
Sanai Choughade Serial: स्टार प्रवाहवरच्या मालिकेनंतर आता झी मराठीच्या मालिकेमध्ये झळकणार अभिनेत्री Aditi Sarangdhar !
टीआरपीच्या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी सध्या अनेक टीव्ही चॅनल्स नव्या मालिकांची तयारी करत आहेत. अशातच सनई चौघडे (Sanai Choughade) ही नवी मालिका Zee Marathi वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) एका दमदार आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, Star Pravah वरील मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या अदितीची ही नवीन एन्ट्री प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. या मालिकेत अदिती ‘तेजस्विनी खानोलकर’ ही भूमिका साकारत आहे. आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अदिती म्हणाली, “मी सनई चौघडे मालिकेत तेजस्विनी खानोलकर ची व्यक्तीरेखा साकारतेय. नाव जस भारदस्त आहे, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. माझ्या सुदैवानं मला नेहमीच छान भारदस्त भूमिका मिळालेल्या आहेत.” (Sanai Choughade Serial)

तेजस्विनीच्या व्यक्तिरेखेच्या भावविश्वाबद्दल सांगताना अदिती म्हणाली की, “तेजस्विनीच्या मनात बऱ्याच वर्षांपासून अनेक गोष्टी आहेत. तिनं खूप सहन केलेलं आहे, खूप काही भोगलेलं आहे, अनुभवलेलं आहे. बऱ्याच गोष्टीनं तिच्या मनावर परिणाम केलेला आहे. दिसायला जे जसं दिसतं ते तसं मुळात नसतं, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे.” ती पुढे अस ही म्हणाली, “ती आपल्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे, आपल्या मुलांवर अत्यंत प्रेम करणारी आहे. झी मराठीवर मी नायिकेची, खलनायिकेची भूमिका केली आहे, पण आता पहिल्यांदा आता आईची भूमिका करणार आहे. मला झी मराठीने नेहमीच अशा सशक्त व्यक्तीरेखा दिलेल्या आहेत. या भूमिकेसाठी माझी निवड कशी झाली हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे, कारण आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरु आहेत, बऱ्याच नाटकांचं वाचन चालू आहे, मी आता स्वतः आई असल्यामुळे मला सशक्त भूमिका हवी होती.”

आईची भूमिका साकारण्याबद्दल सुरुवातीला संकोच वाटत असल्याचं अदितीने स्पष्ट केलं. ती म्हणाली, “तेजस्विनीची भूमिका अगदी तशीच आहे, जिचं स्वतःच काही म्हणणं आहे, तिच्या भोवती बऱ्याच गोष्टी फिरत आहेत. खर सांगायचं तर आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती. पण काही गोष्टी तुम्ही स्वीकारता, हल्ली टेलिव्हिजन मध्येही चांगले बदल घडून येत आहेत. म्ह्णून मी ह्या सगळ्याचा खोलवर विचार करून माझ्या तत्वांचा सांभाळ करत, हि भूमिका स्वीकारली.” आपल्या कारकिर्दीतील विविध भूमिका आठवत अदिती म्हणाली, “वादळवाट मधली रमा चौधरी, लक्ष मधली सलोनी देशमुख, हम बने तुम बने मधली तुलीका, येऊ कशी तशी मी नांदायला मधली मालविका आणि आता सनई चौघडे मधली तेजस्विनी… प्रत्येक भूमिकेचे काहीतरी कंगोरे असतात. दिसण्यात, वागण्यात आणि वावरण्यात प्रत्येक व्यक्तिरेखेचं वेगळेपण असतं.” (Sanai Choughade Serial)
=================================
=================================
ती पुढे म्हणाली, “मी अनेक मालिका केलेल्या आहेत तर मी नक्की म्हणेन की लेखकापासून प्रत्येकानेच माझ्या भूमिकेतलं वेगळेपण जपलेलं आहे. आणि त्याच खास वेगळेपणासोबत प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी मी माझ्या परीने खूप प्रयत्न केलेला आहे.”नव्या भूमिकेतून अदिती सारंगधर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर वेगळ्या रूपात येणार असून ‘सनई चौघडे’ मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.