
Chupke Chupke : धर्मेंद्रचे भाषेचे धमाल खेळ
“अंग्रेजी बहुत ही अवैज्ञानिक भाषा है साहेब, सीयूटी कट है, पर पीवीटी पुट है, टीओटी डीओडू पर जीओ गो हो जाता हो जाता है, जीओ गू क्यो नहीं हो जाता?. जो चीज है वो है नहीं, और जो चीज नहीं है वो कैसे वो सकती है”… ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ ( मुंबई रिलीज ११ एप्रिल १९७५. मुख्य चित्रपटगृह न्यू एक्सलसियर) मधील प्रोफेसर सुकुमार सिन्हा यांचे हे धमाल शाब्दिक खेळ आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनास एकावन्न वर्षे पूर्ण होत असताना त्यातील अनेक गोष्टी आठवतात, त्यातही जास्त आठवते ती धर्मेंद्रची विनोदी भाषा.
धर्मेंद्र म्हटलं की, देमार घेमार ढिश्यूम ढिश्यूम मारधाड ऍक्शन हीरो, ही मॅन अशी प्रतिमा रंगवली जाते. त्याने आपल्या शारीरिक ताकद, पोलादी मनगटे आणि कमिने कुत्ते मै तुझे जिंदा नही छोडूगा असे आक्रमक संवाद यातून रुपेरी पडदाभर दाखवली. पण तेवढंच म्हणजे धर्मेंद्र अजिबात नाही. त्याने अनेक चित्रपटांत संयत व्यक्तिरेखाही साकारल्या आहेत. (उदाहरणार्थ ‘सत्यकाम’, ‘अनुपमा’, ‘देवर’, ‘नया जमाना’, ‘एक महल हो सपनो का’, ‘इश्क पर जोर नही’ असे अनेक चित्रपट.) हलक्या फुलक्या खेळकर व्यक्तीरेखा ( दिल्लगी) देखील साकारल्या आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार म्हणून धर्मेंद्रची खासियत आहे.

त्यात विविधतेमधील त्याची ‘चुपके चुपके’ या निर्भेळ आनंद देत असलेल्या चित्रपटातील त्याची भूमिका. चित्रपट रसिकांच्या किमान चार पिढ्या ओलांडूनही हा खुसखुशीत खुमासदार चित्रपट. आणि त्यातही गाजले ते गुलजार लिखित आणि धर्मेंद्रने विशिष्ट शैलीतील डायलॉग. “शायरी करता तो आसान है, क्योकि इसमे भावुकता कम और शब्दाडऺबर जादा होता है. भाईसाब यह हिंदी भाषा है, इसमे तो रुह की गहराई से शब्द निकलते है”. ह्रषिकेश मुखर्जी अतिशय शिस्तबद्ध आणि फोकस्ड दिग्दर्शक.सेटवर अजिबात वेळ वाया जाऊ न देता चित्रीकरण करणारे दिग्दर्शक. त्यांच्या दिग्दर्शनातील अनुपमा, सत्यकाम, गुड्डी अशा चित्रपटात धर्मेंद्रने भूमिका साकारलेल्या त्यामुळे त्यांना एकमेकांच्या कामाची पध्दत माहीत असलेली. ती ” चुपके चुपके’मध्ये अधिकच पळलेली दिसते.

“किसी की भाषा का मजाक उडाना घटीयापन है और मे वही कर रहा हू”, हे धर्मेंद्र अगदी सहज बोलून जातो. या चित्रपटात धर्मेंद्र एक बॉटनी विषयाचा प्रोफेसर आहे. त्याचं लग्न सुलेखा (शर्मिला टागोर) हिच्याशी होते. धर्मेंद्रचा सहकारी प्रोफेसर अमिताभ बच्चनने साकारला आहे आणि त्याच्या पत्नीच्या भूमिकेत जया बच्चन आहे (हे दोघेही ह्रषिदांच्या गुड बुक्समधील आहेत). याशिवाय चित्रपटात ओम प्रकाश, डेव्हिड, असरानी, केश्तो मुखर्जी, उषा किरण, लीली चक्रवर्ती वगैरे वगैरे कलाकार आहेत. चित्रपटाची गीते आनंद बक्षी यांची असून संगीत सचिन देव बर्मन यांचे आहे.
================================
हे देखील वाचा : Parasmani : चित्रपटाचा काही भाग रंगीत असेल…..
================================
सारेगामा (पार्श्वगायन मोहम्मद रफी आणि किशोरकुमार), बागो में कैसे फूल खिलते है (लता मंगेशकर आणि मुकेश), अब के सजन सावन में (लता मंगेशकर), चुपके चुपके चल रे पुरवया (लता मंगेशकर) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. छायाचित्रणकार जयवंत पाठारे हे आहेत. रुपम चित्र निर्मित या चित्रपटाचे चित्रीकरण आज अमिताभ बच्चनचा जुहू येथे असलेल्या जलसा या बंगल्यात झाले आहे. या बंगल्याचे मूळ मालक निर्माते राज एन. सिप्पी आणि त्यांचा मुलगा राज एन. सिप्पी हे आहेत. त्यांनी निर्मिलेल्या इन्कार, सत्ते पे सत्ता इत्यादी चित्रपटांचे येथे चित्रीकरण झाले आहे. ‘चुपके चुपके’ या चित्रपटाणी निर्मिती ह्रषिकेश मुखर्जी आणि एन. सी. सिप्पी यांची आहे पुन्हा एकदा चुपके चुपके एन्जॉय करायलाच हवा, सध्याच्या गोंधळलेल्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणात अतिशय उत्तम असा मनोरंजनाचा झक्कास डोस आहे. एकदम तजेलदार होऊन जाऊ. या स्वच्छ निखळ आनंद देत असलेल्या या चित्रपटात ती ताकद नक्कीच आहे.