
Raj Kapoor : ‘खान दोस्त’ चित्रपट पन्नास वर्षांचा झाला!
१९८० सालची गोष्ट. ‘अब्दुल्ला’ चित्रपट प्रदर्शित झाला होता (करमुक्तही झाला) आणि Raj Kapoorला एका इंग्रजी मासिकाच्या पत्रकाराने तिरकस प्रश्न विचारुला, तुम्ही स्वतः एक उत्तम आणि यशस्वी दिग्दर्शक आहात, आणि त्याबरोबरच अतिशय दर्जेदार अभिनय करता, तुमची स्वतःची अभिनय शैली आहे, तरीदेखील तुम्ही संजय खान दिग्दर्शित ‘अब्दुल्ला’ या चित्रपटात शीर्षक भूमिका का साकारली? यावर राज कपूरने अतिशय चाणाक्षपणे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्तर दिले, “मी स्वतः दिग्दर्शक असलो तरी अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारत असताना माझे दिग्दर्शनाचे जोडे स्टुडिओबाहेर अथवा सेटबाहेर ठेवतो आणि सेटवरचा दिग्दर्शकाच्या सुचनेनुसार वागतो, काम करतो”, हा किस्सा त्या काळात फार गाजला. ‘अब्दुल्ला’ राज कपूरने साकारला आहे.
राज कपूरने अभिनेता म्हणून मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘छलिया’ (१९६०) पासून नरेशकुमार दिग्दर्शित ‘दो जासूस’ (१९७५) आणि अगदी आपला सुपुत्र रणधीर कपूर दिग्दर्शित ‘कल आज और कल’ (१९७१), ‘धरम करम’ (१९७५) पासून हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘अनाडी’ (१९५९), ‘आशिक’ (१९६२), ‘नौकरी’ (१९७८) पर्यंत अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारल्या. त्यांतील काही भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या. काही चित्रपट लोकप्रिय आहेत. अनंत ठाकूर दिग्दर्शित ‘चोरी चोरी’ (१९५६) या चित्रपटाचा खास उल्लेख करायला हवा. आणि असाच एक चित्रपट ‘खान दोस्त’ (मुंबईत प्रदर्शित २७ मार्च १९७६. मेन थियेटर नाझ. पन्नास वर्षे पूर्ण)

दुलाल गुहा दिग्दर्शित या चित्रपटात राज कपूर पोलीस हवालदार रामदीन पांडे या भूमिकेत आहे तर शत्रुघ्न सिन्हा गुन्हेगार रहेमान खान या व्यक्तीरेखेत आहे. एका गुन्ह्यात रहेमान खानला शिक्षा झाली असून त्याला गजाआड करण्यात आले आहे. आणि भोळा भाबडा रामदीन पांडे त्याच जेलमध्ये कामाला आहे. त्यातून त्या दोघांची ओळख होते, ती वाढते, रेहमान खान रामदीन पांडेचा विश्वास संपादन करतो आणि त्याला विनवणी करतो की, फक्त एक रात्र मला माझ्या आजारी आईला भेटण्यासाठी जेलमधून बाहेर जायला दे. उजाडण्यापूर्वी मी पुन्हा एकदा गजाआड होईन. रामदीन पांडे यासाठी अजिबात तयार होत नाही. रेहमान खान परत आला नाही तर? हा प्रश्न त्याला सतावत असतो. आणि तो प्रश्न योग्यच असतो. पण तरीही रहेमान खान त्याच्या गळी ही गोष्ट उतरवतो आणि रामदीन पांडे जेलचा दरवाजा उघडतो. जेलबाहेर पडताच रेहमान खान आपल्या गावी पळतो ते थेट झरिनाच्या (मिठू मुखर्जी) कोठ्यावर….
================================
हे देखील वाचा : Anil Kapoor राजा, Madhuri Dixit राणी; तरीही ‘राजकुमार’ कोणी नाही पाहिला?
================================
मध्यंतर
आता आपल्याला विलक्षण उत्सुकता असते, रेहमान खान शब्द दिल्याप्रमाणे जेलमध्ये परतणार का? आणि जर परतला नाही तर हवालदार रामदीन पांडेचे काय? ही पटकथा आहे सुभाष घई आणि बी. बी. भल्ला यांची आणि संवाद आहेत जैनेद्र जैन यांचे! सुभाष घईनी अभिनेता म्हणून आपला जम बसत नाही म्हणून पटकथा लेखक म्हणून काम करणं सुरू केलं त्यातील हा एक चित्रपट. पण हा चित्रपट रसिकांना आवडला नाही. विशेषतः राज कपूरने या चित्रपटात भूमिका का साकारली असा अनेकांचा प्रश्न होता.
================================
हे देखील वाचा : Devgan CineX : सेलिब्रिटीज चित्रपट वितरण आणि प्रदर्शनात
================================
या चित्रपटात योगिता बाली, सत्येन कप्पू, सुलोचनादीदी, असित सेन, लीला मिश्रा, राजन हक्सर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटातील मन्ना डे यांनी गायलेले मेरी जिंदगी मुझपे रोये हे गाणे या चित्रपटाचं सार आहे. दिग्दर्शक दुलाल गुहा हे मसालेदार मनोरंजक चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. ‘चंदा और सूरज’ (१९६५), ‘ज्योती’ (१९६९), ‘धरती कहे पुकार के’ (१९६९), ‘दुश्मन’ (१९७२), ‘दोस्त’ (१९७४), ‘दो अन्जाने’ (१९७४), ‘प्रतिज्ञा’ (१९९५) असे चित्रपट दिग्दर्शित करत करत ते ‘ खान दोस्त’ पर्यत आले पण महत्त्वाच्या टप्प्यावर अपयशी ठरले.

पुढे त्यांनी ‘दिल का हीरा’ (१९७९), ‘धुआ’ (१९८१) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्या काळातील आघाडीच्या कलाकारांनी त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातून भूमिका साकारल्या हे विशेष. राज कपूरने त्यांच्याही दिग्दर्शनातील चित्रपटात काम केले आहे हे विशेष उल्लेखनीय. राज कपूर उगाच होकार देईल का? ‘खान दोस्त’ चित्रपट पडद्यावर येताच जमीनदोस्त झाला असे त्या दिवसांत गंमतीने म्हटले जात असे….