Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vinod Mehra : ‘दरिया किनारी एक बंगलो’; गाणं पन्नास वर्षांचे झाले

ऐकत काय होतो? आवडत काय होते? आणि पाहावे काय लागले? ते दिवस असे नव्हते. आज आपल्या हातातील मोबाईलवर नवीन चित्रपटाची घोषणा झाली रे झाली की, केवढी तरी माहिती मिळत मिळत जाते. माहितीचा स्फोट होत जातो.  त्यात तो चित्रपट निर्मितीवस्थेत असतानाच त्यातल्या गाण्याचा मुखडा पाहायला मिळतोय, अगदी अख्खं गाणेही पाहायला मिळते, आवडलं तर ते पुन्हा पुन्हा पाहू शकतो…. असे योग हल्ली कमीच. पन्नास वर्षांपूर्वी असं काही नव्हतंच हे सांगायची गरजच नाही. सगळ्या गोष्टी कशा शांत अथवा मध्यम लयीत सुरु असत. जगणं जाणवायचे. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होत आले की त्याच्या गाण्याची ध्वनिमुद्रिका प्रकाशित करण्यात येत असे. चित्रपट संगीताचे शौकीन (दीवाने) नवीन चित्रपटाच्या गाण्यांच्या अशा ध्वनिमुद्रिकेकडे विशेष लक्ष ठेवून असत….

अशातच एके दिवशी मेहमूद निर्मित आणि एस. रामनाथन दिग्दर्शित ‘सबसे बडा रुपय्या’ या चित्रपटाची ध्वनीफित मार्केटमध्ये आली. १९७६ च्या अगदी सुरुवातीच्या दिवसांतील ही गोष्ट. तोपर्यंत चित्रपट संगीत शौकीनाना या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून संगीत बासू मनोहारी यांचे आहे हे माहिती झाले होते. बासू मनोहारी म्हणजे संगीतकार राहुल देव बर्मनचे अनेक वर्षांपासूनचे सहाय्यक हे चित्रपट संगीत शौकीनाना चागलेच ज्ञात होते. मेहमूद उत्तम अफाट लोकप्रिय विनोदी अभिनेता म्हणून ख्यातनाम असला तरी आपल्या चित्रपटासाठी एखाद्या नवीन संगीतकारालाही संधी देण्यासाठी प्रसिद्ध.

तात्पर्य, त्याचा कान चांगला होता. टॅलेन्टला वेळीच संधी द्यावी असा तो सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असे. आपल्या निर्मितीतील एस. ए. अकबर दिग्दर्शित ‘छोटे नवाब’ (१९६१)साठी राहुल देव बर्मन, आपल्या दिग्दर्शनातील ‘कुंवारा बाप’ (१९७४) साठी राजेश रोशन यांना संधी दिल्यावर आणि त्यांनी उत्तम स्कोअर केल्यावर (स्वतःचे स्थान निर्माण केल्यावर) ‘सबसे बडा रुपय्या’ साठी बासू मनोहारी यांना मोठीच संधी दिली आणि त्यांनीही तीन गाणी छान दिली. वादा करो जानम (पार्श्वगायक लता मंगेशकर आणि किशोरकुमार) हे प्रेम गीत, ना बिवी ना बच्चा ना बाप बडा ना मैया, द होल थिंग इस दॅट सबसे बडा रुपय्या (मेहमूदने एन्जॉय करत गायलेले शीर्षक गीत) या गाण्यासह दरिया किनारी एक बंगलो ग पोरी (लता मंगेशकर आणि किशोरकुमार) या गाण्याने छान लोकप्रियता संपादन केली.

विविध भारती, रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमाला, सार्वजनिक स्थळावरील लाऊडस्पिकर, इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्स असं सगळीकडे हे कोळी गीत ऐकायला मिळू लागले. असे सुपर डुपर हिट‌ गाणं वाद्यवृंदातही गायलं जाऊ लागले आणि कधी एकदा हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि हे लोकप्रिय गाणे रुपेरी पडद्यावर पाहतोय असं होऊ लागले. त्या काळातील हे सर्वात मोठे विशेष. अगोदर बरेच दिवस गाणं ऐकायला मिळत असे आणि मग ते पडद्यावर कसे असेल/ दिसेल याबाबतची उत्सुकता वाढत वाढत जाई.

‘सबसे बडा रुपय्या’ हा चित्रपट ‘कासिद्रे कैलासा’ (१९७१) या तमिळ चित्रपटाची रिमेक. त्या काळात साऊथचा चित्रपट आपल्याला फार फार लांबचा वाटे. रिमेक ही स्वाभाविक गोष्ट वाटे. सबसे बडा रुपयाचं लेखन अबरार अल्वी यांचे. चित्रपटात मेहमूद, विनोद मेहरा, मौशमी चटर्जी, फरिदा जलाल, असित सेन इत्यादींचा प्रमुख भूमिका. मुंबईत २ एप्रिल १९७६ रोजी ‘सबसे बडा रुपय्या’ प्रदर्शित झाला (अर्थात पन्नास वर्षे पूर्ण). ताडदेवच्या जमुना चित्रपटगृहात मॅटीनी शो आणि मुंबईत इतरत्र प्रदर्शित झाला. गाणी लोकप्रिय असल्याने फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल. पिक्चर सुरू झाले, मेहमूदच्या विनोदाच्या टायमिंगने मज्जा येत होती, पब्लिक हसत हसत चित्रपट एन्जॉय करत होती आणि अशातच पडद्यावर सुरु झाले, दरिया किनारी एक बंगलो ग पोरी…. पाहतो तर काय? हे कोळी गीत चक्क सफरचंदाच्या बागेत आणि त्यावर नाचताहेत विनोद मेहरा आणि फरिदा जलाल. जे नृत्यासाठी कधीच ओळखले जात नव्हते. त्यांना नाचवले.

================================

हे देखील वाचा : Parasmani : चित्रपटाचा काही भाग रंगीत असेल…..

================================

भन्नाट कोळी गीताचा असा आणि इतका विचका कधीच कोणी केला नसेल... येथे नृत्य दिग्दर्शक दिसलाच नाही. हे गाणे पडद्यावर पाहण्यापेक्षा घरबसल्या रेडिओ, ट्रान्झिटर, टेपरेकॉर्डर यांवर ऐकलेले बरं असे वाटले. योग्य वेळी योग्य निर्णय.  या लोकप्रिय गाण्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली पण त्याची रिमिक्स कशी अजून आली नाही? आजचे डान्सरही नृत्यात स्वतःला झोकून देतात….

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!