Skip to content Skip to sidebar Skip to footer

Chalte Chalte : गाण्याने चित्रपट जगवला

गीत, संगीत, पार्श्वगायन आणि नृत्य हे आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि आपल्या देशातील चित्रपटाची जगभरातील ओळख. एक वेगळेपण. मराठी, हिंदी, साऊथ इंडियन चित्रपट, भोजपुरी, गुजराती, बंगाली वगैरे वगैरे प्रत्येक भाषेतील अनेक चित्रपटांची सुमधुर लोकप्रिय गाण्यामुळे कायमची ओळख आहे. (गीतविरहीत चित्रपट ही वेगळी संस्कृती. तो वेगळा विषय), लोकप्रिय गाण्यांनी एका पिढीतील चित्रपट पुढील पिढीलाही माहीत झाले, पहावेसे वाटले. रेडिओ ते यू ट्यूब असा अनेक गाण्यांचा प्रवास सुरू आहे.

‘चलते चलते’ असाच एक म्युझिकल सुपर डुपर हिट‌ चित्रपट. निर्माता सुंदर दार आणि दिग्दर्शक भीष्म कोहली यांच्या या चित्रपटात विशाल आनंद, सिमी गरेवाल, नाझनीन, डॉ. श्रीराम लागू, जगदीश राज, जानकीदास इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. छायाचित्रण चमन के. बाजू यांचे आहे. विशाल आनंद हा चेतन आनंद, देव आनंद आणि विजय आनंद यांच्या नात्यातील. आपलं दिसणं, पाहणं, असणं, चालणं यात डिट्टो देव आनंदची फसलेली नक्कल. फार हसे झाले हो त्याचं. हौस फिटली त्याची. कॅमेरामन चमन के बाजू हा नवकेतन फिल्मच्या कॅम्पमधला. ख्यातनाम छायाचित्रकणकार फली मिस्त्री यांच्याकडे अनेक वर्षे सहाय्यक म्हणून काम केले, बराच अनुभव घेतला आणि स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळताच उत्तम कामगिरी केली. हा चित्रपट दिसला चांगला.

हा चित्रपट मुंबईत ९ एप्रिल मे १९७६ रोजी प्रदर्शित झाला. (मेन थिएटर रॉक्सी चित्रपटगृहात मॅटीनी शो) म्हणजे पन्नास वर्षे पूर्ण. अनेक तरी छोटे चित्रपट पडद्यावर येतात आणि जातातही, तसं काहीसं या चित्रपटाबाबत होईल असे वाटत होते. पण म्हणतात ना, नवीन चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट त्या चित्रपटाचं व्यावसायिक भवितव्य स्पष्ट करते. ‘चलते चलते’ पडद्यावर येईपर्यंत त्यातील गाणी रेडिओपासून इराणी हॉटेलमधील ज्यूक बाॅक्सपर्यंत लोकप्रिय होत होत गेली. रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालामध्ये किशोरकुमारच्या आवाजातील चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहेना गाणे सरताज गीत झाले. प्रत्येक बुधवारी रात्री आठ ते नऊ वाजता अशा वेळेतील हा लोकप्रिय कार्यक्रम संपविताना निवेदक अमिन सयानी आपल्या विशिष्ट शैलीत या गाण्याचा उल्लेख करत.

अमित खन्ना लिखित या चित्रपटाला बप्पी लाहिरीचे संगीत आहे आणि त्या दिवसांत चित्रपट संगीतात लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मन, आणि कल्याणजी आनंदजी यांचे वर्चस्व होते. रवींद्र जैन, राजेश रोशन यांचे यशस्वी आगमन झाले होते. जुन्या पिढीतील नौशाद, रवि, खय्याम, शंकर ( जयकिशन यांचे जोडीदार), जयदेव, उषा खन्ना , सपन जगमोहन हे कार्यरत होते. स्पर्धा तगडी होती. गाणी लोकप्रिय होणे हा एकच मार्ग महत्त्वाचा होता. चलते चलतेची गाणी लोकप्रिय ठरली आणि बप्पी लाहिरी संगीतकार म्हणून जम बसवू शकला. खरं तर शोमू मुखर्जी निर्मित आणि आर. आय. देसाई दिग्दर्शित ‘ नन्हा शिकारी ‘(१९७३) हा बप्पी लाहिरीचा पहिला चित्रपट. त्यानंतर ताहिर हुसैन निर्मित व राजा ठाकूर दिग्दर्शित ‘ जख्मी ‘(१९७५) या चित्रपटातील गाणी लोकप्रिय ठरली आणि बप्पी लाहिरीकडे चित्रपट रसिकांचे लक्ष गेले.

‘चलते चलते’मधील जाना कहा है (पार्श्वगायक बप्पी लाहिरी आणि सुलक्षणा पंडित), प्यार में कभी कभी ऐसा भी होता है (लता मंगेशकर आणि शैलेंद्रसिंग), सपनो का राजा (शैलेन्द्रसिंग आणि सुलक्षणा पंडित) ही गाणी लोकप्रिय झालीच, खुद्द बप्पी लाहिरीही चलते चलते मेरे ये गीत याद रखना गायला. या गाण्याच्या रेकॉर्ड्सची विक्री वाढली आणि या म्युझिकल रहस्यरंजक रोमँटिक चित्रपटाने मॅटीनी शोला चक्क पंचवीस आठवडे मुक्काम केला.

================================

हे देखील वाचा : Parasmani : चित्रपटाचा काही भाग रंगीत असेल…..

================================

गाणी लोकप्रिय पण चित्रपट सामान्य, गाणी लोकप्रिय ठरली पण चित्रपट फ्लॉप ठरला, गाणी लोकप्रिय पण‌ पडद्यावरचा कलाकारच आठवत नाही असे अनेकदा घडत असते आणि चलते चलते मेरे ये गीत याद रखना याचं कर्तव्य आपण बजावत असतो…. किशोरकुमार (१३ ऑक्टोबर १९८७),  बप्पी लाहिरी (१५ फेब्रुवारी २०२२) यांच्या निधनाच्या वेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना चलते चलते मेरे ये गीत याद रखना हे गाणे सयुक्तिक ठरले. चित्रपटाच्या निर्मितीची गोष्ट अशीही असते. सगळ्याच गोष्टी सरळ रेषेत कशा जातील?

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!