
Amitabh Bachchan च्या चित्रपटाचे नाव बदलावे?
तुम्ही अमिताभ बच्चनचे जबरा फॅन असाल तर त्याचा ‘ सत्यम’ नावाचा चित्रपट कधी बरं पडद्यावर आला होता ते सांगा? स्मरणशक्तीला थोडा ताण दिलात तरी प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जादुगर’ (१९८९) नावाचा त्याचा चित्रपट आठवेल. अमिताभ बच्चनचा तो त्या काळातील सगळ्यात फ्लॉप चित्रपट होता. खरं तर प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन ही सुपर डुपर हिट जोडी. ‘जंजी ‘ पासून ‘शराबी’पर्यंत जी जमली ती हेरा फेरीपासून लागोपाठ सुपर हिट चित्रपट देणारी ठरली. त्यातच ‘जादुगर’ आला. या जोडीची जादू चाललीच नाही. तरी तो चित्रपट माहीत आहे.

‘सत्यम’ चित्रपट कोणता हे मात्र सांगता येणार नाही. कारण त्याचा या नावाचा चित्रपट अजूनपर्यंत तरी नव्हता. पण आता मात्र आहे. थोडं बुचकळ्यात पडला ना? हीच तर खरी चित्रपटाच्या जगाची गंमत आहे. यू ट्यूबवर हा ‘सत्यम’ तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित तुम्हाला वाटेल की हा चित्रपट यू ट्यूबसाठी अथवा ओटीटीसाठी निर्माण केला असावा. पण तसे अजिबात नाही. हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला आहे आणि त्यावेळी त्याचे नाव होते, ‘ मै आझाद हू’. टीनू आनंद दिग्दर्शित हा वास्तववादी चित्रपट होता. शबाना आझमी त्यात नायिका होती.

तात्कालिक समिक्षकानी या चित्रपटाची भरभरून तारीफ केली (तशी ती ‘जादुगर’ या चित्रपटाचीही केली होती. म्हणून रसिकांनी चित्रपट डोक्यावर घेतला नाही.) अमिताभच्या चाहत्यांना हा चित्रपट फारसा आवडला नाही आणि ‘ मै आझाद हू’ हळूहळू मागे पडत गेला. हा चित्रपट सेटवर गेला तेव्हा त्याचं नाव ‘सच’ असे होते. ते बदलून ‘मै आझाद हू’ असे केले होते. आता मात्र तो ‘सत्यम’ या नावाने यू ट्यूबवर आला आहे. आजची डिजिटल पिढी सोशल मीडियात सतत काही ना काही शोधत असते, त्यांना हा चित्रपट नक्कीच सापडेल. पण अमिताभ बच्चनचा या नावाचा चित्रपट असल्याचे माहीत नसल्याने त्याकडे दुर्लक्षही कराल.
================================
हे देखील वाचा : खरंच Ameena चित्रपटाने शंभर आठवडे मुक्काम केला
================================
अमिताभ बच्चनच्या चित्रपटाच्या नावात बदल करणं हादेखील एक रंजक फंडा आहे. चित्रपटाच्या जगात काहीही घडू शकते हे एकदा मान्य केलेत की त्यातील अशा अनेक गोष्टी पचवता येतील. हसण्यावारी नेता येतील. एवीतेवी आपला चित्रपट आणि चित्रपटसृष्टी हे म्हणजे, एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट आहे. प्रत्यक्षात तसे ते नाही. येथे अनेक प्रकारच्या कला आणि तांत्रिक प्रगती यांची सरमिसळ आहे. पण विचारात कोण घेतोय? आणि कशाला?
अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या सुपर डुपर हिट जोडीचा राकेशकुमार दिग्दर्शित दो और दो पांच’ (१९८०) हा चित्रपट अनेक वर्षांनी ‘ दो एक्के’ अशा बदललेल्या नावाने प्रदर्शित करण्यात आला. आता नाव बदललं म्हणून चित्रपटाच्या दर्जात सुधारणा होत नाही आणि ते शक्यही नाही. मुळात हा फसलेला चित्रपट होता. फर्स्ट रनला रसिकांनी नाकारला. त्यांचा तो अधिकार आहे. चित्रपटाच्या यशापयशाला प्रेक्षकांना अजिबात दोष देऊ नये. या चित्रपटात हेमा मालिनी आणि परवीन बाबी या नायिका आहेत.

अमिताभ बच्चनच्या चित्रपटाच्या नावात बदल करणं हे नवीन अजिबात नाही. तुम्हाला अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची भूमिका असलेला प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘नास्तिक’ ( १९८३) हा चित्रपट नक्कीच माहित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट निर्मितीवस्थेत फार रखडला आहे हे पडदाभर दिसत होते. तरीदेखील अमिताभवरील प्रेमाखातर अनेकांनी तो पाहिला.
================================
हे देखील वाचा : Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई
================================
हा चित्रपट उत्तर भारतातील अनेक छोट्या छोट्या शहरातून प्रदर्शित करताना त्याचे नाव चक्क बदलले आणि ते ठेवले ‘ अधर्मी ‘. तिकडच्या त्या शहरात ‘ नास्तिक ‘ नाव समजणार नाही असा बहुतेक स्थानिक पातळीवरील वितरकांचा समज असावा. नाव बदलले तरी चित्रपटाच्या नशिबात फरक पडला नाही. हे नाव बदल पोस्टरवर असते. सेन्सॉर प्रमाणपत्र मात्र मूळ नावाने असते. फार पूर्वी तेही बदलता येत असे. तो विषयच वेगळा.