपूर आणि सायराबानू उपस्थित होते. काश्मीरच्या नयनरम्य वातावरणात फुललेली ही प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली . सिनेमा सुपर डुपर हिट झाला. हा सिनेमा हिट होण्यामागे आर डी बर्मन यांचे देखील मोठे योगदान आहे. (त्या काळात लव्ह स्टोरी-कुमार गौरव,रॉकी -संजय दत्त , बेताब – सनी देओल हे तीन स्टार पुत्र पडद्यावर आले होते . या तिघांच्याही पहिल्या सिनेमाला संगीत आर डी बर्मन यांचे होते!) शब्बीर कुमार आणि लताच्या स्वरातील ‘जब हम जवां होगे जाने कहां होंगे , बादल यू गरजता है , परबतो से आज मै टकरा गया तुमने दी आवाज , आपणे दिल से बडी दुश्मनी की, तेरी तसवीर मिल गई .. ही गाणी प्रचंड गाजली. या सिनेमाला फिल्म फेअर ची तब्बल आठ नामांकन मिळाली होती.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी