
Chori Chori Chupke Chupke चित्रपटाची पंचवीशी…..
चित्रपटाच्या जगात यशासारखे वजनदार आणि महत्त्वाचे असे काहीही नाही, नसते आणि हा अलिखित नियम दिग्दर्शकालाही लागू पडतो. त्याचच तर हे माध्यम आहे. एकापाठोपाठ एक चित्रपट कमी अधिक प्रमाणात सुपर डुपर हिट ठरत राहिला रे राहिला, त्या चित्रपटाचे दिग्दर्शकांचे व्हिजन अधिकाधिक खुलत जाते, पडद्यावर चित्रपट रंगत जातो. दिग्दर्शक अब्बास मस्तान यांच्याबाबत हेच तर घडले आणि नव्वदच्या दशकातील रोमांचक, नाट्यमय चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. (Director Abbas Mustan)
याच वाटचालीतील ‘चोरी चोरी चुपके चुपके’ (Chori Chori Chupke Chupke) (मुंबईत प्रदर्शित १० मार्च २००१) च्या प्रदर्शनास पंचवीस वर्षे पूर्ण झाली. अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘अग्निकाल’ (१९९०) हा छोट्या शहरातील स्थानिक पातळीवरील राजकारण, समाजकारण आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवरचा मसालेदार मनोरंजक चित्रपट. त्यानंतरचा ‘खिलाडी’ (१९९२) हा चित्रपट रवि टंडन दिग्दर्शित ‘खेल खेल में’ (१९७५) या सुपर डुपर हिट म्युझिकल रहस्यरंजक चित्रपटाची रिमेक. ‘खिलाडी’ लोकप्रिय ठरला आणि एकाच वेळी अब्बास मस्तान आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचं नशिब फळल. म्हटलं ना, चित्रपटाच्या जगात प्रत्येकाला एक सुपर डुपर हिट हवाच असतो. अब्बास मस्तान यांनी मग कधी एखाद्या विदेशी चित्रपटाची थीम तर कधी एखाद्या जुन्या रहस्यमय हिंदी चित्रपटाची रिमेक अशी वाटचाल सुरू केली.

अब्बास मस्तान यांनी ‘बाझीगर’ (१९९३), ‘दरार’ (१९९६), ‘सोल्जर’ (१९९८), ‘बादशाह’ ( १९९९) असे करत करत ‘चोरी चोरी चुपके चुपके’ पर्यंत वाटचाल केली. त्यानंतरही त्यांनी ‘अजनबी’ (२००१), ‘हमराज’ (२००२), ‘ऐतराज’ (२००४) असे काही दमदार रहस्यरंजक चित्रपट पडद्यावर आणले. त्यानंतर मात्र त्यांना उतरती कळा लागली. ते यशस्वी होत असताना त्यांच्या दिग्दर्शनात काहींना विजय आनंद दिग्दर्शित चित्रपटांची चमक दिसली. यशाची हीच तर खरी गंमत आहे. तेव्हाच तुलना होते.
‘चोरी चोरी चुपके चुपके’ तांत्रिकदृष्ट्या सक्षम चित्रपट. नीरज व्होरा याची कथा अतिशय नाट्यमय, त्यावरची श्याम गोयल यांची पटकथा आणि जावेद सिद्दीकी यांचे संवादही प्रभावी. राज मल्होत्रा (Salman Khan) आणि प्रिया (Rani Mukherjee) यांच्या सुखी वैवाहिक जीवनात आता तान्हुल्या पाहुणा म्हणून म्हणून सगळे कुटुंबीय आनंदात आहेत. दोघांचेही नातेवाईक काही स्वप्नेही पाहताहेत आणि अशातच एका अपघातात प्रियाच्या पोटातील बाळ दगावते. हे कुटुंबातील ज्येष्ठांना वगैरे समजलं तर घात होईल अशी अतिशय स्वाभाविक अशी भीती राज आणि प्रिया यांना वाटते.

आता करायचं काय? एका इंग्रजी पुस्तकात वाचलेल्या गोष्टीनुसार सरोगसी हा पर्याय असतो. खूप विचाराअंती राज आणि प्रिया एक धाडसी निर्णय घेतात. त्यासाठी त्यांना मधुबाला सिंग ‘मधु’ ( Preity Zinta) भेटते, व्यवहारदेखिल ठरतो. पण…. पण अचानक मधु एक धाडसी निर्णय घेते आणि एक रोमांचक पेच निर्माण होतो. तो या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे. अब्बास मस्तान तेथे चकमा देतात. छायाचित्रणकार थाॅमस झेव्हिअर आणि संकलक हुसैन बरमावाला यांनी हे सगळे नाट्य खुलवले. समीर यांच्या गीतांना अन्नू मलिक यांचे संगीत यांचीही कारागिरी उत्तम. एक दोन गाणी लोकप्रिय ठरली.
================================
हे देखील वाचा : खरंच Ameena चित्रपटाने शंभर आठवडे मुक्काम केला
================================
तरीदेखील या चित्रपटाच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असतानाच या चित्रपटाचे निर्माते नझिम रिझवी यांना काही कारणास्तव अटक झाली….त्या काळात रानी मुखर्जी आणि प्रीती झिंटा या जिवलग मैत्रिणी म्हणून कौतुकाच्या ठरत होत्या. चित्रपटसृष्टीत दोन अभिनेत्रींची मैत्री ही अतिशय दुर्मिळ गोष्ट. पण घडली मात्र खरी. चित्रपटात दीप्ती भटनागर हिचं एक पक्कडबाज आयटेम नृत्य आहे. एखाद्या चित्रपटाचा असा पंचवीस वर्षांचा यशस्वी प्रवास ही उल्लेखनीय गोष्ट.
