
Bigg Boss Marathi 6:’रितेश सरांच्या विरोधाबद्दल बोलाल तर…’रुचितावर भडकली Janhavi Killekar; व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केला राग
‘Bigg Boss Marathi 6’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या एलिमिनेशनसोबतच स्पर्धकांमधील वाद, मतभेद आणि बाहेर आल्यानंतर होणारी वक्तव्ये यामुळे प्रेक्षकांचे लक्ष या शोवर खिळून राहते. नुकतेच घरातून बाहेर पडलेली स्पर्धक रुचिता जामदार (Ruchita Jamdar) हिने शोबद्दल काही गंभीर आरोप केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. मात्र तिच्या या वक्तव्यांवर ‘बिग बॉस मराठी 5’ची स्पर्धक जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) हिने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मागील आठवड्यात रुचिता जामदार घरातून बाहेर पडली. एलिमिनेशननंतर तिने काही मुलाखतींमध्ये बोलताना शोच्या निर्मात्यांवर आणि होस्टवर टीका केली. तिच्या म्हणण्यानुसार, बिग बॉसमध्ये तिची सकारात्मक बाजू प्रेक्षकांसमोर दाखवलीच गेली नाही. तसेच वीकेंडला होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्यावर’ तिला नीटपणे आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा आरोपही तिने केला. या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली.(Bigg Boss Marathi 6)

रुचिताच्या या बोलण्यावर जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, महाराष्ट्रात अनेक कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याची संधी मिळावी असे वाटते. अनेक जण या शोमध्ये सहभागी होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. कारण हा शो अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यातून अनेकांना मोठी ओळख मिळते.

जान्हवीने पुढे सांगितले की, इतक्या मोठ्या संधीचा उपयोग करून स्वतःला सिद्ध करणे महत्त्वाचे असते. मात्र घरातून बाहेर आल्यानंतर त्याच शोबद्दल नकारात्मक बोलणे योग्य नाही. तिच्या मते, ज्या प्लॅटफॉर्ममुळे एखाद्या कलाकाराला ओळख मिळते, त्याच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. विशेषतः शोचे होस्ट रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांच्याबद्दल बोलताना संयम ठेवायला हवा, कारण ते एक अत्यंत सन्माननीय व्यक्तिमत्त्व असल्याचे तिने स्पष्ट केले. जान्हवीने रुचिता जामदारचे नाव घेत म्हणाली की, बिग बॉसच्या विरोधात केलेली तिची विधाने तिला मान्य नाहीत. तिच्या मते, घरात असताना प्रत्येक स्पर्धकाकडून चुका होतात, रागही येतो आणि वादही होतात. ती स्वतःही अशा अनेक परिस्थितींमधून गेली आहे. पण तरीही तिने कधीच शो किंवा होस्टबद्दल नकारात्मक बोलणे पसंत केले नाही. तिने असेही नमूद केले की, ‘बिग बॉस’मुळेच तिला मोठी ओळख मिळाली. या शोमुळे तिला पुढे हिंदी रिअॅलिटी शोमध्येही काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिच्यासाठी बिग बॉस हा शो अत्यंत महत्त्वाचा आहे. कलाकार म्हणून इतक्या मोठ्या व्यासपीठाने संधी देणे हीच मोठी गोष्ट असल्याचे ती म्हणाली. (Bigg Boss Marathi 6)
================================
================================
शेवटी जान्हवीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, ”स्पर्धकांनी एकमेकांबद्दल मत व्यक्त करणे ठीक आहे. बिग बॉसच्या विरोधात बोललात तर हे मी खपवून घेणार नाही आणि रितेश सरांच्या विरोधाबद्दल बोलाल तर नाहीच नाही ”. तिच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्येही दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.एकूणच, ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर पडलेल्या रुचिता जामदारच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद आता अधिकच चर्चेत आला आहे. यावर पुढे रुचिता काय प्रतिक्रिया देणार आणि या वादाचा पुढे काय परिणाम होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.