
Sanai Chughade मालिकेत ‘सत्यजित’ची दमदार एन्ट्री; झी मराठीचा ‘हा’ अभिनेता १२ वर्षांनंतर पुन्हा मालिकेत दिसणार!
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांमध्ये सध्या ‘सनई चौघडे’ (Sanai Chughade)ही मालिका प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. सनई चौघडे या मालिकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता कथानकात आणखी रंगत आणण्यासाठी एका खास पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.(Sanai chaughade Serial)

या मालिकेत लवकरच चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांची दमदार एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे, ते ‘सत्यजित’ या भूमिकेत दिसणार आहेत. हीच भूमिका त्यांनी १२ वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘तू तिथे मी’ (Tu Tithe Mee Serial) या मालिकेत साकारली होती. त्या वेळी मंजिरी आणि सत्यजित ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. आता इतक्या वर्षांनंतर सत्यजित पुन्हा स्क्रीनवर येणार असल्याने जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. झी मराठीने सोशल मीडियावर या एन्ट्रीचा प्रोमो शेअर करत “अगदी योग्य मुहूर्तावर होणार सत्यजितची दणक्यात एन्ट्री!” असं कॅप्शन दिलं आहे. प्रोमोमध्ये अभिनेत्याचा चेहरा पूर्णपणे दाखवण्यात आलेला नसला तरी त्याच्या स्टाइल आणि लूकवरून चाहत्यांनी तो चिन्मय मांडलेकर असल्याचा अंदाज लावला आहे. डॅशिंग अंदाजात दिसणाऱ्या या एन्ट्रीमुळे मालिकेत नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

मालिकेच्या कथानकात शर्वरी नोकरीच्या शोधात आहे आणि अशातच सत्यजित तिच्या आयुष्यात येतो. तो तिचा बॉस असणार का? त्यांच्या नात्यात संघर्ष आणि वाद निर्माण होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सत्यजितसोबत मंजिरी पण हवी”, “चिन्मय मांडलेकरची एन्ट्री खूप दिवसांनी पाहायला मिळतेय” अशा कमेंट्सनी प्रोमोला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Sanai chaughade Serial)
=============================
=============================
चिन्मय मांडलेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पावनखिंड (Pawankhind), शेर शिवराज (Sher Shivraj), फत्तेशिकस्त (Fatteshikast), शुभेदार (Subhedar) यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. तसेच इंस्पेक्टर झेंडे (Inspector Zende) या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. एकूणच, ‘सनई चौघडे’मध्ये सत्यजितच्या एन्ट्रीमुळे मालिकेतील नातेसंबंध, संघर्ष आणि भावनिक नाट्य अधिक रंगणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता ही एन्ट्री प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत खरी उतरते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.