
Cup Bashi Marathi Movie: सासू-सुनेच्या नात्यावर आधारित निर्मिती सावंत-पूजा सावंत यांचा ‘कप बशी’ लवकरच येतोय भेटीला!
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नात्यांच्या गुंतागुंतीवर आधारित कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहेत. अशातच सासू-सुनेच्या नात्यातील वेगवेगळ्या छटा उलगडणारा ‘कप बशी’ (Cup Bashi Marathi Movie) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हलक्या-फुलक्या पण तितक्याच अर्थपूर्ण पद्धतीने नात्यांमधील भावविश्व मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. दिग्दर्शक वैभव चिंचाळकर (Vaibhav Chinchalkar) यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट ५ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते कल्पक सदानंद जोशी आहेत, तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. (Cup Bashi Marathi Movie)

चित्रपटाच्या कथानकाची खासियत म्हणजे त्यात सासू-सुनेच्या नात्यातील पारंपरिक आणि आधुनिक विचारांचा संघर्ष मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. अरुण आणि अरुणा हे दांपत्य त्यांच्या मुलासाठी वधू शोधत असतात. मात्र, अरुणाच्या आध्यात्मिक गुरूंनी सूनेबाबत काही अटी घातलेल्या असतात. त्या अटी पूर्ण करणारी मुलगी त्यांना मिळते का, आणि पुढे या शोधप्रवासात कोणते ट्विस्ट येतात, याभोवती चित्रपटाची कथा रंगते. पत्रिका, परंपरा आणि आजच्या काळातील बदलते विचार यांचा संगम या कथेत पाहायला मिळतो.

या चित्रपटात निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), पूजा सावंत (Pooja sawant), ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर आणि आनंद काळे अशी दमदार स्टारकास्ट आहे. त्यामुळे अभिनयाची जोरदार मेजवानी प्रेक्षकांना मिळणार, हे नक्की. चेतन सैंदाणे यांनी पटकथा आणि संवाद लिहिले असून, गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांना ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचं संगीत लाभलं आहे.(Cup Bashi Marathi Movie)
================================
================================
तांत्रिक बाबींमध्येही चित्रपट भक्कम दिसतो. बाळू दहिफळे यांची सिनेमॅटोग्राफी, आशिष म्हात्रे यांचं संपादन, तसेच दीपाली विचारे यांचं नृत्यदिग्दर्शन आणि महेश कुडाळकर यांचं कला दिग्दर्शन यामुळे चित्रपटाची मांडणी अधिक प्रभावी होणार आहे. एकूणच, नात्यांमधील गोड-तिखट अनुभव, पारंपरिक मूल्यं आणि आधुनिकतेचा संगम यामुळे ‘कप बशी’ हा चित्रपट प्रेक्षकांना हसवत-खळखळून विचार करायलाही भाग पाडणार आहे. त्यामुळे कुटुंबासोबत पाहण्यासारखा एक हलकाफुलका पण अर्थपूर्ण चित्रपट म्हणून ५ जूनची तारीख आता प्रेक्षकांच्या कॅलेंडरमध्ये नक्कीच नोंदवली जाईल.