
Amitabh Bachchan-Jaya Badhuri यांचे लग्न धुमधडाक्यात का झाले नाही?
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे वडील ख्यातनाम कवी हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या ‘दशद्वार से सोपान तक‘ या आत्मचरित्रात अनेक घटनांचा खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी काही शॉकिंग गोष्टींचा उल्लेख केला आहे. अमिताभ–जया यांच्या विवाह सोहळ्यावर त्यानी तपशीलवार लिहिले आहे. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी (Jaya Bhaduri) यांचे लग्न ‘जंजीर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेच 3 जून 1973 रोजी झाले. या लग्नामध्ये अगदी मोजकी मंडळी उपस्थित होती. अमिताभ बच्चन यांच्याकडून फक्त पाच लोक या सोहळ्याला हजर होते. त्यात बच्चन कुटुंबाचे जुने स्नेही आणि मित्र जगदीश राजन तसेच संजय गांधी यांचा समावेश होता. याचे कारण अमिताभची वाढती लोकप्रियता पाहून मीडिया आणि चाहते या सोहळ्याच्या वेळी गर्दी करतील म्हणून त्यांनी या लग्नाची कमालीची गुप्तता पाळली होती अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांच्या अगदी जवळच्या परिवाराला निमंत्रित केले होते.

जगदीश राजन यांना तार करून मुंबईला बोलवून घेण्यात आले. त्यांना हे देखील सांगितले नाही की तुम्हाला कशासाठी बोलावले आहे. तेजी बच्चन यांनी स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी यांना फोन करून लग्नाच्या आमंत्रण दिले. परंतु इंदिरा गांधींनी स्वतः येण्याचे असमर्थता दर्शवली पण संजय गांधी या लग्नाला उपस्थित होते. याशिवाय भगवती चरण वर्मा आणि धर्मवीर भारती एवढेच लोक अमिताभ बच्चन यांच्याकडून विवाह सोहळ्याला निमंत्रित होते. लग्न सोहळा जया भादुरी यांच्या घरी बीच हाऊस येथे न ठेवता त्यांच्या मलबार हिल वरील फॅमिली फ्रेंड यांच्याकडे ठेवला होता. त्यामुळे बारात जया भादुरीच्या घरी न जाता मलबार हिल येथील स्कायलार्क या बिल्डिंगला गेली होती.
लग्न रात्री उशिरापर्यंत चालले. परंतु हरिवंशराय बच्चन यांनी एक मार्क केले की जया भादुरीला सोडून या लग्नाचा फारसा आनंद त्यांच्या कुटुंबीयांनही झालेला नाही. ते या पुस्तकात लिहितात, “जयाच्या पालकांना बंगाली पद्धतीने लग्न करायचे होते, ज्याला आमचा कोणताही आक्षेप नव्हता. पहिला टप्पा होता वर-पूजा, ज्यामध्ये जयाचे वडील भेटवस्तू घेऊन मंगल (अमिताभचे निवासस्थान) येथे आले आणि एक छोटासा समारंभ आयोजित केला. त्यानंतर आम्ही बीच हाऊसमध्ये कन्या पूजा केली. बीच हाऊसमध्ये मला एक अनपेक्षित गोष्ट दिसली. जयाशिवाय कुटुंबातील कोणीही आनंदाचा किंचितही लवलेश दाखवला नाही,” हरिवंश (Harivanshrai Bachchan) यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

त्यांचा हा समज नंतर आणखी पक्का झाला ज्यावेळी बिदाईच्या वेळी त्यांनी जया भादुरीचे वडील तरुण भादुरी यांची गळा भेट घेतली आणि सांगितले,”अमित सारखा जावई तुम्हाला मिळाला त्याबद्दल अभिनंदन!” या वर हरिवंशराय बच्चन यांना अपेक्षा अशी होती की तरुण भादुरी म्हणतील “जया सारखी पुत्रवधू तुम्हाला मिळाल्याबद्दल तुमचेही अभिनंदन” पण तरुण भादुरी यांनी जे उत्तर दिले ते ऐकून हरिवंश राय बच्चन यांना शॉकच बसला. तरुण भादुरी म्हणाले,”मै तो बरबाद हो गया मेरा तो घर ही उजड गया!” हरिवंशराय बच्चन खूपच अप सेट झाले त्यांना कळालेच नाही आपले व्याही असं का बोलले आहे. यानंतर दोन्ही परिवार आपापल्या घरी निघून गेले. हरिवंशराय बच्चन यांच्या मनात मात्र ही गोष्ट काट्यासारखे सलत होती की जया भादुरीचे वडील असं का म्हणाले? पण त्यांनी कधीही त्यांना या बाबत विचारले नाही. दोन्ही कुटुंबीयांमधील संबंध चांगले होते. पण हरिवंशराय बच्चन यांना राहून राहून ती गोष्ट खटकत होती . 1985 साली हरिवंशराय बच्चन यांच्या आत्मचरित्र ‘दशद्वार से सोपान तक’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले त्यात त्यांनी पहिल्यांदा या गोष्टीचा उल्लेख केला.
================================
हे देखील वाचा : Jaya Bachchan : मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया….
================================
अर्थात या गोष्टीचा पुढे खुलासा खूप वर्षानंतर झाला. ज्यावेळी सौम्य बंदोपाध्याय यांनी अमिताभ बच्चन वर पुस्तक लिहीत होते. हे पुस्तक लिहिताना त्यांनी तरुण भादुरी यांची भेट घेतली आणि त्यांची याबाबतची बाजू काय आहे हे समजून घेतलं. तेव्हा तरुण म्हणाले “माझा असं बोलण्याचा उद्देश वेगळाच होता. जया माझ्या घरातील माझा प्राण होता. जेव्हा ती भोपाळ होऊन पुण्याला एफटीटीआयला शिकायला गेली त्यावेळी रात्र रात्र मला झोप लागत नव्हती. सारखा तिचाच विचार मनात येत असायचा. माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली, माझ्या घरात सतत माझ्यासोबत वावरणारी मुलगी जेव्हा लग्न होऊन दुसऱ्या घरात जाते त्यावेळेला ते दुःख काय असतं हे एक वधू पिताच जाणू शकतो. त्या दु:खातून मी बोललो होतो. हरिवंशराय बच्चन साहेबांना हे दुःख कधीच लक्षात येणार नाही. कारण त्यांना दोन्ही मुलेच आहेत. माझ्या मुलीच्या विरह दुःखाने मी ते शब्द बोललो होतो. यात मला कुठेही बच्चन साहेबांना दुखावण्याचा विचार नव्हता!”
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी