Skip to content Skip to sidebar Skip to footer

…आणि Amitabh Bachchan च्या अ‍ॅंग्री यंग मॅनइमेजचा जन्म झाला!

अमिताभच्या ’अ‍ॅंग्री यंग मॅन’ या इमेजला जन्म देणारा सिनेमा म्हणजे प्रकाश मेहरांचा ११ मे १९७३ साली प्रदर्शित झालेला ’जंजीर’. हा सिनेमा अमिताभला कसा मिळाला? कारण तोवर त्याच्या डझनभर फ्लॉप सिनेमाची मालिका बनली होती. जे दोन सिनेमे हिट झाले होते त्यात अमिताभपेक्षा इतरांच क्रेडीट अधिक होतं. (आनंद- राजेश , बॉम्बे टू गोवा – मेहमूद) ’जंजीर’या सिनेमाच्या मेकींग ची कथा फारच इंटरेस्टींग आहे. सलीम जावेद हि लेखक द्वयी धर्मेंद्रकडे हा विषय घेऊन आले.धर्मेंद्र व प्रकाश मेहरा त्या वेळी एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एकत्र आले होते. धर्मेंद्रला कथानक आवडले पण त्याच वेळी प्रकाश मेहरा यांच्या कडे देखील पं मुखराम शर्मा यांच्या कथेचं स्क्रीप्ट होतं.

धरमला सलीम जावेद पेक्षा शर्मांचे कथानक आवडले. त्याने लगेच याच कथेवर काम करण्याचे ठरवले आणि ’समाधी’ या सिनेमाचे शूट चालू झाले. त्यात धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होता. त्यामुळे ‘जंजीर’ चे कथानक मागे पडले, पण या सिनेमात तोच काम करणार व त्या सिनेमाचा निर्माताही बनणार हे नक्की झालं. पण त्याच काळात के ए नाराय़ण यांच्या एका स्टोरीवर अर्जुन हिंगोरानी (जे धरमचे गॉडफादर होते) यांनी धर्मेंद्रला घेऊन ’कहानी किस्मत की’ या सिनेमाची तयारी सुरू केल्याने ’जंजीर’चं प्रोजेक्ट आणखी मागे मागे पडत गेलं. प्रकाश मेहरांचा ’समाधी’ प्रदर्शित झाला हिट झाला आता त्यांनी धर्मेंद्रकडे पुन्हा हा विषय काढला.पण त्याच्या बिझी शेड्यूल मध्ये त्याला अजिबात वेळ नव्हता. शेवटी  बर्‍याच चर्चेनंतर मेहरांना शुभेच्छा देत धर्मेंद्रने सिनेमाचा हट्ट व हक्क सोडला.

आता प्रकाश मेहरांनी नायकाचा शोध सुरू केला. या भूमिकेसाठी त्यांनी देव आनंदला गाठले. राज खोसलाच्या ’काला पानी’ तील त्याच्या भूमिकेनं मेहरा प्रभावित झाले होते. देवला स्क्रिप्ट आवडलं फक्त त्यात ३-४ रोमॅंटीक गाणी टाकली तर मी करेन असा निरोप पाठवला. मेहरा यांनी अर्थातच नकार दिला तेव्हा देवने दुसरे प्रपोजल दिले, ज्यात हा सिनेमा नवकेतनच्या बॅनर खाली बनवला जाईल व दिग्दर्शन मेहराच करतील. मेहरांनी या ऑफरला देखील नकार दिला; कारण त्यांना साचेबध्द नायकाची इमेज या सिनेमात बदलायची होती.नायकाचा शोध चालूच होता. मेहरांनी मग राजकुमारला विचारले. त्यावेळी मद्रासला तो ’दिल का राजा’चे शूटींग करीत होता. त्याने जर ‘जंजीर’ मद्रासलाच शूट करणार असेल तरच काम करण्याची तयारी दर्शवली. (काही प्रसार माध्यमांनी प्रकाश मेहरांनी केसाला चोपडलेल्या तेलाचा उग्र वास राजकुमारला आवडला नाही म्हणून या सिनेमाला त्याने नकार दिल्याचे सांगितले!!!)

================================

हे देखील वाचा : Amitabh Bachchan-Jaya Badhuri यांचे लग्न धुमधडाक्यात का झाले नाही?

================================

मेहरांना सर्वांकडून नकार घंटा मिळत होती. याच काळात त्यांची भेट अभिनेते प्राण यांच्याशी झाली. प्राण यांनी अमिताभचे नाव सुचवले व त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ’बॉम्बे टू गोवा’ हा सिनेमा पहाण्याचा सल्ला दिला. लगेच दुसर्‍या दिवशी मेहरा व सलीम जावेद हा सिनेमा बघायला गेले. ताडमाड उंचीचा काटकुळा अमिताभ प्रथम दर्शनी त्यांना काही आवडला नाही पण शत्रुघ्न सिन्हा सोबतचे त्याचे फाईट सीन व डोळ्यातला अंगार त्यांना आवडला. आणि अमिताभला घेऊन जुगार खेळण्याचा त्यांचा निर्णय झाला.पण प्रश्न इथे संपले नाहीत. काय होते ते प्रश्न ? काय होत्या त्या समस्या ? अमिताभला जंजीरचा नायक म्हणून घेतल्यावर नायिकेचा शोध सुरू झाला. आधीच्या ठरलेल्या प्रोजेक्ट नुसार धर्मेंद्रची नायिका मुमताज असणार होती. मेहरा तिच्याकडे अप्रोच झाले त्यावेळी तिने होकार कळविण्यासाठी थोडा वेळ मागितला. मेहरा गोंधळले. हा काय प्रकार आहे ? तो वर त्यांच्या नावावर तीन हिट सिनेमे (‘हसीना मान जायेगी’, ‘मेला’, ‘समाधी’) जमा होते.

