
मनमोहन देसाई राजेश-हेमाला घेऊन बनवणार होते Bajirao Mastani!
दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी २०१५ साली ‘बाजीराव मस्तानी’ हा ऐतिहासिक चित्रपट निर्माण केला होता. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला देशभर चांगली यश मिळाले. मराठ्यांचा इतिहास हिंदी सिनेमाच्या पडद्यावर तसा कमीच आलेला आहे. अलीकडे शिवकालीन चित्रपट मोठ्या स्केलवर आणि भव्य दिव्यरित्या पडद्यावर येत आहेत. पेशवेकालीन चित्रपट मात्र संख्येने कमी आहेत. संजय लीला भन्साली यांनी मात्र ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट बनवून हा इतिहास नव्या पिढीच्या समोर आणला. या सिनेमावर त्या इतिहासाचा विपर्यास केला अशी त्या वेळी टीका देखील झाली. पण या निमित्ताने मराठ्यांच्या पराक्रमी कालखंडाला रुपेरी पडद्यावर आणून यशस्वी करून दाखविण्याचे श्रेय नक्कीच संजय लीला भन्साळी यांना द्यावे लागेल.

‘बाजीराव मस्तानी’ याच नावाचा सत्तरच्या दशकात देखील एक चित्रपट येणार होता. हा चित्रपट देखील फार मोठ्या स्केलवर बनणार होता. या सिनेमाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई करणार होते. या चित्रपटात बाजीराव ची भूमिका राजेश खन्ना आणि मस्तानीचे भूमिकेत हेमामालिनी असणार होते. या सिनेमाची अनाउन्समेंट मोठ्या गाजावाजात झाली होती. त्या काळातल्या ट्रेड मॅगझिन मध्ये या सिनेमाचे पोस्टर पब्लिश करण्यात आले होते. या सिनेमाचे डायलॉग कादर खान लिहिणार होते. तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल असणार होते. मोठ्या गाजावाजात जाहीर झालेला हा सिनेमा दुर्दैवाने या सिनेमाचे एक रील ही शूट झाले नाही आणि हा चित्रपट बंद पडला. या बंद पडण्याची बरीच कारणे दिली जातात.

एक तर त्या काळात मनमोहन देसाई यांचे तीन-चार चित्रपट फ्लोअरवर होते. अमिताभ बच्चन यांना घेऊन ते चित्रपट बनवत होते. हेमामालिनी या सुद्धा त्या काळात मोठ्या बिझी स्टार होत्या. त्यामुळे त्यांच्या तारखा मिळणं अशक्य होतं. राजेश खन्ना सुपरस्टार पदावरून पाय उतार झाला असला तरी त्याचा ऑरा कायम होता. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे हा चित्रपट फायनली बंद पडला. राजेश खन्नाला बाजीराव च्या रूपात पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. तसे राजेश खन्नाने ऐतिहासिक सिनेमात काम केल्याचे आठवत नाही. मनमोहन देसाई यांचा पिंड देखील ऐतिहासिक सिनेमाचा नव्हता. त्या मुळे हा सिनेमा त्यांना कितपत पेलला असता शंकाच आहे. हेमामालिनीचा या काळात आणखी एक चित्रपट असाच बंद पडला तो चित्रपट दिग्दर्शक गुलजार बनवत होते. चित्रपट होता ‘देवदास’. शरद बाबूंच्या कथेवरील ‘देवदास’ १९३५ साली कुंदन लाल सहगल कॅन्सल यांनी तर १९५५ साली दिलीप कुमार यांनी साकारला होता.
================================
हे देखील वाचा : या कारणामुळे हेमा मालिनीने बी ग्रेड सी ग्रेड सिनेमे स्वीकारले!
================================
सत्तरच्या दशकातील गुलजार यांच्या ‘देवदास’ चित्रपटात मुख्य भूमिकेत धर्मेंद्र तर पारोच्या भूमिकेमध्ये शर्मिला टागोर आणि चंद्रमुखीच्या भूमिकेमध्ये हेमामालिनी असणार होते. या चित्रपटातील एका गाण्याचे रेकॉर्डिंग देखील झाले होते. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. चित्रपटाला संगीत आर. डी बर्मन यांचे होते. पण हा चित्रपट देखील काही भागांचे शूट झाल्यानंतर बंद पडला. मनमोहन देसाई यांचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट बंद पडण्याचे एक कारण असे देखील दिले जाते की हेमामालिनीचा ‘मीरा’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अव्हेरला होता. ऐतिहासिक चित्रपटांना सत्तरच्या दशकामध्ये फारसा प्रेक्षकवर्ग लाभत नव्हता हे देखील बाजीराव मस्तानी हा चित्रपट बंद होण्याचे कारण सांगितले जाते. आज या चित्रपटाची आठवण म्हणजे केवळ एक पोस्टर एवढीच राहिली आहे.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी