
Tu Anolakhi Tari Sobti मालिकेत मोठा ट्विस्ट; कुटुंबासाठी अर्पिताचा मोठा निर्णय!
सन मराठीवरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ (Tu Anolakhi Tari Sobti) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती ठरली आहे. मालिकेतील समीर आणि अर्पिता या दोन मुख्य पात्रांमधील हळूहळू फुलणारी मैत्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. दोन पूर्णपणे अनोळखी व्यक्ती एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि त्यानंतर त्यांच्या नात्याचा प्रवास कसा घडत जातो, हे मालिकेत अतिशय रंजकपणे मांडले जात आहे. मात्र सध्या मालिकेच्या कथानकात एक नाट्यमय वळण येताना दिसत आहे. अर्पिता आणि समीरची जवळीक घरातील काही सदस्यांना खटकू लागल्यामुळे दोघेही एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. अशातच अर्पिताचे विराजसोबत आणि समीरचे राजसीसोबत लग्न ठरवले जाते. घरच्यांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अर्पिता आणि समीर मनाविरुद्ध या लग्नाला तयार होतात. या निर्णयामुळे मालिकेत पुढे काय घडणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.(Tu Anolakhi Tari Sobti)

दरम्यान, मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात लग्नसोहळ्याची जोरदार तयारी दाखवण्यात आली आहे. रुखवत, साड्यांचा बस्ता, लग्नपत्रिका आणि घरातील लगबग अशा अनेक गोष्टींमुळे वातावरण अगदी उत्साहपूर्ण दिसत आहे. मात्र या सगळ्या गडबडीत अर्पिता खरोखर आनंदी आहे का, हा प्रश्नही समोर येतो. नेहमीच कुटुंबाच्या आनंदाला प्राधान्य देणाऱ्या अर्पिताच्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मालिकेत अर्पिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) याबद्दल बोलताना म्हणाली, “मालिकेत प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अर्पिता आता लग्नबंधनात अडकणार आहे. स्वतःला काय हवं आहे हे माहिती असूनही ती कुटुंबाच्या आनंदासाठी हा निर्णय घेते. वास्तव आयुष्यातही अनेक मुली कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध असे निर्णय घेतात. मात्र अर्पिताच्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे प्रेक्षकांना ८ मार्चला पाहायला मिळेल.” (Tu Anolakhi Tari Sobti)
============================
============================
ती पुढे म्हणाली की, सध्या मालिकेच्या सेटवर लग्नाच्या सीनमुळे खूप उत्साहाचे वातावरण आहे. लग्नाच्या तयारीची लगबग, सजावट आणि शूटिंगदरम्यान सगळे कलाकार खूप मजा करत आहेत. पडद्यावर हा सोहळा सुंदर दिसत असला तरी त्यामागे संपूर्ण टीमची खूप मेहनत असते. त्यामुळे या लग्नाच्या खास भागांसाठी प्रेक्षकांनी नक्कीच मालिकेला साथ द्यावी, असे आवाहनही तिने केले.