मुमताजच्या वेळकाढू्पणाचे कारण वेगळेच होते. तिने ओ पी रल्हन यांच्या ’बंधे हाथ’ या सिनेमात नुकतेच अमिताभची नायिका म्हणून काम केले होते. हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होता. या सिनेमाच्या रिपोर्टनंतरच ती निर्णय घेणार होती. अमिताभचे दुर्दैव असे की ’बंधे हाथ’ सुपर फ्लॉप ठरला. अमिताभ सोबत काम करून आणखी एका फ्लॉपचे धनी होण्यापेक्षा सिनेमा करीता नकार देणं तिनं पसंत केलं. पण नकाराचे कारण तिने तिचे लंडन स्थित उद्योगपती मयुर वाधवानी सोबत होणारे लग्न व त्याकरीता हातातील प्रोजेक्ट संपविण्याची घाई हे दिले! अमिताभला हे सारं समजत होतं. तो दु:खाने प्रकाश मेहरांना म्हणाला ’लल्ला, अगर मेरी ये फिल्म भी पीट गई तो मैं सब बोरीया बिस्तर बॉंधके अलाहाबाद चला जाऊंगा !’ पण एक व्यक्ती होती जिला अमिताभ व या स्क्रिप्ट वर पूर्ण विश्वास होता ती म्हणजे प्राण!

प्राणने अमिताभला व मेहरांना दोघांना धीर दिला. त्याने स्वत: या सिनेमाकरीता ’शोर’ मधील भूमिकेचा त्याग केला. नायिकेचा शोध चालूच होता. ’समाधी’त जया भादुरी काम करीत होती. तिने अमिताभसोबत ‘बन्सी बिरजू’, ‘प्यार की कहानी’ व ‘एक नजर’ या सिनेमात नायिकेची भूमिका केली होती व तिन्ही सिनेमे फ्लॉप ठरले होते. अमिताभने जयाला या सिनेमात माझ्यासोबत काम करायला कुणीही तयार नाही तू नायिकेची भूमिका करसील का? असा निरोप पाठविला. अमिताभच्या अभिनयाची ताकत जयाने ओळखली होती. हा एक निद्रीस्त ज्वालामुखी आहे याची तिला कल्पना होती. संधी मिळत नसल्याने त्याच्यातील कलावंताची घुसमट होते आहे याची तिला जाणीव होती. तिने होकार दिला व सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले. पहिला मूहुर्ताचा शॉट प्राण वर ’यारी है इमान मेरा’ या कव्वालीच्या प्रसंगाचा होता. सिनेमाच्या क्षेत्रातील लोक, फायनान्सर, वितरक सारे जण प्रकाश मेहरांच्या या प्रोजेक्टला हसत होती. सिनेमात नायकाला गाणी नाहीत, तो नाचत नाही, नायिकेसोबत रोमान्स नाही ’मेहरा साब सठीया गये क्या वो लंबू को लेके क्या दिवाला निकालना चाहते हो?’ असे कुत्सित टोमणे मारत होती. पण सर्वांनी आपला तोल ढळू दिला नाही.

================================

हे देखील वाचा : Amitabh Bachchan ला लाभलेल्या सीनियर नायिका!

================================

लोक जितके टिका करीत होते तितके हे स्ट्रॉंग होत होते. मनोज कुमारने मेहरांना स्वत:च्या प्रॉडक्शन सुरू करून त्या बॅनर खाली हा सिनेमा बनविण्याचा सल्ला दिला व त्याच वेळी अमिताभला स्वत:च्या ’रोटी कपडा और मकान’ करीता साईन करून त्याच्यावर विश्वास दाखविला. सिनेमात अजित (तेजा) व बिंदू (मोना डार्लींग) यांच्या भूमिका जबरदस्त होत्या. अमिताभच्या आतील उर्जेला प्रथमच एवढे मोठे एक्स्पोजर मिळाले. एका नव्या युगाची नांदी झाली. एक नवा अनभिषिक्त सम्राट जन्माला आला.अपयशाला संधी आणि अपमानाला ताकत समजून त्याने पुढे मोठे साम्राज्य उभे केले. ’जंजीर’ व ’बॉबी’ लागोपाठ प्रदर्शित झाले व दोन्ही सुपर हीट ठरले. आज अमिताभ वयाची ८३ वर्षे पूर्ण करत आहे. त्याच्या आजच्या ग्लॅमर पुढे सर्व जण हरखून जातात. पण अभिनयाचे हे उत्तुंग शिखर गाठतानाचा त्याचा प्रवास, तिथला संघर्ष, अपयश, अपमान आजच्या पिढीला कळावेत म्हणून केलेलं हे स्मरण!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!