
‘हे’ गाणे हावडा ब्रिज खाली नाही तर मुंबईच्या Natraj Studio येथे चित्रित केले होते!
दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी ‘आराधना’ (१९६९) या चित्रपटातील ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू..’ या गाण्याच्या वेळी केलेला जुगाड सर्वांना माहिती आहे. दार्जिलिंगमध्ये या गाण्याच्या शूटिंगच्या शेड्यूल होते. नेमके त्याच वेळेला शर्मिला टागोर सत्यजित रे यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे ती लोकेशन वर पोचू शकली नाही. शक्ती सामंत यांनी भन्नाट जुगाड केला त्यानी छायाचित्रकार आलोक दासगुप्ता यांना फक्त राजेश खन्ना आणि सुजित कुमार यांच्यावरील शॉट्स दार्जीलिंगला शूट केले. आणि ट्रेनमधील शर्मिला टागोरचे शॉट त्यांनी मुंबईला स्टुडिओमध्ये शूट केले. म्हणजे दार्जिलिंगच्या शूटच्या वेळी शर्मिला टागोर नव्हती तर मुंबईच्या शूटच्या वेळी राजेश खन्ना नव्हता! नंतर दोन्ही शॉट synchronization एवढे जबरदस्त झाले की कुणालाही हे दोन वेगवेगळे शूट केलेले शॉट आहेत असे वाटले नाही.
असाच काहीसा प्रकार त्यांनी ‘अमर प्रेम’ (1972) या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्याच्या शूटिंगच्या वेळी केला होता. काही दिवसापूर्वीर्वी अभिनेत्री शर्मिला टागोर कपिल शर्मा शो मध्ये आलेली असताना त्यांनी या गोष्टींचा खुलासा केला होता. ‘अमर प्रेम’ या चित्रपटात ‘चिंगारी कोई भडके..’ हे अतिशय लोकप्रिय गाणे होते. किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं. याला संगीत आर. डी बर्मन यांचे होते. हे गाणं या भैरवी रागावर आधारित होतं. चित्रपटाचे कथानक कलकत्ता येथे घडत असल्याने दिग्दर्शक शक्तीसामंत यांना हे गाणे कलकत्त्याच्या हुगळी नदीमध्ये हावडा ब्रिजच्या बॅक ड्रॉपवर चित्रित करायचे होते. त्या पद्धतीने त्यांनी सर्व कृ मेंबर्सला तशा सूचना दिल्या. हा काळ साधारणता 1971 चा होता. राजेश खन्ना सुपरस्टार पदावर आरुढ झाला होता. संपूर्ण देशभर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. जेव्हा हावडा ब्रिज परिसरात शूटिंग होणार आहे आणि या चित्रीकरणासाठी मुंबईहून राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर येणार आहेत असे कलकत्ता येथील राजेश खन्ना यांच्या फॅन्सला कळाल्यानंतर त्यांनी हावडा ब्रिजवर प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली.

शूटिंगला अजून वेळ होता त्याची पूर्वतयारी चालू होती पण ही पूर्वतयारी पाहायला देखील लोकांची प्रचंड मोठी गर्दी होती. हावडा ब्रिजवर गर्दी झाल्यामुळे ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम सुरू झाला. कलकत्त्याच्या पोलीस डिपार्टमेंटने याची दखल घेतली त्यांनी विचार केला ‘आज शूटिंग नसताना जर इतकी गर्दी आहे आणि उद्या जर या सिनेमाची शूटिंग सुरू झाले तर केवढी प्रचंड गर्दी होईल आणि यातून जर काही अपघात झाला तर हजारो निष्पाप लोकांचा जीव यामध्ये जाऊ शकतो!’ म्हणून त्यांनी थेट शक्ती सामंत यांना मुंबईला फोन करून तुम्ही इथे शूटिंग अजिबात करू नका असे सांगितले. दिग्दर्शक शक्ती सामंत सुरुवातीला नाराज झाले पण नंतर पोलिसांच्या सुचने मागचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या कृ मेंबर्सला हावडा ब्रिज आणि संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी तिथे लाईटचे पाण्यात उमटणारे प्रतिबिंब याचे भरपूर शॉटस घ्यायला सांगितले. नावेतून जेव्हा हावडा ब्रिज दिसतो त्या वेळेला लाईटचे पाण्याच्या हेलकाव्याने दिसणारे प्रतिबिंब आणि लॉन्ग शॉट मधून होडीवर खाली होताना त्यांची हालचाल याचे परफेक्ट शूटिंग क्रू मेंबर्सनी करून घेतले.
================================
हे देखील वाचा : हँडसम शशी कपूरला पाहून तरुण शर्मिला टागोर त्याच्यावर लट्टू झाली होती!
================================

इकडे मुंबईमध्ये नटराज स्टुडिओमध्ये शक्ती सामंत यांनी एक लाकडी हावडा ब्रिज बनवला! आर्ट डायरेक्टर शांती दास यांनी परफेक्ट ब्रिज बनवला! नंतर नटराज स्टुडिओमध्ये एक आर्टिफिशियल वॉटर टँक बनवला आणि एक होडी तिथे ठेवून हे गाणे चित्रीत केले! तुम्ही पाहा हे सर्व गाणे क्लोजअपमध्ये शूट केले आहे. गाण्याच्या इंटरल्यूड आणि प्रील्यूडच्या वेळी कलकत्ता येथे शूट केलेले actual shot दाखवण्यात आले आहेत. आज इतकी वर्षे झाली तरी हा जुगाड कुणाच्या लक्षात आला नाही. खुद्द कलकत्ता येथील नागरिकांना प्रश्न पडला एवढ्या रहदारी असलेल्या हावडा ब्रिज परीसरात कधी आणि केव्हा शूटिंग केले? या गाण्याची चित्रीकरण तब्बल आठ दिवस चालले असे शर्मिला टागोर यांनी सांगितले .”आठ दिवस ते पाणी साचून राहिल्यामुळे गाण्याच्या शूटिंगच्या वेळेला पाण्याचा दुर्गंध येत होता परंतु अशाही अवस्थेत आम्ही हे सॉफ्ट रोमँटिक गाणे शूट केले!”
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी