
Super Duper चित्रपटात रंगला ‘कुकडू कू’चा गोंधळ; निर्मिती सावंत दिसणार हटके भूमिकेत
थिएटर्समध्ये Dhurandhar 2 जरी धुमाकूळ घालत असेल तरी मराठी चित्रपट काही मागे नाहीत. एकामागून एक वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट रिलीज होत आहेत. बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या गर्दीत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या ‘सुपर डुपर’ (Super Duper Movie) या आगामी चित्रपटातील एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘कुकडू कू’ असे भन्नाट बोल असलेलं हे गाणं नावाप्रमाणेच जबरदस्त ऊर्जा, मजा आणि गोंधळाचा तडका घेऊन आलं आहे.
या चित्रपटाच्या कथानकातील ‘गोंधळ’ हा महत्त्वाचा भाग या गाण्यातून प्रभावीपणे समोर येतो. दोन भिन्न विचारसरणीच्या कुटुंबांची टक्कर, त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे गाणं अधिकच एंटरटेनिंग बनलं आहे. समीर आशा पाटील यांचे बोल लाभलेले, अभिनय जगताप यांच्या संगीताने सजलेलं हे गाणं अंशुमन मोरे आणि लहान मुलांच्या आवाजात साकारलं आहे. पारंपरिक आणि आधुनिक कुटुंब यांच्यातील मजेशीर संघर्ष आणि जुगलबंदी या गाण्यातून रंगतदार पद्धतीने उलगडते.

झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांच्या निर्मितीतून साकारलेला ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक मनोरंजनांनी परिपूर्ण भरलेला हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर‘ या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता असून छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.
चित्रपटात भली मोठी स्टारकास्ट तर आहेच पण प्रेक्षकांचं विशेष लक्ष असेल ते निर्मिती सावंत यांच्याकडे. नाटक असो किंवा चित्रपट बेस्ट फिमेल कॉमेडियन म्हणून आपली ओळख निर्मिती सावंत यांनी निर्माण केली. ‘कुमारी गंगूबाई नॉन-मॅट्रिक’ या मालिकेमुळे घराघरांत त्या पोहोचल्या. शिवाय ‘बिन्धास्त’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘खबरदार’, ‘ही पोरगी कुणाची?’, ‘झिम्मा’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी विनोदी भूमिका साकारत महिला अभिनेत्री देखील बेस्ट कॉमेडी करु शकतात ही संकल्पना प्रेक्षकांच्या मनात खऱ्या अर्थाने रुजवली.
================================
हे देखील वाचा : Jhimma 3 : यावेळी ‘तिसराच’ आहे, नेमकं काय ?
================================
चित्रपटांसोबतच हिंदी-मराठी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. ‘तू तू मैं मैं’, ‘कॉन्स्टेबल कामना कामतेकर’, ‘फू बाई फू’, ‘जाडूबाई जोरात’ या मालिका, तर ‘जाऊबाई जोरात’, ‘व्हॅक्युम क्लीनर’, ‘संज्या छाया’, ‘श्यामची मम्मी’, ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकांमध्येही त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. आता येत्या काळात ‘सुपर डूपर’ चित्रपटासोबत आणखी कोणता नवा धमाका त्या घेऊन येणार हे पाहण्यासाठी सगळेच उस्तुक आहेत. तसेच, हेमंत ढोमे दिग्दर्शित Jhimma 3 चित्रपटातही त्यांची वर्णी लागणार का हे पाहण्यासाठी २०२७ ची वाट पाहावी लागेल.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi