
एक रत्न हरपलं…; Asha Bhosle यांच्या आठवणीत मराठी कलाकार भावूक
भारतीय संगीतसृष्टीला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या ग्रेट गायकांपैकी एक म्हणजे पद्मविभूषण Asha Bhosle. १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खरंच सूर हरवल्याच्या भावना प्रत्येक श्रोत्यांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात आहेत… आशा ताईंच्या जाण्याने राजकीय नेते, क्रिकेटपटू, संगीतकार आणि संपूर्ण फिल्मी विश्व हळहळ व्यक्त करत आहेत… मराठी कलाकारांनी आशाताईंच्या काही आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे…(Marathi Celebs Prays Tribute To Asha Bhosle)
आज आकाशाने त्याचा एक तारा परत घेतला
ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्रभूषण Ashok Saraf आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही आशा भोसलेंसोबतचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशोक सराफ यांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, “आज आकाशाने त्याचा एक तारा परत घेतला… आशाताई, तुमचं अस्तित्व कायम आमच्या श्वासात असेल”… तर Nivedita Saraf यांनी पोस्टमधून भावना व्यक्त करताना लिहिलं आहे की, “एक रत्न आज हरपलं… आशाताई, तुमच्या आठवणी सदैव जिवंत राहतील. तुम्ही आमच्या मनात कायम असाल”…


चंद्र उगवेल का आता आकाशात?
गायक, संगीतकार, गीतकार Saleel Kulkarni यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, “चंद्र उगवेल का आता आकाशात? चांदणे तसेच बरसेल का? ही फक्त एक व्यक्ती नव्हती हा फक्त एक आवाज नव्हता. आपल्या आयुष्याचा भाग होता आणि आहे. आपल्या घरातल्या छोट्या मुलीपासून ते आजीपर्यंत सगळ्यांच्या भावना व्यक्त करणारा आवाज”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

आम्ही तुमच्या या ऋणात राहू, कारण तुम्ही आम्हाला चांगलं ऐकायला शिकवलं
तर Sukanya Mone यांनी लिहिलंय, “तुमच्या गाण्यांनी दिवसाची सुरुवात होते. स्वयंपाक, घरून शूटिंगला जाताना सुखकर प्रवास तुमच्या आवाजाने होतो. मेकअप रूममध्ये तुमचाच आवाज घुमत असतो. पॅकअप झाल्यावरही ‘ नक्षत्रांचे देणे’ ऐकत ऐकत घरी येते. तुमच्याच आवाजाने दिवस संपतोही. आशाताई तुम्ही कायम आमच्याबरोबर आहात. आम्ही, आमची लेकरं भाग्यवान की तुमचीच गाणी, तुमचाच आवाज सतत आमच्या मनात, कानात रुंजी घालत राहील. आम्ही तुमच्या या ऋणात राहू, कारण तुम्ही आम्हाला चांगलं ऐकायला शिकवलं.”

पुढे सुकन्या यांनी लेकीच्या आठवणीचा उल्लेख करत लिहिले आहे की, “माझ्या जुलियाच्या तुम्ही आशा आजी आहात, तिलाही तुमच्या ‘केव्हा तरी पहाटे’ गाण्याने भुरळ घातली. ५ मे १९९२ ला अक्षय्य तृतीया होती, त्या दिवशी ‘ताईच्या बांगड्या’ चित्रपटाचा मुहूर्त होता, तेव्हा हा फोटो काढला होता. त्यानंतर आमचं लग्न झाल्यानंतर सिटी लाईट मार्केटमध्ये भेटलात. मला म्हणालात, चल माझ्या बाईकडून मासे घेऊन देते. मी म्हटलं अहो मी शाकाहारी आहे, तर म्हणालात थांब मग आलेच आणि येऊन माझ्या ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकातल्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले. विस्मयचकित होऊन मी फक्त तुमच्याकडे बघत होते. बापरे! स्मरणशक्तीचं आणि मनाच्या मोठेपणाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मन मानायला तयार नाहीये की तुम्ही आमच्यात नाहीत. तुम्ही आमच्या मनात, हृदयात, चराचरात आहातच”…
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलं खणखणीत स्वरयंत्र म्हणजे आशाताईंचा गळा
ज्येष्ठ अभिनेत्री Vandana Gupte लिहितात, “महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलं खणखणीत स्वरयंत्र म्हणजे आशाताईंचा गळा. सगळ्या गाणप्रकारात त्या-त्या गाण्याचं वैशिष्ट, प्रसंगाची गरज, गाणं पडद्यावर सादर करणारी अभिनेत्री, तिचा स्वभाव, कवींनी लिहिलेले शब्दांचे खेळ याचा आशाताई सर्वांगानी विचार करत आणि मग रियाज करून आपल्या कमावलेल्या आवाजातून, सगळ्या करामती करत करत स्वरातून अभिनयांकित गाणं सादर करणे ही आशाताईंची खासियत होती.”

“आशा ताईंनी गायलेलं कुठंही गाणं म्हणजे एक संपूर्ण कथा, संपूर्ण कादंबरी, आपल्या डोळ्यासमोर त्या त्या भावनेसह उभी राहते इतकं ते परिपूर्ण असायचं. असा एकही गाण्याचा प्रकार नाही ज्यावर त्यांनी आपली स्वर्गीय सुरांची छाप सोडली नाही.भारताच्या संपूर्ण नकाशावरचा कानाकोपरा लतादीदी आणि आशाताई ह्या दोन भगिनींनी त्यांच्या गाण्यांनी व्यापून टाकलाय असं सहज म्हणता येईल.आशाताई तुम्ही अमर आहातच”, असे लिहित वंदना गुप्ते यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
================================
हे देखील वाचा : Asha Bhosle :“हातातून माईक सुटरणार असेल तर मला मृत्यू यावा”
================================
संगीताची आशा माळवली
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताची जादू प्रेक्षकांवर करणाऱ्या Ajay Gogavale आणि Atul Gogavale यांनी अगदी मोजक्या शब्दांत ताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. दोघांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, “संगीताची आशा माळवली”…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi